अतर्क्य…(भाग ३)

   बुलेटला किक मारली. मागे पावसकर बसलेले. रात्रीच्या काळोखात हेडलाईटच्या प्रकाशात जसा रस्ता दिसेल तसे ते जात होते. बुलेटचा तो धडधड आवाज वातावरणातील शांततेचा भंग करत होता. पायवाट सोडून बुलेट आता गर्द झाडीत घुसली होती. कसाबसा रस्ता काढत सावंत आणि पावसकर माडाच्या एका उंच झाडाखाली पोहोचले. बुलेटची लाईट चालूच ठेवली. पावसकर हातातली विजेरी चालू करून सावंत सांगतील तिथे सावकाश पाऊल टाकत होते. मध्येच कोण्या टिटवीचा आवाज परिसरात घुमत होता. नारळाच्या झावळ्या आणि इतर पालापाचोळ्याचा जाड थर जमिनीवर तयार झाला होता. त्यातूनच हळूहळू पावलं टाकत दोघं चालत होते. इतक्यात सावंतांसमोर काहीतरी चकाकलं. लागलीच त्यांनी पावसकरांना त्या ठिकाणी विजेरी धरण्यास सांगितली. ते त्या वस्तूच्या जवळ गेले. तिथे एक अर्धवट जमिनीत पुरलेली काचेची बाटली होती. सावंत पुढे जाऊन ती हातात घेणार, इतक्यात पावसकर म्हणाले,

“सायेब थांबा. त्यास्नी हात लावू नगा. ते मला कायतरी येगळंच दिसतया. कुण्यातरी करणी बिरणी केल्यावाणी दिसतंया. ते बगा, मागं टाचण्या टोचल्यालं लिंबबी हायती.”

सावंत सावध झाले आणि दोन पावलं मागे सरकले. आजूबाजूला पाहीलं तर तशा अजून पाच काचेच्या बाटल्या होत्या. वेगवेगळ्या रंगाच्या नि अर्धवट जमिनीत पुरलेल्या.

“सायेब, ही जागा काय बरी दिसत न्हाय. हिकडनं निघाया हावं आपण.”

“थांबा पावसकर! माझं मन म्हणतंय. आपल्या केसचा सुगावा हिथच लागणारे.”

“पण सायेब आपण सकाळी…”

त्यांचं बोलना अर्धवट थांबवत सावंतांनी त्यांच्या हातून विजेरी घेतली आणि तिथे आजूबाजूला काही ठोस पुरावा सापडतोय का त्याचा तपास करू लागले.

   इतक्यात सोसाट्याचा वारा सुरु झाला आजुबाजुची झाडे गदागदा हलू लागली. जमिनीवरचा पालापाचोळा हवेत उडाला आणि फेर धरू लागला आणि बघता बघता त्या माडाच्या झाडाभोवती आगीच्या ज्वाळा पसरल्या. सावंत आत अडकले गेले. पावसकर बाहेरच उभे होते. निश्चल एकटक बघत होते. सावंतांनी बाहेर पडण्याचा महत्प्रयास केला. पावसकरांना जीवाच्या आकांताने हाकादेखील मारल्या पण त्या हाका ज्वाळांच्या बाहेर पोहोचल्याच नाहीत. जणू काही ज्वाळांच्या कळपटामध्ये त्या हवेत विरून जात होत्या. सर्व काही निष्फळ ठरले. थोडा वेळ हा खेळ असाच सुरु राहिला आणि मग एकदम आगीचा डोंब उसळला दोन पुरुष उंचीच्या गडद ज्वाळा भडकल्या. त्यात सावंत आता पूर्णच दिसेनासे झाले. पुढच्या काही क्षणांतच सर्व काही थांबले. तो वारा आणि त्याच्या तालावर नाचणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळादेखील आणि इंस्पेक्टर सावंत, त्या आगीच्या ज्वाळांसोबतच तेदेखील लुप्त झाले. पावसकरांनी बुलेटला किक मारली आणि ते आपल्या घरी परतले. झाल्या प्रकारचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

   सकाळी सावंत गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तसेही गावातले लोक दररोज घडणाऱ्या घटनांमुळे बिथरले होते. ह्या बातमीने तर त्यांना सुन्न केले. कोणीही ह्या बाबतीत अवाक्षरही बोलेना. प्रत्येकाला ही भूतबाधाच असल्याची खात्री पटली होती आणि त्याविषयी चर्चा करून ती बाधा आपल्या घरावर उलटू नये असेच प्रत्येकाला वाटत होते. पावसकरांचे स्टेटमेंट घेण्यात आले. त्यात त्यांनी झाला प्रकार जसाच्या तसा सांगितला. फाईलमध्ये त्याची नोंद झाली. ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणची शक्य तेवढी माहिती गोळा केली गेली आणि फाईल तात्पुरती बंद झाली ती झालीच.

 

३.

   जेवणाचा एक एक घास पोटात ढकलत देशमुख ह्या केसशी निगडीत एक एक गोष्ट बारकाईने तपासत होते त्यावर त्यांचे चिंतन चालू होते. अर्थात ही केस सोडवण्यासाठी इंस्पेक्टर देशमुखांकडे इंस्पेक्टर सावंतांपेक्षा बराच वेळ होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन ते विचार करू शकत होते आणि ते करतदेखील होते. दुनियाभरच्या केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. त्यांच्याकडचा अनुभव हा अधिक विस्तृत स्वरूपाचा होता. आजतागायत त्यांनी दोनशेहून अधिक न सुटणाऱ्या केसेस सोडवल्या होत्या. त्यातल्या दहा वीस केसेस मानवी क्षमतेच्या बाहेरच्या होत्या. त्यात त्यांचा अनेक दिग्गज मानसशास्रज्ञांशी थेट संबंध आला होता. ही केसही त्यातलीच आहे. ह्याची त्यांना जवळजवळ खात्री पटली होती. वारंवार ते पुन्हा पुन्हा सर्व गोष्टी डोळ्याखालून घालत होते. रणजीतच्या डायरीचा घडलेल्या घटनांमध्ये अप्रत्यक्ष संबंध आहे हे त्यांना आता कळून चुकले होते. कारण रणजीतच्या डायरीत लिहिलेली पहिली कथा एका इंस्पेक्टरवर आधारित होती आणि त्या कथेत नायकाचा मृत्यू इंस्पेक्टर सावंतांचा झालेल्या मृत्यूशी मिळता जुळता होता. त्यानंतर दुसऱ्या कथेत एक खानावळीचा मालक शब्दांकित केला गेला होता, ज्याचा शेवट घडलेल्या घटनेशी अगदीच अनुरूप होता. अशाच प्रकारे पुढील सर्व गोष्टी होणाऱ्या खुनांच्या तारखेच्या अगदी उलट दिशेने शब्दांकित केल्या गेल्या होत्या. सर्वात शेवटची कथा होती ती एका लेखकाची. एका रहस्य कथा लेखकाची.

   संध्याकाळ होत आली होती. एखाद्या चित्रकाराने सहज रंग ओतावा आणि त्या रंगांनी एक अलौकिक सौंदर्य धारण करावे अशाच प्रकारे आकाशात सूर्याची ती केशरी, पिवळसर, तांबूस किरणे पसरली होती. किलबिलणारे पक्षी घरट्याकडे परतत होते. एक मोहक निसर्गरम्य दृश्य तयार झाले होते. तेच पाहत चहाचा एक एक घोट घेत देशमुख खिडकीपाशी उभे राहून विचार करत होते. अनुभवाच्या बळावर देशमुखांनी इथपर्यंत मजल तर मारली होती परंतु पुढे त्या डायरीचा झालेल्या घटनांशी संबंध कसा जोडावा हे मात्र काही त्यांना समजत नव्हते. दिवस संपत आला होता. ड्युटीवरून घरी जाण्याची वेळ आली आणि देशमुखांना कोणाची तरी आठवण झाली. त्यांनी वेळ न दवडता फोनचा डायलर फिरवला आणि पलीकडून एक भारदस्त आवाज त्यांच्या कानावर आदळला,

“हेलो, कोण बोलतंय?”

“मी इंस्पेक्टर देशमुख बोलतोय, मला गुरुनाथांशी बोलायचे आहे.” देशमुखांनी प्रत्युत्तर दिले.

“थांबा. बोलावतो.” असे म्हणून समोरच्या गृहस्थाने फोनचा रिसीवर बाजूला ठेवला आणि गुरुनाथांना एक आवाज दिला. बहुदा ते त्यांचे वडील असावेत असा कयास सावंतांनी बांधला आणि पुढच्या काही वेळातच गुरुनाथ फोनजवळ आले.

“बोल मित्रा, आज कशी आठवण काढली.”

“सहजंच रे! एक केस होती.”

“तरीच म्हटलं, कामाशिवाय कसा फोन आला साहेबांचा. बोला बोला, काय सेवा करू शकतो आपली.”

“केस थोडी विचित्र आहे.”

“म्हणजे?”

“म्हणजे, तुला वेळ कधी आहे ते बोल. मला ह्या संदर्भात तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे.”

“ठीक आहे. तू पत्ता दे. मी उद्याचीच गाडी पकडून येतो.”

“बरं.” असे म्हणून देशमुखांनी गुरुनाथांना त्या पोलीस स्टेशनचा पत्ता सांगितला.

एव्हाना काळोख दाटू लागला होता. देशमुख ड्युटी संपवून त्यांच्या खोलीकडे परतले ते एका आत्मिक समाधानाने.

   दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर ते गुरुनाथांच्या आगमनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागले परंतु ते ठिकाणंच इतक्या आडमार्गाला असल्याने शहरातून तिथे पोहोचायला कमीत कमी १०-१२ तासांचा अवधी लागत असे. त्यामुळे देशमुखांनी ती केस सोडून पोलीस स्टेशनवरची इतर कामे मार्गी लावण्याचा सपाटा चालू केला आणि पावसकर व इतर हवालदारांच्या मदतीने बाकीच्या छोट्या मोठ्या केसेस हाताळायला घेतल्या. तसेही त्यांच्यापुढे हे काम दुसऱ्या कोणा पोलीस अधिकाऱ्यावर येणारच होते. तेव्हा त्याचा भार कमी करण्यासाठी त्यांनी जितकं शक्य होईल तितकं काम आटोपते घेतले. त्यात संपूर्ण दिवस निघून गेला. ‘एव्हाना गुरुनाथ यायला हवे होते,’ असे विचार आता त्यांच्या डोक्यात घर करू लागले होते आणि दिवस संपवून फाईल्स खणात ठेवायला ते खुर्चीवरून उठले तोच दारात गुरुनाथ हजर. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करत देशमुखांनी पावसकरांना चहा आणायला सांगितले आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर देशमुखांनी विचारले,

“हे बघ, तू डायरेक्ट इथे दाखल झालायस. दमला असशील. म्हणत असशील तर आपण केस संदर्भात उद्या सकाळी बोलू. आज तू आराम कर.”

“ठीक आहे रे. इतका काही अजून थकलो नाही मी. नुकताच मुलांनी चाळीसावा वाढदिवस साजरा केला. तुझे शुभेच्छा पत्रही मिळाले. त्याबद्दल धन्यवाद!”

दोघांनी एक समाधानकारक स्मित करत एकमेकांकडे पाहिले आणि चहाचा एक घोट घेतला.

“तर बोल काय आहे केस?” मिशांना लागलेला चहाचा व्रण पुसत गुरुनाथांनी मग थेट विषयाला हात घातला.

“हं. तर एक लेखक आणि त्याच्या कथा. प्रत्येक कथेचा शेवट त्या कथानायकाच्या मृत्यूने…” सांगत त्यांनी केसची इत्थंभूत माहिती गुरुनाथांना दिली. एक एक फाईल काढून केस विषयीचे आणि त्यांच्या कयासाचे दाखले ते गुरुनाथांना समजावून सांगत होते. गुरुनाथ शांत चित्ताने बसून सर्व काही ऐकत होते. मग त्यांनी काही प्रश्न विचारले त्याची जमतील तशी देशमुखांनी उत्तरे दिली. दोघांनाही वेळेचे भान नव्हते. एव्हाना घड्याळाचा काटा ११ वर सरकत होता. बाहेर पावसकर पेंग येऊन खुर्चीवर डुलक्या काढत होते.

“पावसकर..” देशमुखांनी आवाज दिला. तसे पावसकर खडबडून जागे झाले आणि केबिनमध्ये गेले.

“इंस्पेक्टर सावंतांचा मृत्यू कशा प्रकारे झाला हे जरा सांगा. कारण त्या वेळेस फ़क़्त तुम्हीच होता तिथे.”

“व्हय पर सायेब मी फकीस्त तिथं व्हतू. माझा त्यात काय बी संबंध न्हाय.”

“मी जे विचारलंय त्याचं उत्तर द्या पावसकर. नक्की तिथे काय घडलं?”

“हं. सांगतु.” म्हणत पावस्कारांनी घडलेला सगळा प्रसंग जसाच्या तसा वर्णन करून सांगितला. त्यानंतर पावसकरांना बाकीच्या मृत्युंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले, ज्याची त्यांनी जमतील तशी उत्तरे दिली. त्यांच्या बोलण्यावरून गुरुनाथांना सर्व गोष्टी हळूहळू स्पष्ट होत होत्या. घड्याळात एक वाजल्याचे टोले पडले.

“देशमुख, बस इकडे.” गुरुनाथ म्हणाले.

“काय झालं?”

“ही केस मी माझ्यापरीने सोडवली आहे.”

“इतक्यात? काल संध्याकाळी तर तू आलास. कमाल आहे तुझी.” म्हणत एक अभिमानास्पद स्मित देशमुखांनी केले.

“आता आणखी ह्या केसमध्ये काहीही न उलगडण्यासारखे राहिलेले नाही.” गुरुनाथांनी स्पष्ट केले.

“म्हणजे?”

“हे बघ, मी आता जे सांगेल ते आमच्या मानसशास्रज्ञाच्या दृष्टीकोनातून. तेव्हा बाकीचे सर्व विचार डोक्यातून काढून  टाक आणि माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे.”

“बरं बोल.” देशमुखांनी संमती दर्शवली.

“हं. तर सर्वसाधारण माणूस त्याच्या मेंदूच्या एकूण क्षमतेच्या फ़क़्त तीन ते चार टक्केच वापर करतो. माणसाने जर त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या शंभर टक्के वापर केला तर तो अगदी काहीही करू शकतो. मग त्याचे शारीरिक बंधन त्याच्या आड येऊच शकत नाही. पण असा माणूस जगात अस्तित्वात आलेला नाही आणि पुढे येण्याचा संभवही जवळ जवळ नाहीच. परंतु सामान्य माणसाच्या तुलेनेने ह्या जगात अशी माणसे आहेत ज्यांनी आपल्या मेंदूच्या क्षमतेचा वापर सात ते आठ टक्क्यांपर्यंत वा त्याहून थोडा जास्त केलेला आहे. रणजीत हा त्यातलाच एक आहे. आता त्याचा मेंदू कितपत प्रगल्भ होता हे तर आता मी सांगू शकणार नाही. तो कोण होता. कुठून आलेला ह्याची माहिती अजूनही अज्ञात आणि त्याची आता आवश्यकतादेखील नाही. कारण तो आता ह्या जगातच नाही. परंतु तो काय होता ह्याची माहिती मी तुम्हाला देतो. तो एक अनन्यसाधारण बुद्धी कौशल्याचा कलावंत होता. त्याच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद होती. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा आणि जमले तर लिहून काढावे. आज ना उद्या ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ह्या ना त्या मार्गाने येतेच. रणजीतने तर आपल्या मेंदूच्या क्षमतेचा विकास आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या तुलनेने प्रचंड प्रमाणात केला होता. शिवाय तो एक लेखक होता. त्याला कोणतीही गोष्ट शब्दांकित करण्यापूर्वी त्या गोष्टीचा विचार करावा लागे आणि मग ती गोष्ट तो त्या डायरीमध्ये लिहित असे. रणजीत कोणतीही गोष्ट लिहिण्यापूर्वी ती स्वत: जगत होता आणि त्यामुळेच रणजीतच्या कथेतील पात्र ह्या वास्तव जगात स्वत:चे अस्तित्व शोधू लागली. त्यासाठी त्यांच्या व्यक्तीमत्वाला अनुरूप मनुष्य शरीराचा त्यांनी आधार घेतला. त्यापुढे घडलेले प्रसंग तुमच्या समोर आहेत. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या मेंदूच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करतो. इन फॅक्ट, त्याच्या एवढ्या प्रगाढ बुद्धी क्षमतेमुळेच तो इतके सारे प्रसंग एका रात्रीत रंगवून ती कथा पूर्ण करू शकला. मिळालेले सर्व पुरावे हे त्याच्या बुद्धीचेच दाखले देत आहेत. हे असे प्रसंग पूर्वी देखील घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या लेखकावरील कथेतील नायकाने त्याच्याच शरीराचा आधार घेतला आणि त्याचा शेवट केला. एक मानसोपचारतज्ञ म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आली.”

“अच्छा! असं आहे तर.”

“हो अगदी असंच.”

“हे सारं माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी किती अतर्क्य होते.”

“हं…बरं मग मी आता निघतो. पहाटेची पहिली एसटी पकडून घराकडे जाईन म्हणतो.”

“असं कसं. तू इतक्या दिवसांनी भेटलायस. तुला असाच निरोप देऊ म्हणतोस. ते काही नाही. तू बस इथे.”

“अरे पण…”

“पावसकर… आमची जरा सोय करा. लगेच.”

“देशमुख ह्याची खरंच गरज…” गुरुनाथांचे बोलणे अर्धवट तोडत देशमुख म्हणले,“अरे एक छोटीसी पार्टी. तसंही एसटीला अजून अवकाश आहे.”

त्यांचं संभाषण चालू असतानाच पावसकर एक मोठी बाटली घेऊन आणि सोबत दोन ग्लास घेऊन आले. हळूहळू दोघेही नशेत धुंद होत होते. पावसकर बाहेर आले आणि तिथल्या बाकड्यावर अंग टाकले. दिवसभराच्या थकव्याने लगेचच त्यांना डोळा लागला. म्हणता म्हणता गप्पा इतक्या रंगल्या की घड्याळात कधी चारचे टोले पडले लक्षात देखील आले नाही. तर्रर्र अवस्थेत देशमुख गुरुनाथांना म्हणाले,

“मी तुला आता माझ्या गाडीने एसटी थांब्यापर्यंत सोडतो. तू मग जा तिथून.” त्यांच्या आवाजात नशेची झिलई चढली होती.

“अरे कशाला देशमुख. मिळेल एखादी गाडी मला रस्त्याने.” गुरुनाथांचीही तीच गत होती

“नाही… तुला एवढं माझा ऐकावाच लागेल”

“बरं ठीक आहे बाबा जसं तू म्हणशील. पण गाडी कोण चालवणार? आपण दोघेही प्यायलेले आहोत सध्या.”

“हा!हा!हा! तर काय झाले? मी तुला पोचवेन. पावसकर झोपलेत, त्यांना झोपूदे.” असे म्हणत देशमुखांनी गुरुनाथांचा हात पकडून त्यांना उठवले आणि हेलकावे खात, झोकांडे जात दोघेही गाडीजवळ पोहोचले. गुरुनाथांना शेजारीच बसवून देशमुखांनी गाडीची चावी फिरवली. गाडीचा हृम्म हृम्म आवाज त्या आजूबाजूच्या शांत परिसरात घुमला आणि गिअरचा दांडा हलवून गाडी मार्गाला लागली. कच्च्या रस्त्यावरून हेंदकाळत त्यांची गाडी अंधारातून मार्ग काढत होती.

    आदल्या दिवसाच्या प्रवासाने गुरुनाथ आता थकले होते. वरून दारूची झिंग डोक्यात भिनली होती. त्यामुळे थोड्या वेळातच ते बसल्या बसल्याच घोरू लागले. इंस्पेक्टर देशमुख जमेल तशी गाडी पळवत होते. पोलीस स्टेशन सोडून गाडी आता बरेच अंतर पुढे आली होती. इतक्यात त्यांना समोरून एक पिवळा दिवा लुकलुकताना दिसला. नशेत चूर झालेल्या डोळ्यांना त्याचा नेमका अंदाज लावता येईना. तो दिवा जवळ जवळ येत होता. डोळ्यांची उघड झाप करून त्यांनी त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला पण छे! हळूहळू तो दिवा जवळ आला. आणखी जवळ आला. अगदी जवळ आला. एक जोराचा हॉर्न वाजला. पुढे ऐकू आला अपघाताचा एक जोरदार आवाज आणि त्यासोबतच दोन करुण किंकाळ्या. देशमुख आणि गुरुनाथ बसल्या जागीच निष्प्राण झाले होते. समोर होता एक विशाल ट्रक ज्याचा एकंच दिवा चालू होता आणि ह्या अपघातानंतर आता त्याही दिव्याचा चकणाचूर झाला होता. पावसकर जेव्हा घटना स्थळी पोहोचले तेव्हा तपास करताना त्यांना देशमुखांच्या खिशात एक कागद सापडला. तोच जो आदल्या दिवशी त्यांच्या फाईलमधून गहाळ झालेला. पावसकरांनी तो उघडला आणि आतला मजकूर वाचला. डोळ्यांत पाणी आणून पुन्हा तसाच तो कागद त्यांच्या खिशात ठेवला. त्यात एक कथानक होते – दोन मित्रांचे; लेखक – रणजीत.

Advertisements

अतर्क्य…(भाग २)

   सकाळी रंगाने कडी खटखटवली. परंतु नेहमीसारखा दरवाजा उघडला गेला नाही. दोन-तीनदा प्रयत्न करून अखेरीस त्याने मास्टर-किने दरवाजा उघडला आणि पाहिले तर आत रणजीतचा देह फासावर लटकला होता. लागलीच रंगाने आरडाओरड करून गाव जमा केला. पोलिसांना खबर लागली. इंस्पेक्टर सावंत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रंगाची, हॉटेलमालकाची कसून चौकशी करण्यात आली. परंतु काही विशेष धागेदोरे हाती लागले नाहीत. त्याच्या खोलीची झडती घेतल्यावर त्याची ती डायरी तेवढी त्यांच्या हाती लागली. ती ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशनला परतले.

    टेबलावरची काही इतर अपरिहार्य कामे आटोपल्यानंतर सावंतांनी ती डायरी वाचायला घेतली. एक-एक कथा वाचताना रणजीतचे व्यक्तिमत्व हळूहळू त्यांच्या लक्षात येत होते. त्याच्या कथेत काहीतरी रहस्य दडले होते. कथा ही नायकाच्या मृत्यूने प्रमाण होत असे. सुरवातीच्या दोन-तीन कथा वाचून त्यांना त्यात काही तथ्य सापडेल ह्याची शक्यता तशी कमीच वाटली. त्यांनी तूर्तास तो नाद सोडला आणि सामान्य पद्धतीने ह्या केसचा तपास करण्यास सुरवात केली. दिवसभराच्या धावपळीने त्यांना थकवा जाणवत होता. कुठेच कसलाच सुगावा लागत नव्हता. कोणावर आरोप करता येईल असा ठोस पुरावा एकाही व्यक्तीविरुद्ध मिळत नव्हता. बरं त्याने आत्महत्या केली म्हणावं तर ती का केली ह्या संदर्भात एखादी चिठ्ठीदेखील त्याच्या खोलीत सापडली नव्हती. हॉटेलचे मालक आणि रंगा त्यावेळेस तिथे नव्हते ह्याचे पुरावे त्यांच्या समोर होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नव्हता. ही नेहमीच्या केसेस सारखी केस नाही ह्याची त्यांना कल्पना आली होती. दिवस ढळला तरी कुठलाच सुगावा लागत नव्हता. शेवटी तपास नक्की कोणत्या दिशेने करावा ह्याचा विचार करत करतच त्यांनी आपल्या बुलेटची किक मारली आणि ड्युटी संपवून घरी परतले.

    दुसऱ्या दिवशी पहाटे सावंतांच्या घरातला फोन वाजला. रणजीतच्या शेजारी राहणाऱ्या जोडप्यातील स्त्रीचा खून झाला होता. लागलीच सावंतांनी हवालदारांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले आणि ते स्वत:देखील काही वेळातच तिथे दाखल झाले. तिचा नवरा तिच्या शेजारी स्तब्ध बसून होता. अंगातल्या सफेद सदऱ्यावर रक्ताचे लाल शिंतोडे उडालेले आणि हातात सुकलेल्या रक्ताचा डाग राहिलेला सुरा. तिच्या नवऱ्याला ताबडतोब ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशनला आले. कदाचित त्यानेच रणजीतचादेखील खून केला असावा अशीही शंका त्यांच्या मनात येऊन गेली. पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी त्याला एका कोठडीत डांबले आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तो फ़क़्त दिग्मुढावस्थेत बसून होता. काहीही न बोलता. जणू झाल्या प्रकाराने त्याची वाचाच गेली होती. त्याला त्या रात्री तसंच नजरकैदेत ठेवण्यात आलं.

    दिवस तिसरा. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. “हॅलो इंस्पेक्टर सावंत बोलतोय, काय..??” बुलेटवर किक मारून सावंत हॉटेलमालकाच्या घरी पोहोचले. जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. लागलीच त्यांनी रंगाला ताब्यात घेतले आणि त्याच कोठडीत डांबले. त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. परिणाम तोच. अनिश्चितता. काहीच उलगडले नाही. हे कोडे दिवसेंदिवस अधिकच क्लिष्ट होत होते. आज मात्र सावंत घरी गेलेच नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये बसूनच केसचा विचार करत होते आणि तसेच टेबलावर डोकं ठेऊन त्यांना मध्यरात्री कधीतरी झोप लागली.

    सकाळचा कोंबडा आरवला तो आणखी एका मृत्युच्या बातमीने आणि हा मृत्यू बाहेर नव्हे तर पोलीस स्टेशनलाच झाला होता. त्या मृत स्त्रीच्या नवऱ्याचा. कोठडीत असतानाच. शेजारी रंगा भारल्यासारखा त्याच्या मृतदेहाकडे फ़क़्त बघत होता. कसा झाला ह्याचं विधान करण्यासाठी डॉक्टरांना जास्त वेळ लागला नाही. रंगाने आदल्या रात्रीत त्याचा गळा दाबून शेवट केला होता. आता मात्र सावंतांनी रंगाला फैलावर घेतले. त्याच्यावर सपासप पट्ट्याने वार केले. अंगावर थंडगार पाणी ओतले. तरीही रंगाचं एकंच उत्तर होतं, ”म्या काल राती फकिस्त झोपलो व्हतु आणि सकाळ उटलो तर ह्यो मरून पडल्येला.” महत्प्रयासानंतरही त्याचे उत्तर बदलत नाही हे बघून त्यांनी त्याचे जेवणखाण थांबवले आणि तसेच अंधारात बंद केले.

    हळूहळू पाणी डोक्यावरून वाहत होतं. ही केस हाताबाहेर जात असल्याची कल्पना सावंतांना येत होती. परंतु त्यांनी अजूनही धीर सोडला नव्हता. गाठीशी असलेल्या सर्वानुभावाचा ते यथोचित वापर करत होते. खुनाचे प्रत्येक ठिकाण पुन्हा पुन्हा स्वत: जातीने लक्ष घालून ते तपासात होते. ह्यात वरिष्ठांकडून मदत घेण्याचा संभव जवळजवळ नव्हताच. त्याचं कारण हे गाव एकतर हमरस्त्यापासून बरेच आत वसलेले. दळणवळणाच्या, संदेश वाहनाच्या सोयीसुविधा जवळ जवळ नव्हत्याच आणि जरी कोणाकडून मदत घेण्याचे ठरवले तरी चार मुडदे पडेपर्यंत तरी वाट का पाहिली म्हणून नाकर्तेपणाचे खापर त्यांच्या माथी फुटले असते. शिवाय चारही घटना इतक्या सलग घडल्या की इतरत्र काही हालचाल करण्यास त्यांना संधीच मिळाली नाही.

    दिवस पाचवा. पोलिसांचा ताफा त्यांच्या ठाण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या खानावळीत पोहोचला. चहा-नाष्ट्यासाठी नव्हे तर खानावळीच्या मालकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा चौकशी. पुन्हा एक नवीन तपास. त्याअंती समजले की रात्री खानावळ बंद करतेवेळी गॅसशेगडीची मुठ फिरवून बंद केली गेली नव्हती. दारे खिडक्या बंद असल्याने रात्रभर तो गॅस तसाच सबंध खानावळीत पसरला आणि सकाळी जेव्हा मालकाने सिगरेट शिलगावत खानावळीचा दरवाजा उघडला तेव्हा मोठा आवाज झाला आणि आगीच्या लोटात त्याचा शिल्लक राहिला फ़क़्त जळालेला देह. ह्या घटनेचा सूत्रधार कोण. ओलीस धरणार तरी कोणाला. हा अनाहूतपणे झालेला मृत्य होता की कोणी जाणूनबुजून केलेला खून. आणखी एक दिवस संभ्रमाचा. नियतीने चालवलेल्या अकल्पित रहस्याचा. अपयशाच्या जाणीवेने कधीही न बुजणारी मनाला लागलेली टोचणी घेऊन अजगराच्या विळख्यातील असहाय्य जनावराप्रमाणे इंस्पेक्टर सावंत आपल्याच खुर्चीवर बसून तडफडत होते. होणाऱ्या घटना थांबत नव्हत्या. रात्रीचा काळोख आता गिळायला उठत असे. पुढे फ़क़्त अंधार दिसत होता. सावंतांची मती हळूहळू भ्रष्ट होत चालली होती. हतबल अवस्थेत ते डोकं धरून बसून होते. त्या रात्री तर त्यांनी जेवणाला हातदेखील नाही लावला. उद्याचा दिवस कोणाच्या मृत्यूने उजाडतोय त्याचीच वाट बघत कधीतरी मध्यरात्री त्यांना डोळा लागला. सुदैवाने त्या सकाळी कसलीही अघटीत वार्ता आली नाही. सावंतांनी तो पूर्ण दिवस झालेल्या घटनांचा पुन्हा एकदा छडा लावण्याचा प्रयत्न केला. कुठेना कुठेतरी पाणी मुरतंय ह्याची त्यांना खात्री होती. परंतु होणाऱ्या घटना त्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेर होत्या. दिवस ढळेपर्यंत त्यांनी पावसकरांना सोबतीला घेऊन हॉटेल विसावा आणि खानावळीजवळ वास्तव्य करणाऱ्या लोकांची परत एकदा चौकशी केली. त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते का त्याचा अंदाज घेतला. परंतु ह्या बाबतीतही त्यांची तशी उपेक्षाच झाली. सूर्यास्त होऊन आता बराच अवकाश झाला होता. सावंत केबिनमध्ये एकटेच बसले होते. टेबलावर बऱ्याच फाईल अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

“पावसकर…” सावंतांनी आवाज दिला.

“हां सायेब…” पावसकर लगबगीने केबिनमध्ये आले.

“चला.”

“कुठं?”

“एका ठिकाणी तपास करायचाय.”

काहीतरी उमगले होते. कुठेतरी काहीतरी सापडण्याची शक्यता वाटत होती. सावंत केबिनमधून निघाले तेव्हा त्यांच्या टेबलवर रणजीतच्या डायरीतली काही पाने वाऱ्याने फडफडत होती.

 

To be continued…

अतर्क्य…(भाग १)

१.

     अखेरीस इंस्पेक्टर देशमुखांनी ती फाईल उघडली. नव्हे त्यांना ती उघडावीच लागली. वरिष्ठांनी त्यासाठीच तर त्यांची बदली इथे देवली गावात केली होती. समुद्र किनारपट्टीपासून दूर वसलेल्या ह्या गावावर निसर्गाची कायमच कृपा होती. ती केस सोडवत असताना त्यावेळच्या इंस्पेक्टर सावंतांचा गूढ मृत्यू झाला. तेव्हापासून ही केस हातात घेण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यामुळेच ती गेली दहा वर्षे प्रलंबित राहिली. आजपर्यंत कितीतरी अशा न सुटलेल्या केसेस इंस्पेक्टर देशमुखांनी आपल्या कारकिर्दीत सोडवल्या होत्या. त्याचे बक्षीस म्हणून परवा दुपारी एक टपाल त्यांच्या टेबलावर आले, ज्यात त्यांची तातडीने देवलीच्या पोलीस ठाण्यात बदली केली होती आणि कालच्या एसटीने देशमुख ह्या पोलीसठाण्यात हजर झाले. गावात तसे फार लोक राहत नसत. दीडशे-दोनशे माणसे असावीत आणि जे होते त्यांची घरेदेखील एकमेकांपासून दूर दूर होती. येण्या-जाण्यासाठी फ़क़्त एक-दोन पायवाटा आणि गाडीवाहनासाठी एक कच्चा रस्ता होता.

   फाईल अगदी बुरशी लागण्याच्या पावित्र्यात होती. वरवरची धूळ झटकून देशमुख पाने चाळू लागले. जवळपास प्रत्येक पानावर झुरळाची ती लहान लहान अंडी होती. काही पानांवर उंदीर जमातीने यथेच्छ ताव मारला होता. अधली मधली पाने गहाळ झाल्याचेदेखील त्यांना जाणवत होते. त्यांनी जागेवरूनच आवाज दिला,

“ओ पावसकर, हा दरवाजा लावून घ्या आणि मी सांगेपर्यंत कोणालाही माझ्या केबिनमध्ये पाठवू नका.”

   पावसकर हवालदार म्हणजे ह्या पोलीस ठाण्यातलं जुनं खोड. अगदी पोलीस ठाणे बांधल्यापासून ते इथेच. त्यांच्या सोबतच्या कितीतरी हवालदारांची सतत बदली होत असे. पण पावसकर मात्र इथेच पाय घट्ट रोवून होते. चायवाल्या पोऱ्याने सकाळीच टेबलावर आणून ठेवलेला चहा केव्हाचा थंड झालेला. परंतु आल्यापासून फाईलमध्ये खुपसलेलं डोकं वर काढायला देशमुखांना फुरसतच नव्हती. अचानक फाईलमधून एक घडी केलेला कागद गहाळ होऊन खाली पडला. त्यांनी तो उचलला आणि उघडून बघितला. वरवर वाचून पुन्हा त्याची घडी करून त्यांनी तो त्यांच्या खिशात ठेवला. आता मध्यान्हाची वेळ होत आली होती. ते अजूनही केबिनमध्येच होते. बाहेर पावसकर पिंपळाच्या कट्ट्यावर बसून तंबाखू मळत नवीन भरती झालेल्या तरण्या हवालदारांना समजुतीच्या चार गोष्टी शिकवत होते आणि तेदेखील त्यांच्या हो ला हो म्हणत तंबाखूचे बकाणे भरत होते.

“म्या काल राती फकिस्त झोपलो व्हतु आणि सकाळ उटलो तर ह्यो मरून पडल्येला.” एक अनपेक्षित आवाज कट्ट्याच्या दुसऱ्या बाजूने आला. तशी पावसकरांनी हातातली काठी त्याच्या अंगावर उगारली आणि तो वेडा घाबरून पळून गेला.

   एवढ्यात सायकलची घंटी वाजवत एक पोरगा तिथे हजर झाला. त्याच्या सायकलीला जेवणाचा डबा लावला होता. “खाणावळीतून आलोया. देशमुख सायबांसाटी डबा घेऊन. सायेब हायेत काय?” तो पोरगा म्हणाला.

   खानावळीचे मालक गेल्यापासून तिकडे जाणाऱ्या लोकांचा ओढा फारच मंदावला होता. तरी अधूनमधून विरळ लोक तिथे आता दिसायचे. देशमुखांकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळेच त्यांनी आपल्या जेवण-खाण्याची सोय इथेच करून घेतली होती.

   पावसकर उठले आणि त्याच्या हातातला डबा घेऊन त्याला जायला सांगितले. तो डबा घेऊन ते केबिनच्या दरवाजापाशी गेले आणि हलकेच दारावर ठकठक केली.

“आत या”, आतून आवाज आला.

साहेबांची परवानगी मिळताच दरवाजा उघडून ते आत गेले आणि डबा टेबलावर ठेऊन पुन्हा बाहेर जायला निघाले.

“थांबा पावसकर.”

“काय सायेब.”

“तुम्ही किती वर्षांपासून इथे आहात?”

“व्हतील आता पंचवीस एक वर्ष.”

“म्हणजे ह्या केसबद्दल तुम्हाला खडान् खडा माहिती असणार, नाही का?”

“व्हय म्हंजी जेवढं ठाव हाय तेवढं समदं सांगीन म्या तुम्हासनी. पर माजं ऐकशाल तर तुमी माघारी आपल्या गावाकडं जावा. ह्यात लई लोकास्नी आपला जीव गमविला हाये. ही केस काय सादी न्हवं.”

“हे सांगण्यासाठी थांबवलं नाही मी तुम्हाला आणि ह्यापुढे मी विचारेन तेवढंच उत्तर द्यायचं. स्वत:चा शहाणपणा दाखवायचा नाही. समजलं?”

“चुकलं सायेब. मी आपलं…”

“ठीक आहे. या आता तुम्ही.”

 

२. (पूर्वार्ध)

   संध्याकाळची वेळ होती. विसावा हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कवरची घंटी वाजली. लगबगीने मालक बाहेर आला. चार फुट उंचीचा, सदरा-पायजमा परिधान केलेला, खांद्यावर कसलीशी झोळी अडकवलेली नि पायात जुनाट वाहणा अडकवलेला एक गृहस्थ तिथे उभा होता.

“रूम मिळेल का?”

“मिळंल की. किती दिस ऱ्हाणार?”

“माहित नाही.”

“दर दिसाचं भाडं पन्नास रूपे. नाव बोला.”

“रणजीत.”

“हिथं अंगठा द्या,” म्हणत मालकाने त्याच्यासमोर शाईची दौत पुढे केली. उर्वरित जुजबी माहिती भरून नोंदणीचे कार्य पूर्ण झाल्यावर मालकाने एका खोलीची चावी रणजीतच्या हातात सोपवली आणि रंगाला हाक मारून त्याला त्याच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.

   खोली अगदीच जेमतेम होती. कुठे भिंतीचे पोपडे उडालेले तर कुठे चिरा गेलेल्या. नावाला एक लाकडी कपाट. खिडकीशेजारी एक लोखंडी खाट. त्यावर जीर्ण झालेली गादी. डोक्यावर कराव कराव पंख्याचा आवाज नि सबंध खोलीत पिवळ्या दिव्याचा पसरलेला रोगट प्रकाश. खोली दाखवून रंगा निघून गेला. तशी ह्या गावात लोकं विरळंच होती. त्यात महिन्याकाठी एखादं गिऱ्हाईक हॉटेलची पायरी चढत असे. गावात एवढं एकंच हॉटेल असल्यामुळे गिऱ्हाईकाला पर्याय नसे. रणजीत आला त्यावेळेसही ते हॉटेल रिकामेच होते. त्याने खांद्यावरची झोळी जमिनीवर ठेवली आणि खाटेवर बसून खिडकीबाहेरचे दृश्य न्याहाळू लागला. चहुबाजूला माडाची उंच झाडी. शिवाय आंबा, फणस, पिंपळ मध्येच कुठेतरी आपले अस्तित्व राखून होते. सूर्याचे मावळतीचे किरण आकाशात विविध रंगछटा भरत होते. त्याच्या गूढ कथालेखनासाठी ही खोली अत्यंत साजेशी होती.

   न्हाणीघरातली बादली घेऊन तो हापशीवर गेला आणि पाणी भरून वर आला. स्वच्छ तोंड, हातपाय धुवून तो पुन्हा खाटेवर बसला आणि आपल्या झोळीतून मतकरींची कादंबरी काढली. त्या पिवळ्या प्रकाशात रणजीत कादंबरीतील गूढ कथेचा आस्वाद घेत होता. जवळपास अर्ध्या-एका घटकेने दारावरची कडी वाजली. त्याने दरवाजा उघडला तर समोर रंगा जेवणाचे ताट घेऊन उभा होता. त्याने रंगाचे आभार मानत ते ताट स्वीकारले आणि दरवाजा लावून पुन्हा खाटेवर आला. गरमागरम जेवणावर यथेच्छ ताव मारत रणजीत नवीन नवीन कल्पना डोक्यात शिजवत होता. त्या वातावरणात त्याच्या विचारांचे बेभान घोडे चहु दिशांना उधळत होते. जेवण आटोपताच त्याने झोळीतून त्याची डायरी काढली आणि मग त्याच्या कल्पनांची सरिता थेंबाथेंबाने अक्षररुपात पानावर वाहू लागली. त्या वातावरणातील नशेची झिंग त्याच्यातील लेखकाला कथेतील नायकाशी एकरूप करत होती. कथेमध्ये वेगवेगळी पात्रे मिसळली गेली आणि थरारकतेच्या अत्युच्च शिरोबिंदुला स्पर्शून ती कथा एका अनिश्चित घटनेवर प्रमाण झाली. त्याच वेळी बाहेर सोसाट्याचा वारा सुटला. खिडकीची तावदाने धडाडधाड गजांवर आपटली. लगबगीने त्याने तावदानांना कडी घातली आणि डायरी बंद करून तो पिवळा दिवा विझवला नि झोपी गेला.

   सकाळी रंगाने दरवाजा खटखटवला तेव्हा डोळे चोळत चोळत तो उठला. त्याच्या हातून चहाचा कप घेऊन रणजीत पुन्हा आपल्या जागेवर आला. खिडकीतून सकाळचे ते मनोरम्य दृश्य पाहत घोटाघोटाने तो चहा रिचवत होता. सकाळची आन्हिके उरकून तो हॉटेलबाहेर पडला आणि परतला तो थेट उन्हे कलू लागल्यावर. दिवसभर तो कुठे होता ह्याची कल्पना त्याच्याशिवाय इतर कोणालाच नव्हती. मग पुन्हा मतकरींची कादंबरी आणि जेवण आटोपल्यावर पुन्हा एक थरारक कथा. असा त्याचा दिनक्रम झाला.

    दोन एक दिवसांतच त्याच्या शेजारच्या खोलीत एक नवविवाहित जोडपे राहण्यासाठी आले. सहज ओळख होताच त्याला कळाले की ते ह्या हॉटेल मालकाच्याच नात्यातले आहेत. दिवसामागून दिवस सरत होते. म्हणता म्हणता आठवडा झाला. रात्रीचे जेवण आटोपले आणि कथेला सुरवात झाली. रणजीतची लेखणी पानांवर भराभर धावू लागली. एकामागून एक कल्पना सुचत गेल्या आणि त्या जशाच्या तश्या कागदावर उमटत गेल्या. योगायोगाने त्या डायरीच्या शेवटच्या पानावर कथेचा शेवट झाला आणि पुढच्या क्षणी अचानक खोलीतला दिवा लुकलुकत बंद झाला. सर्वत्र दाट काळोख पसरला. पंख्याचा कराव कराव आवाज शांत झाला. बाहेर वाऱ्याचा आवाज येत होता. त्याने खिडकीतूनच रंगाला हाक मारली पण हाकेला साद मिळाली नाही. पुन्हा एकदा हाक मारली, तरी तीच गत. शेवटी खिडकीतून येणाऱ्या अंधुकश्या उजेडात त्याने झोपण्याची तयारी केली आणि काही क्षणांतच तो निद्राधीन झाला.

 

 

To be continued…

Create a website or blog at WordPress.com

Up ↑