तृष्णा …(भाग – ३)

  गाडीमधून एक पुरुष आणि एक स्त्री उतरली. त्या पुरुषाने गाडीचा मागचा दरवाजा खोलला आणि कोणाला तरी बाहेर येण्याची आर्जवं करू लागला. ‘कोण होतं तिथे आणि ते बाहेर का येत नव्हते?’ दरवाजात उभा राहून त्याच्या विचारांचे चक्र वेगात फिरत होते. शेवटी त्या पुरुषाने त्या आतल्या व्यक्तीला खेचून बाहेर काढले आणि दरवाजात उभा असलेल्या ‘त्या’चे हात पाय गळपटायला लागले. अंगात शिरशिरी भरली. ती व्यक्ती तीच मुलगी होती जिला त्याने ग्लानी येण्यापूर्वी पाहिले होते. पांढराशुभ्र पायघोळ, मोकळे काळेभोर केस आणि पाय अनवाणी. बघताचक्षणी त्याला कळाले की ह्या मुलीचे मानसिक संतुलन पूर्णता: बिघडले आहे.

     तो गडी आणि तो पुरुष तिचा एक एक हात पकडून तिला घराच्या दिशेने ओढत ओढत आणत होते. ती स्त्री त्यांच्यामागून हळू हळू येत होती. एव्हाना अंधार पडू लागला होता. तो दरवाजात तसाच उभा होता. ते दोघं त्या मुलीला घेऊन दरवाजापर्यंत पोहोचले. त्या दोघांनी तिचा हात घट्ट पकडूनच वाहणा बाजूला काढून ठेवल्या आणि आत आले. तिला खुर्चीवर बसवले आणि त्या पुरुषाने तिचे दोन्ही हात मागे धरून ठेवले. ती तोंडाने विचित्र आवाज काढत रेकत होती आणि काहीतरी अ..क्त अ..क्त असे बोलत होती. ती नक्की काय बोलत होती हे ‘त्या’ला काही स्पष्ट समजले नाही. तिच्या एकूण अवताराकडे पाहून त्याची भीती शिगेला पोहोचली होती. ती स्त्री बाहेर बाकड्यावर बसली होती. आत काय चाललाय ह्याविषयी तिला जरादेखील चिंता नव्हती.

      मग त्या गड्याने कुठूनतरी एक जाडा दोरखंड आणला आणि त्या दोघांनी तिला खुर्चीवर तसच बांधून ठेऊन तिच्या तोंडावर पट्टी मारली. सुटकेच्या निश्वास टाकत त्या पुरुषाने कपाळावरचा घाम रुमालाने टिपून घेतला आणि त्या गड्याला काही सूचना करू लागला. त्या मुलीच्या खाण्यापिण्याची पथ्ये सांगू लागला. तो म्हणाला, ‘डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला निसर्गरम्य वातावरणात ठेवले तर तिच्यात सुधार होण्यास मदत होऊ शकते. ही जन्मत:च हिची आई गेली. हिला सांभाळण्यासाठी मी दुसरे लग्न केले. डॉक्टरांनी हिच्या जन्माच्या वेळेसच सांगितले होते की हिच्या मेंदूची वाढ अजिबात झालेली नाही आणि ती कधीच सामान्य मुलींसारखे आयुष्य जगू शकणार नाही. तेव्हा ती चार-पाच वर्षांची झाल्यावर तिला वेड्यांच्या इस्पितळात आम्ही दाखल केले होते. परंतु गेल्या वर्षीपासून तिच्यात राक्षसी, अमानवी शक्तींनी प्रवेश केल्यासारखा दिसत होता, असे डॉक्टरांनी सांगितले. मांत्रिकी उपचारदेखील करून झाले. पण त्याचा काहीही फरक पडला नाही. तिला गेल्या सहा महिन्यांपासून सतत रक्ताची तहान लागलेली असते. ते सुद्धा एका अघटीत प्रकाराने. डॉक्टरांच्या नकळत तिने ब्लेडने तिचेच बोट कापले आणि बोटातून भळाभळा रक्त येऊ लागले. नर्सला समजताच ती धावत तिच्याकडे गेली आणि ते बोट तिला चोखायला सांगितले. कापल्यामुळे होणाऱ्या वेदनांचा जरादेखील लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती तिचे बोट पिळून आणखी रक्त काढत पित होती. ते पाहून नर्सने खाडकन तिच्या कानाखाली मारली. तर ती तिच्यावरच गुरगुरायला लागली. लगेचच नर्सने वार्ड बॉयला बोलावून कसेबसे तिला नियंत्रणात आणले. पण तेव्हापासून हळूहळू ती हाताबाहेर गेली. तिथे तिने दोघांचा जीव घेतला होता आणि ते सुद्धा अगदी निर्दयीपणे. असो. आतापासून तुम्हाला हिच्याकडे लक्ष पुरवायचे आहे आणि ह्या जोखमीच्या कामासाठी मी तुमचा पगार तीन पटीने वाढवतो आहे. आम्ही आता निघतो. पुन्हा महिन्याभरात येतो. तोपर्यंत काळजी घ्या,’ असे म्हणून तो पुरुष बाहेर गेला.

      ‘तो’ घराच्या एका कोपऱ्यात बसून सगळं ऐकत होता. बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तो गडी पुन्हा लगबगीने ओसरीपर्यंत गेला. त्यांना निरोप देऊन तो गडी पुन्हा घरी आला. त्याने पाहिले तर ती डोळे मिटून धीरगंभीर श्वास सोडत होता. तिला तसेच ठेऊन तो गडी किचनमध्ये गेला. दिवाणखान्यातला पिवळा दिवा वातावरणातील उदासीनतेत भर घालत होता. ‘तो’ कोपऱ्यात बसलेला जागेवर उभा राहिला आणि हळू हळू तिच्यापासून चा हात लांब राहूनच तिच्यासमोर येऊ लागला. तिचे मोकळे लांब केस चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पसरले होते. तो समोर उभं राहून आवाज न करता तिचा निरीक्षण करत होता आणि इतक्यात तिने डोळे उघडले. केसांच्या मधून तिचे ते लाल डोळे पाहून तो पाठीमागेच कोसळला. ती खुर्ची हलवायला लागली आणि जोरजोरात कण्हू लागली. तिच्या आवाजाने तो गडी बाहेर आला. तिला दोन चार शिव्या हासडून गप्प बसून राहायला सांगितले आणि पुन्हा किचन मध्ये गेला. गडी गेला तरी ती गुरगुरतच होती.

      असाच काही वेळ निघून गेला. तो गडी पुन्हा किचनमधून बाहेर आला. हातात कसलीशी जेवणाची थाळी होती. ती घेऊन तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिच्या तोंडावरची पट्टी काढली. ती आता थोडी शांत झालेली वाटत होती. त्याने एक घास बनवून तिच्या तोंडासमोर नेला. तिने नाही म्हणण्यासाठी जोरात मान हलवली. तरी त्याने जबरदस्ती करत तो घास तिला भरवलाच. तिने तसाच तो थुंकला. त्याचे काही शिंतोडे त्याच्या चेहऱ्यावर उडाले. आता तो गडीदेखील रागाने लालबुंद होत होता. त्याने जवळपास खेकसूनच तिला विचारले, ’ह्ये नगं त काय हावं तुला? काय हावं हां?’ असे म्हणत तिचा जोरात कान पिळला. ती काही प्रमाणात वेदनेने कळवळली. त्याने पुन्हा विचारले, ‘बोल की भवाने, काय हावं?’ ती कण्हत म्हणाली, ‘अ..अ…क्त.’ त्याने तिच्या जोरदार कानसुळात मारली आणि म्हणाला, ‘रघात काय, माजं रघात प्येशील का, माजं? म्हने रघात पायजे. मर उपाशीच. न्हायतरी तुह्या बापालासुदिक तू नकोशीच झालीयस. जल्माला आली तवा मायला खाल्लंस. आता मलाबी खा,’ असं म्हणत तो गडी उठला आणि तिथून निघून गेला. ती मात्र तिथेच डोकं खाली घालून कण्हत होती.

      ‘तो’ उठला आणि दबकत दबकत दरवाज्यापाशी जाऊन हळूच तिथून बाहेर पडला. रिकाम्या बाकड्यावर जाऊन त्याने अंग आडवे केले. बराच वेळ सर्वकाही शांत होते. रात्री कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली. हो तो अजूनही त्याच काळात आहे. आकाशात ढग गर्दी करू लागले होते. रातकिड्यांचा आवाज शांततेचा भंग करत होता. घराच्या दारे खिडक्या बंद होत्या. बाहेर हातकंदीलाचा दिवा जळत होता. घरात काळोख होता. तरी कंदिलाचा प्रकाश खिडकीच्या फटीतून आत झिरपत होता. कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. तो उठला आणि खिडकीपाशी गेला. फटीतून आत पाहू लागला. फरशीवर तो गडी घोरत पहुडला होता आणि ती खुर्ची रिकामी होती. क्षणभर त्याच्या छातीत धस्स झालं. तो पुन्हा आत पाहू लागला आणि किचनच्या दरवाज्यात त्याला कसलीशी चाहूल लागली. त्याने पाहिले तर ती मुलगी त्या पांढऱ्या पायघोळमध्ये, केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत हातात तो धारदार सुरा घेऊन उभी होती. त्याचे हातपाय लटपटायला लागतात. तो तसाच खाली बसला आणि डोळे मिटून डोकं गुडघ्यात खुपसून हमसाहमशी रडू लागला. पुढच्या काही क्षणांतच एक आर्त किंकाळी सबंध परिसरात पसरली. त्याची तर वाचाच बसली.

      तशातच ढगांचा जोरदार आवाज झाला आणि पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. विजांचा कडकडाट झाला आणि त्यातच तिचं विक्षिप्त हास्य त्याच्या कानावर पडलं. संपूर्ण वातावरणात एक अनामिक कळा पसरली. त्याची गाडी बंद पडण्यापासून ते त्याला ग्लानी येईपर्यंतच्या सर्व गोष्टींचा त्याला उलगडा झाला. त्याला मघाशी दरवाजात दिसलेली ती अमानवी घटना सुमारे वीस पूर्वी तिथे घडली होती.

      त्याने डोळे उघडले. गुडघ्यात खुपसलेले डोके वर काढले. कधीपासून पाण्यासारखे हलणारे दृश्य आता स्थिर झाले होते. हो तो आता पुन्हा वर्तमानात आला होता. पाऊस अजूनही कोसळतच होता. विजांचा लखलखाट सुरूच होता. बघता बघता त्याची नजर दरवाजाकडे गेली. तिथे आडवा पडलेला तो ‘तो’च होता. एक पाय सुजलेला नि दरवाजात निश्चेष्ट कोसळलेला. कसाबसा धीर एकवटून तो उठला आणि दरवाजात त्याच्या कलेवरापाशी गेला. तिथे गेला न गेला तोच त्याला ती दिसली. खोलीत तशीच उपडी मांडी घालून बसली होती. त्याच्या कलेवराच्या अगदी जवळ. एका हातात तोच रक्तरंजित सुरा आणि दुसऱ्या हातात त्याचं शीर. बाजूला पडलेल्या विजेरीच्या प्रकाशात लाल भडक दात विचकावून त्याच्याकडे बघणारा तिचा तो विद्रूप चेहरा त्याला स्पष्ट दिसला आणि बघता बघता पुढच्या काही क्षणांतच त्याचे ते धूड आत खेचले जाऊन धडामदिशी दार बंद झाले.

       अखेरीस तो उठला आणि पुन्हा रस्त्याच्या दिशेने निघाला. सर्व इंद्रिये सुन्न झाली होती. नकळत तो रस्त्याच्या मध्यावर जात होता आणि अचानक एक जोरदार हॉर्न वाजवत भरधाव वेगाने येणारी गाडी त्याच्या आरपार निघून गेली.

तृष्णा …(भाग – २)

  आता पुढे काय करायचे ह्याच्या योजना तो मनातल्या मनात आखत होता. त्याने बसल्या जागेवरून सहज आजूबाजूला पाहिले तर घराभोवती त्याला तारांचे कुंपण दिसले. त्याच्या आत आणि बाहेर बरेच रानटी गवत वाढले होते. इतके की त्यात ते कुंपण जवळपास झाकून गेले होते. बराच काळ इथे कोणी राहत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. हताश होऊन त्याने सिगरेटचा मोठा झुरका मारला आणि त्यामुळे त्याला खोकल्याची एक जोरदार उबळ आली. तो खोकत असताना अचानक त्याच्या मागून कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने निघून गेलेले जाणवले. तो सावध होऊन उभा राहिला आणि आजूबाजूला पाहिले पण काही वेगळे दिसले नाही. तो पुन्हा जागेवर बसला. पहिली सिगारेट पायाखाली दाबली आणि दुसरी शिलगावत पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागला.

   मग बराच वेळ कुठेच काहीही हालचाल झाली नाही. त्याने विचार केला की आता पहाटेपर्यंत इथेच थांबावे कारण पाय मुरगळलेल्या अवस्थेत त्या चिखलातून पुन्हा गाडीपर्यंत जाण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते. त्याने अंगातला कोट काढून बाकड्यावर बाजूला ठेवला आणि डावा हात दुमडून हाताची उशी करत तिथेच बाकड्यावर अंग आडवे केले. आणि बघता बघता तो कधी निद्राधीन झाला हे त्याचे त्यालादेखील कळले नाही. असाच काही वेळ निघून गेला. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. एव्हाना तो ज्या पायवाटेने आला तिथे बरेच पाणी साठले होते.

   छताला टांगलेल्या कंदिलाची ज्योत आता फडफडायला लागली जी आतापर्यंत इतक्या वाऱ्यापावसात तग धरून होती. आणि आता पुढे जे अपेक्षित होते तेच घडले. ती ज्योत विझली. आजबाजूच्या सर्व जागेवर काळोखाने कब्जा घेतला. अजूनपर्यंत त्याच्या झोपेत कसलीच बाधा आली नाही. परंतु अचानक एका अतिशय थंड वाऱ्याच्या झुळकीने त्याचे अंग गारठले. त्याने डोळे बंद अवस्थेतच कोट पांघरण्यासाठी डोक्याच्यावर हात नेऊन चाचपडले आणि त्याच्या बोटांना ‘तिच्या’ पायाच्या तळव्याचा स्पर्श झाला. ती बाकड्यावर हवेत तरंगत निश्चल उभी होती. अगदी त्याच्या डोक्याच्या बाजूलाच. त्याने खाडकन डोळे उघडले आणि उठून बघितले. पण तिथे कोणीही नव्हते. त्याने विजेरी चालू केली आणि त्या जागेवर पाहिले. परंतु आता तिथे केवळ त्याचा कोट होता. त्याने पाहिले की कंदिलाची ज्योत विझली आहे. लगबगीने त्याने खिशातले लायटर काढले आणि ज्योत पेटवली. पण काही वेळातच ती पुन्हा विझली. त्याने पुन्हा पेटवली. ती पुन्हा विझली. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा ती पेटवली मात्र, त्या कंदिलाच्या पलीकडे त्याला दिसला तिचा तो लालभडक दातांचा भयावह हसरा चेहरा. भीतीने तो दोन पावलं मागे सरकला अर्थात पुढच्याच क्षणात कंदिलाची ज्योत विझली.

   तो खाली मान घालून डोकं खाजवत तसाच बाकड्यावर बसला. असा विचित्र भास झाल्याने त्याची झोपच उडाली होती. आता रात्रभर असं जागंच राहायचं त्याने ठरवले. विजेरी तशीच चालू ठेवली. घड्याळात पाहिले तर अडीच वाजले होते. करण्यासारखे दुसरे काहीच नव्हते आणि दिवस उजाडण्यासाठी अजून २-३ तासांचा तरी अवकाश होता. सहज चाळा म्हणून त्याने शेजारी ठेवलेली विजेरी हातात घेऊन तिचे बटन बंद-चालू करू लागला आणि मध्येच एका आवर्तनात त्याला दिसला तिचा तो रक्ताने माखलेला सफेद पायघोळ नि चेहऱ्यावर आलेले तिचे मोकळे केस. तो जागेवरच उडाला. त्याने पटकन विजेरी बंद केली. मग पुन्हा चालू केली. आता तिथे कोणीही नव्हते. भीतीने त्याचे हात पाय थरथर कापू लागले. तरीही हे सगळे मनाचे खेळ आहेत असेच तो स्वत:ला समजावू लागला.

   विजेरी बाजूला ठेऊन तो तसाच बसून राहिला. झाल्या प्रकाराने त्याला इथे आल्याचा पश्चाताप होत होता. पण आता इलाज नव्हता. कारण घराच्या आजूबाजूने पाणी साठले होते आणि तो ज्या वाटेने आला ती आता चिखलपाण्यात लुप्त झाली होती. तेव्हा सकाळपर्यंत त्याला इथेच थांबणे भाग होते. त्याने खाली वाकून पुन्हा पायाकडे बघितले. सूज थोडी ओसरल्यागत जाणवत होती. किंचित हायसं वाटून तो तसाच बसून राहिला. अचानक कोणाच्या तरी खळखळून हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. “कोण आहे? कोण आहे तिकडे?” असे म्हणत त्याने झटकन आजूबाजूला वळून बघितले. ह्या खेपेला देखील तिथे कोणीही नव्हते. तो उठला आणि त्या घराच्या आवारात इकडे तिकडे हळूहळू फिरू लागला. त्याची जवळपास खात्री झाली होती की इथे तो एकटाच नाही.

   फिरता फिरता तो घराच्या खिडकीपाशी आला. खिडकी बंद असली तरी तिला थोडी फट होती. त्यातून तो कोणी दिसतंय का त्याचा अंदाज घेऊ लागला. पण आत पूर्ण काळोख असल्याने त्याला काहीच दिसले नाही. तो तसाच हळूहळू पाय खेचत दरवाजापाशी पोहोचला आणि पचकन आवाज आला. आपला पाय पाण्यात पडल्यागत त्याला जाणवले. ‘पण इथे पाणी कुठून आले’ म्हणत घाईघाईने त्याने बाकड्यावरची विजेरी घेतली आणि खाली बसून बघितले. ते घट्ट लाल-काळे रक़्त होते. चक्कर येता येता त्याने स्वत:ला सावरले. हाताने दरवाजाच्या चौकटीला धरले आणि तिथेच त्या रक्ताच्या बाजूला पाय पसरवून बसून राहिला. ते रक्त हळूहळू ओसरीवर आणखी पसरत होते. आणि तो त्या रक्तापासून लांब लांब सरकण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी तो तिथून उठला आणि पाय घासत पुन्हा बाकड्यावर गेला.

   आता काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण घडणाऱ्या घटना थांबतच नव्हत्या आणि ‘जर असेच चालू राहिले तर भीतीने एकतर आपला जीव तरी जाईल वा आपण वेडे तरी होऊ. तेव्हा लवकरात लवकर काहीतरी हालचाल केलीच पाहिजे,’ असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. हातात विजेरी घेऊन तो उठला. रक्तातून पचक पचक आवाज करत तो दरवाजापर्यंत पोहोचला. अंदाज घेण्यासाठी त्याने त्या दरवाजाला कान लावला. आतमध्ये गटक गटक गिळण्याचा आवाज येत होता. समोर काय चित्र दिसेल हे बघण्याची त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. सारखा सारखा तो कडीजवळ हात नेऊन पुन्हा मागे आणायचा. शेवटी देवाचं नाव घेत त्याने कडीला हात लावला आणि वर खाली करत हळू हळू ती बाजूला केली. तेवढ्यात आकाशात धडाडधाड विजेचा आवाज झाला आणि क्षणभर त्या परिसरात लख्ख प्रकाश पडला. दरवाजाचा कर्रर्रर्रर्र… आवाज झाला आणि एका हातात विजेरी धरून दरवाजा त्याने पूर्ण आत ढकलला. विजेरीचा प्रकाश त्याने खोलीत मारला मात्र पुढच्या दोन तीन क्षणांतच तो ग्लानी येऊन खाली पडला. तिथे दरवाजाच्या उंबऱ्यातच. ह्यावेळेस मात्र तो स्वत:ला बिलकुल सावरू शकला नाही. कारण त्याने जे समोर बघितले ते अघोरी होते, विक्षिप्त होते, अविश्वसनीय होते. ‘ती’ उपडी मांडी घालून फरशीवर बसली होती. तिच्या एका हातात लालभडक रक्ताने माखलेला सुरा होता. दुसऱ्या हातातून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. तेच ती पित होती आणि तिचे ते लालभडक दात विचकावत हसत होती. तिचा पायघोळ रक्ताने माखला होता. आजूबाजूला माणसाच्या शरीराचे भाग विखुरले होते. त्याच्यादेखील रक्ताचा सडा सबंध खोलीभर पसरला होता.

   त्याला जेव्हा जाग आली, तेव्हा समोरचे दृश पाण्यासारखे संथ हलत होते. डोळे किलकिले करत तो आजूबाजूला पाहू लागला. जणूकाही तो एका वेगळ्याच दुनियेत अवतरला होता. ती संध्याकाळची वेळ होती. सभोवतालचे वातावरण अगदी वेगळे होते. काळाची कितीतरी वर्षे अचानक मागे गेली होती. पण तो तोच होता, आताचा. त्याने बघितले तर आत संपूर्ण घर रिकामेच होते. बाहेर किरमिजी प्रकाश पसरलेला. आतले घर व्यवस्थित लावलेले होते. एक मेज होता. मेजासमोर दोन खुर्च्या होत्या. तो संपूर्ण घर फिरत होता. हो आणि त्याच्या पायाचे दुखणेदेखील थांबले होते किंवा आता त्याच्या ते लक्षातदेखील नव्हते. तो दरवाजाबाहेर गेला. सभोवताली सुंदर शेत होते. कुंपणाच्याभोवती रंगीबेरंगी फुलझाडांची विविध तर्हेची रोपटी होती. पक्षांचा किलबिलाट वातावरणात नवरस भरत होता. सर्व कसे मंगलमय दिसत होते. तो पुन्हा घरात आला. फिरता फिरता त्याची नजर भिंतीवरच्या कॅलेंडरवर पडली. तारीख होती २३ जुलै १९९७. तो एकदम चक्रावून गेला. काळाने वीस वर्षे आधी त्याची रवानगी केली होती. तो विचारात गढून जातोय न जातोय तोच बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. तो पुन्हा दरवाजात गेला. घराच्या मागच्या बाजूस काम करत असलेला गडी खांद्यावरच्या टॉवेलला हात-तोंड पुसत घाईघाईत रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. सभोवताली शेत असल्याने गाडी घरापर्यंत आणणे शक्य नव्हते. तेव्हा मालक लोकांना गाडीतून उतरवून घेण्यासाठी हा गडी त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचला. ‘तो’ दरवाजातूनच हे सर्व पाहत होता.

 

 

To be continued…

तृष्णा …(भाग – १)


   पावसाळ्याचे दिवस होते. रात्रीचा पहिला प्रहर सुरु होता. आकाशात विजांचा कडकडाट होत होता. मध्येच लख्ख प्रकाश पडत होता. रस्त्यावरून त्याची गाडी सुसाट वेगाने धावत होती. अधून मधून बाकीच्या गाड्या अगदी जवळून जात होत्या. डोक्यात विचारांचा लोट वाहत होता. तो कमी करण्यासाठी त्याने बाटली खोलली आणि एक एक घोट घेत एक्सलेटरवरचा पाय दाबत तो गाडी भरधाव वेगाने हाणत होता.

      अचानक गाडीच्यासमोर काही अंतरावर एक माणूस खिशात हात घालून रस्ता क्रॉस करताना त्याला दिसला. त्याने हातातली अर्धवट रिकामी बाटली बाजूच्या सीटवर टाकली आणि जोराचा हॉर्न वाजवला. पुन्हा वाजवला. आणि पुन्हा एकदा वाजवला. अगदी तीन चार वेळा वाजवला. पण इतक्या वेळा हॉर्न वाजवूनदेखील तो माणूस तसाच अजून अजून रस्त्याच्या मध्यावर येत होता. शेवटी त्याने कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण भरधाव वेगाने धावणारी ती गाडी त्या माणसाला उडवून पुढे गेली. त्याने कशीबशी गाडी कंट्रोलमध्ये आणली आणि मागे वळून बघितले तर तो माणूस तिथे तसाच उभा होता. त्याला शिव्या घालण्यासाठी तो गाडीमधून उतरला पण तेव्हा तिथे कोणीही नव्हते. तो पुन्हा गाडीत बसला आणि चावी फिरवली. गाडी हृम..हृम..करत जागेवरच होती. ती काही चालू होईना. स्टीयरिंगवर दोन्ही हात आपटून त्याने दरवाजा उघडला. त्या मुसळधार पावसात भिजत त्याने इंजिनाचे टप वर केले आणि आत डोकं खुपसून इकडच्या तिकडच्या गोष्टी तपासू लागला. सर्व गोष्टी तशा सुरळीत होत्या. धडामदिशी टप खाली आपटून तो तसाच भिजलेल्या अवस्थेत पुन्हा गाडीत बसला. चावी फिरवली. पण गाडी चालू होतंच नव्हती.

      बाहेर पावसाचा तांडव सुरूच होता. इतक्या रात्री आता कोणी मदतीला मिळेल ह्याचे कोणतेच चिन्ह दिसत नव्हते. सर्वत्र काळोख पसरला होता. साधारण तिथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर माळरानात एकच खोपटे होते ज्याचा मिणमिणता दिवा त्या काळोख्या रात्री जाणाऱ्या येणाऱ्यास संमोहित करत होता. तो पुन्हा गाडीतून उतरला. हातात छत्री आणि विजेरी घेतली आणि जमेल तेवढं अंग पावसापासून वाचवत निघाला त्या घराच्या दिशेने.

    वाट चिखलाने भरली होती. विजेरीच्या प्रकाशात आणि विजांच्या लखलखाटात जशी पाऊलवाट दिसत होती त्या अंदाजाने तो पुढे पुढे चालत होता. ते खोपटेवजा घर आता बऱ्यापैकी जवळ आले होते. अनाहूतपणे त्याची पावले लगबगीने पुढे पुढे जात होती. अचानक पायाखालची माती खचली आणि पाय मुरगळून आत रुतला. त्याने तसाच पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला खरं पण तसे केल्याने पाय त्या भिजलेल्या भुसभुशीत जमिनीत आणखी खाली धसत होता. शेवटी तो त्या चिखलात बसला. छत्रीचा दांडा मानेखाली धरून दोन्ही हातांनी हळूहळू पाय वर खेचू लागला. अखेरीस त्याने पाय बाहेर काढला. भिजलेल्या नि कंबरेपासून खाली चिखलाने माखलेल्या अवस्थेत मुरगळलेला पाय खेचत खेचत कसाबसा तो घरासमोरच्या फाटकापर्यंत पोहोचला.

     “अरे कोणी आहे का घरात?” त्याने तिथूनच आवाज दिला. उत्तराची अपेक्षा जवळ जवळ नव्हतीच. त्याने त्या लोखंडी फाटकाची कडी खटखटवली. तरीही आत काहीच हालचाल जाणवली नाही. मग स्वत:च ती बिना कोंड्याची कडी बाजूला सरकवून कर्रर्रर्रर्र…आवाज करत फाटक उघडले आणि आत पाऊल टाकले. सगळीकडे सुनसान वातावरण होते. बघितले तर घराच्या दरवाजाला कडी लावलेली होती. अजूनही पावसाचा जोर कमी झाला नव्हता. घराच्या ओसरीवर एक बाकडा होता आणि घराचे छप्पर ओसरीपर्यंत आल्याने तिकडे पावसाचा मारा कमी होता. दुरून दिसत असलेला तो दिवा एक हातकंदील असल्याचे त्याने पाहिले. त्याच्या प्रकाशात आजूबाजूच्या गोष्टी बऱ्यापैकी दृश्यमान होत्या. त्याने विजेरी बंद केली आणि कोटाच्या खिशात ठेवली. तो मुरगळलेला पाय खेचत त्या बाकड्यापर्यंत आला आणि मट्कन त्यावर बसला. छत्री बाकड्याखाली ठेवली. मुरगळलेला पाय त्याने वर घेऊन पाहिले तर तो बऱ्यापैकी सुजला होता. सकाळपर्यंत आता कोणतेही उपचार करता येणार नाही ह्या जाणीवेने तो विषण्णावस्थेत तसाच बसून राहिला.

      कोटाच्या खिशातून त्याने सिगारेटचे पाकीट काढले आणि त्यातली एक सिगारेट काढून पाकीट पुन्हा खिशात ठेऊन दिले. सिगारेट तोंडात धरून दुसऱ्या खिशातून लायटर काढले आणि तोंडापाशी नेऊन ती सिगारेट शिलगावली. त्या हातकंदीलाच्या प्रकाशात त्याच्या मागच्या भिंतीवर दोन सावल्या स्पष्ट दिसत होत्या.

 

To be continued…

Create a website or blog at WordPress.com

Up ↑