सावली

             त्या रात्री ट्रेनमधून एकटाच प्रवास करत होतो. अर्थात एकट्यानेच प्रवास करण्याची ती माझी पहिलीच वेळ नव्हती. उलट ते मला जास्त आवडायचे. मी माझी छोटीशी डायरी काढून त्यात काहीतरी खरडत राहायचो. कुणाचा डिस्टर्ब नाही नि काही नाही. तर असेच त्या रात्री देखील मी डायरी काढली. ट्रेनचे दिवे मंद झाले होते. तरीही तेवढ्या प्रकाशात मी लिहू शकत होतो. नेहमीप्रमाणेच खिशातला पेन काढला आणि मांडीवर डायरी ठेऊन पेनाचे बुड तोंडात घालून नवीन काही रहस्यकथा सुचताहेत का त्याचा विचार करू लागलो. बाहेरची काळी रात्र आणि त्यातल्या झाडांच्या आणि ट्रेनच्या डब्याच्या काळ्या सावल्या माझ्या कल्पना शक्तीला चालना देत होत्या. बराच वेळ तसाच बसून होतो एकही अक्षर न लिहिता.

     त्या रात्री अशी एक कोणती कल्पनाच मनात स्थिरावत नव्हती. साधारण अर्ध्या पाऊन घटकेनंतर माझ्या पापण्या जड होऊ लागल्या. मी तसंच शेजारच्या भिंतीवर डोकं टेकवून डोळे मिटले. तर चित्र-विचित्र स्वप्नमालिका चालू झाल्या. पुढच्या काही मिनिटांतच डोळे उघडले. बघतो तर शेजारच्या बाकावर एक व्यक्ती येऊन बसलेली. कदाचित नुकत्याच मागे गेलेल्या स्टेशनवर ती व्यक्ती चढली असेल. कदाचित कसे नक्कीच. आता त्या संपूर्ण डब्यात आम्ही दोघेच होतो. तशी ती व्यक्ती मला काही उपद्रव करेल असे पहिल्या नजरेत तरी काही जाणवले नाही. परंतु तिच्यात असे काहीतरी होते ज्यामुळे एक असुरक्षिततेची भावना मनाला चाटून गेली. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. तो एक काळ्या वर्णाचा साधारण सहा-साडे सहा फुट उंचीचा पुरुष होता. हातात मळकट कापडी पिशवी. गळ्यात तुळशी वा तत्सम माळांचा जुडगा. अंगभर काळ्या रंगाचा सदरा. कपाळावर बुक्का आणि अष्टी गंधाची उमटवलेली बोटे आणि पायात जीर्ण झालेल्या वहाणा. त्या मंद प्रकाशात अनाहूतपणे त्याचे जितके निरीक्षण करता येईल तेवढे केले आणि पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागलो.

     हळूहळू गारठा वाढत होता. मी खिडकीची काच अर्धवट बंद केली आणि सोबत आणलेली मतकरींची कादंबरी काढून वाचू लागलो. डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून हलकेच तो माणूस जिथे बसला होता तिकडे लक्ष गेले आणि क्षणभर मी जागीच हबकलो. तो माणूस दोन्ही बाकांच्यामध्ये माझ्याकडे पाठमोऱ्या स्थितीत उभा राहिला होता. अगदी स्तब्ध. संपूर्ण ट्रेन रिकामी असताना त्याचं असं उभं राहण्याचे कोणतेही कारण त्याक्षणी माझ्या लक्षात येत नव्हते. मी मग उगाच पुस्तकाची पानं चाळू लागलो आणि त्याच्याकडे अधून मधून पाहू लागलो. त्याने आतापर्यंत त्याच्या जटा मोकळ्या सोडल्या होत्या. त्यांचा तो रापलेला वास वाऱ्याच्या झुळकीबरोबर अधूनमधून माझ्या नाकापर्यंत पोचत होता. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आणि पूर्ण लक्ष वाचनात गुंतवण्याचे निश्चित केले. असाच काही वेळ निघून गेला. मी पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही त्याच स्थितीत उभा होता. मला काहीतरी विचित्रच वाटले. मनातल्या मनात दोन-चार शिव्या देत मी माझे वाचन पुढे चालू ठेवले.

     साधारण तासाभराने मी कादंबरीतून पुन्हा डोके वर काढले आणि तेव्हा मात्र मी जे पाहिजे त्यावर माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. तो पुरुष आता तिथे नव्हताच. तिथे होती त्याची काळी साडे सहा फुट उंचीची स्तब्ध उभी सावली. मी जागीच उभा राहिलो. आजूबाजूला बघितले. त्या डब्यात मी आणि त्या सावली व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. मी पुन्हा माझ्या जागेवर बसलो. एव्हाना माझी अक्षरशः फाटली होती. ती कादंबरी आत ठेऊन हनुमान स्तोत्र मनातल्या मनात चालू ठेवले आणि खिडकीतून बाहेर बघत आजची रात्र सुखरूप घरी पोचण्याची मनोमन प्रार्थना करू लागलो. घड्याळात पाहिले, ३ वाजून १० मिनिटे झालेली. इच्छित स्टेशन येण्यास अजून अडीच घटकांचा अवधी होता. काही वेळातच ती सावली किंचीतसी हलली. मी जागचा अजिबात न हलता निडर होऊन (घंटा निडर) तिच्याकडे फ़क़्त पाहत होतो. आणि मग ती सावली तो माणूस ज्याप्रकारे बाकावर बसला होता तशीच बाकावर बसली. तोपर्यंत माझे हनुमान स्तोत्र संपून रामरक्षा सुरु झाली होती.

    अचानक ती सावली पुन्हा उभी राहिली आणि पुन्हा एकदा माझ्या हृदयात धडकी भरली. तिने वर्तुळाकार मान फिरवली आणि मी डोळे फाडून आ वासून संमोहित झाल्याप्रमाणे तिच्याकडे फ़क़्त पाहत राहिलो. मग तिने दोन्ही हात पसरवले आणि छताकडे पाहिले, तसे तिच्या आत दडपून ठेवलेल्या विविध मानवी सावल्यांचा आविष्कार झाला. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण ते सर्व माझ्यासमोर प्रत्यक्षात घडत होते. ट्रेनचा धडम-धडम आवाज लुप्त होऊन मी एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केला होता. माझी मती गुंग झाली होती. अचानक ती सावली माझ्या दिशेने एक एक पाउल पुढे टाकू लागली तसा तसा मी मागे मागे सरकत भिंतीला पूर्ण चिकटलो. ट्रेनचा होर्न वाजला. तोही अस्पष्टच ऐकू आला. कदाचित पुढचे स्टेशन आले असावे. ती सावली माझ्या दिशेने संथगतीने येतंच होती. आता मात्र मी डोळे गच्च मिटून घेतले आणि डोके गुढघ्यात खुपसले आणि गुडघे मिठीत आवळून शरीराची वळकटी करून अधिकाधिक लहान होण्याचा प्रयत्न करू लागलो. जसजसे आमच्यातले अंतर एक एक इंचाने कमी होत होते तसतसा इंचइंचाने मीही लहान होत असल्याचे मला जाणवत होते. न जाणो कसे पण ती सावली आता माझ्या पूर्ण जवळ असल्याचे माझ्या लक्षात आले. मी त्याच अवस्थेत बसून राहिलो, पाप पुण्याचा हिशोब करत.

     एका अज्ञात वेळेनंतर मी डोळे उघडले तेव्हा बाहेर उजाडू लागले होते, ट्रेन मध्ये माणसांची वर्दळ सुरु झाली होती आणि मुख्य म्हणजे मी सुखरूप होतो. ती सावली आता नाहीशी झाली होती. मनात जरा हायसं वाटलं. घड्याळात पाहिले तर पाच वाजले होते. तसाच आळोखे पिळोखे देत जागेवरून उठलो आणि सिटाखालचे सामान बाहेर काढण्यासाठी खाली वाकलो. वाकताना खिशातलं पेन खाली पडलं. ते उचलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. खात्री करून घेण्यासाठी मी दोन-तीन वेळ तीच क्रिया पुन्हा पुन्हा करून पाहिली. परंतु परिणाम एकंच होता. तिथे फ़क़्त माझ्या पेनाचीच सावली होती.

Advertisements

Create a website or blog at WordPress.com

Up ↑