तृष्णा : पर्व – २ (भाग – ३)

      शिवरामने खिशातली छोटी विजेरी बाहेर काढली. तिच्या प्रकाशाचा वर्तुळाकार झोत समोर तीन चार फुटांवर पडत होता. त्याच्या मदतीने दोघेही पायाखालचा चिखल तुडवत हळूहळू वाट काढत एक एक पाऊल टाकू लागले. बघता बघता त्यांनी बरेच अंतर कापले. आता त्या काळोखात आणखी वीस फुटांवर प्रकाशाचे पुसटशे वलय त्यांना दिसू लागले. तो तोच दाराबाहेरच्या ओसरीवरचा मिनमिनणारा हातकंदील होता. म्हणजे ते पुन्हा घराजवळ येऊन ठेपले होते. मनातली धाकधूक पायांमधले त्राण शोषून घेत होती. तरीही पुढे जाण्याखेरीज गत्यंतर नव्हती. तेव्हा दोघेही पुन्हा त्या झपाटलेल्या घरात प्रवेश करण्यासाठी सिद्ध झाले. दोघांनाही पुढे काय होणार ह्याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती तरीही त्याला सामोरे जाणे त्यांच्या कर्तव्याचा एक भाग होता. तोच तो पूर्ण करणार होते. चिंब भिजलेल्या अवस्थेत त्यांनी पुन्हा एकदा ओसरीवरच्या पायरीवर पाय ठेवला न ठेवला तोच कंदीलातला दिवा जोराने फडफडायला लागला. हवेच्या माऱ्याने दरवाजा त्याच्या चौकटीवर हळूहळू आदळत होता. दोघांनीही सभोवताली नजर फिरवली. तिच्या असण्याचे कोणतेही चिन्ह तूर्तास तरी त्यांना तिथे जाणवले नाही. परंतु वातावरणातील गूढता त्यांच्या मनात भीती उत्पन्न करण्यासाठी पुरेशी होती. इतक्यात ती कंदीलातली ज्योत विझली आणि सर्वत्र अंधार पसरला. ते दोघेही ओसरीवर उभे होते. पुन्हा त्या घरात प्रवेश करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. परंतु ते शक्य नव्हते. रवींद्रच्या बाबतीत तर नाहीच नाही. त्यांना त्या खोलीत प्रवेश करणे क्रमप्राप्त होते आणि त्यांनी तेच केले.

       कर्रर्र्र्रर्र्र्र…. आवाज करत रवींद्रने घराचा मुख्य दरवाजा आत लोटला. दरवाजातून काही अंतरावर पडणाऱ्या विरळ प्रकाशाखेरीज आतमध्ये सर्व मिट्ट काळोख होता. शिवरामने खिशातली विजेरी पुन्हा एकदा बाहेर काढून खोलीत प्रकाश टाकला मात्र भीतीने त्यांची बोबडीच वळाली. ‘ती’ तिथे उभी होती. स्तब्ध. निश्चल. अगदी दुकानातल्या एखाद्या पुतळ्यासारखी. क्षणभर तोंडातून आवाज फुटेनासाच झाला. दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला आणि काहीही आवाज न करता आत एक एक पाऊल टाकू लागले. हळूहळू इंचाइंचाने ते तिच्या जवळ जवळ जात होते. ती मात्र तशीच उभी होती. तिच्या तसे उभं राहण्याने रवींद्रच्या मनात भितीप्रद शंका निर्माण होत होती. एव्हाना ते दोघेही खोलीच्या आत शिरले होते. दरवाजातून खोलीत पडण्याऱ्या प्रकाशाच्या परिघाच्या बाहेर मिट्ट काळोखात त्यांच्या नकळत ते दोघेही उभे होते. त्यांचं पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं. परंतु वाऱ्याने हलणाऱ्या केसांव्यातिरिक्त तिचा इतर कोणताही अवयव अजिबात हालचाल करत नव्हता. असाच काही वेळ निघून गेला. क्षणाक्षणाला मघाच्या तिच्या किळसवाण्या भयंकर रुपाची आठवण त्या दोघांनाही येत होती आणि त्यातच बाहेरच्या वाऱ्याच्या वेग वाढला. बाहेरच्या उंच गवताच्या सळसळीचा आवाज कानापर्यंत त्यांच्या पोचत होता. खिडकीची घट्ट रुतलेली तावदाने उघडून आपटू लागली. दरवाजाची फळी चौकटीवर धाडधाड आपटली. त्या दोघांनीही डोळे गच्च मिटून घेतले. परंतु हे वादळ काही वेळापुरतेच मर्यादित होते. लागलीच पुन्हा सर्व शांत झाले. आपण अजून जिवंत आहोत की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी डोळे उघडले आणि त्यांना पुन्हा एक धक्का बसला.

      ‘‘ती’ तिथे उभी होती मघाशी. आता कुठे आहे?’ इतक्या थंड वातावरणातही रवींद्र आणि शिवराम दोघेही घामाने डबडबले होते. ‘अशी कशी गायब होऊ शकते. एकवेळ ती गायब होऊ शकेल पण तिचं शरीर, ते मात्र तिथेच असायला हवे होते.’ असे विचार मनात घोळवत रवींद्र शिवरामच्या साथीने एक एक पाऊल पुढे टाकत होता. अचानक त्याचा पाय अडखळला आणि तो पडला तो थेट त्या जमिनीवर आडवे झालेल्या तिच्या धुडावर. झटकन स्वतःला सावरत तो उठला आणि शिवरामकडे एका चिंताग्रस्त कटाक्ष टाकला.

“तिने पुन्हा तिच्या देहाचा त्याग केला आहे. कारण ह्या देहात तिच्यावर अनंत बंधने आहेत. तीच तिला आता नकोशी झाली आहेत. परंतु आपल्यासाठी मात्र हे अजिबात सुलक्षण नाही. ती आता कोणत्याही क्षणी कोणत्याही मार्गाने आपल्या दिशेने येऊ शकते आणि आपण बेसावध असताना…” रवींद्रचे शब्द मध्येच तोडत शिवराम म्हणाला,

“मग साहेब आता करायचं तरी एक काय?”

“एकंच मार्ग आहे शिवराम! तिला हवी ती गोष्ट देणं.”

“म्हणजे?”

“आपण सुरवातीला ह्या घरात प्रवेश केला तेव्हा आपल्याला काय काय दिसलं, आठवतंय? ते लाल शिंतोडे, भिंतीवरच्या चित्रातला हातातला तो रक्तरंजित सुरा… काही कल्पना येते आहे का? रक्ताची तिची तहान गेल्या वीस वर्षात भागलेली नाहीये आणि पुढेही अगणित काळ ती तशीच राहणार आहे. तिचा आपल्यावर होणारा अनपेक्षित हल्ला टाळायचा असेल तर तिला जे अपेक्षित आहे ते देणं गरजेचं आहे.”

“म्हणजे?”

“जा आतल्या घरातून तो चाकू घेऊन ये.”

“पण साहेब…”

“जा म्हणतोय ना…” रवींद्रच्या मनात काहीतरी ठाम निर्धार होत होता.

       कोणत्यातरी अघोरी घटिकेला समोर जाण्यासाठी तो सिद्ध झाला होता. शिवराम लागलीच हातातली विजेरी दिवानखाण्यातल्याच एका भिंतीला टेकवून ठेवली आणि आत जाऊन पेटीतून एक चाकू घेऊन आला. रवींद्रच्या मनात नक्की काय चालू आहे ह्याची पुसटशी कल्पना त्याच्या मनाला चाटून गेली. तरीही तो गप्प राहिला. रवींद्रने तोपर्यंत तिच्या देहाला उचलून त्याच खोलीतल्या एका खुर्चीवर बसवले होते. डाव्या बाजूला मान टाकून ती निश्चेष्ट डोळे मिटून होती. तिच्या चेहऱ्यावरचे केस त्याने बाजूला सारले मात्र क्षणभर त्याचे हात थरथर कापू लागले. तिचं ते हिडीस रूप इतक्या जवळून पाहताना त्याचा स्वत:वरचा ताबा सुटत होता. लगेचच शिवरामने त्याला पाठीमागून आधार दिला आणि त्याचा तोल सावरला. दोघांनीही तिचे हात पाय त्या खुर्चीला घट्ट आवळून बांधले. मग मात्र रवींद्रने मागचा पुढचा कसलाही विचार न करता केलेला निर्धार पार पडण्याचे निश्चित केले आणि उजव्या हाताने घट्ट धरलेला तो धारदार चाकू डाव्या हाताच्या बोटावरून फिरवला. नशिबाने जखम इतकी खोल झाली नाही परंतु रक्त येण्यासाठी तेवढी जखम पुरेशी होती. हळूहळू त्या रक्ताने त्याचं बोट माखू लागलं. त्याने ते तसंच तिच्या ओठांपाशी नेलं आणि रक्ताचा एक एक थेंब तिच्या मुखात पडेल अशा रीतीने धरलं. समोर होत असलेलं ते चित्र इतकं भयंकर होतं परंतु आता दोघांचीही नजर आणि मन आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांमुळे स्थिर झाले होते. दोघांपैकी कोणालाही अवसान गाळून चालणारच नव्हते. कारण आता कोणत्याही क्षणी तिचा कायाप्रवेश होणार होता आणि त्यासाठी दोघांच्याही मनाची तयारी झाली होती.

       पुढच्या काही क्षणांतच बाहेर सोसाट्याच्या वारा वाहू लागला. जणू तिच्या येण्याची तो चाहूलच देत होता. घरात एका अनामिक किंकाळीचा आवाज आला. दोघांचंही लक्ष भिंतीच्या आधाराने टेकवून ठेवलेल्या विजेरीच्या प्रकाशाकडे गेलं. त्यात भिंतीवरची चित्र आणखीनच भयावह दिसू लागली होती. हो, ते लंबूळके बिनशिराचे धड आता त्यांच्याकडे वळून पाहत होते. त्याच्या हातातल्या सुऱ्यावरचे रक्त टप टप करत आता खरंच ओघळत होते. मग ती चित्र त्यांच्यादेखत हलू लागली. आपल्याला भास होत आहे हे ते दोघेही एकमेकांना सांगत होते परंतु त्यांच्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या गोष्टींवर अविश्वास दाखवणे त्याक्षणी त्यांना शक्य नव्हते. अचानक आतल्या खोलीतून एका लहान मुलीच्या बीभत्स हसण्याचा आवाज आला. आजूबाजूला नक्की काय होते आहे, ह्याचा त्यांना अर्थ लागेपर्यंत एक जोराची वावटळ मुख्य दरवाजातून आत आली आणि खोलीतल्या अंधारात लुप्त झाली. भिंतीवरची चित्र एका तालात हलत होती. पुन्हा पुन्हा त्याच त्याच कृती करत होती. इकडे रवींद्रच्या बोटातून वाहणाऱ्या रक्ताचा प्रवाह वाढतंच होता. तरीही त्याने केलेला निर्धार त्याला मागे हटू देत नव्हता. चित्रांचा हलण्याचा वेग हळूहळू वाढू लागला. आतल्या खोलीतून हसणाऱ्या मुलीचा आवाज कानाचे पडदे फाडत होता. रवींद्र आणि शिवराम भारल्यागत हा सर्व खेळ पाहत होते. कशीबशी तंद्री मोडून शिवरामने भिंतीजवळ ठेवलेली विजेरी हातात घेतली आणि पुन्हा तो रवींद्रजवळ आला. रवींद्रचं भान अजून थाऱ्यावर नव्हतं. ते पाहून शिवरामने त्याचा खांदा धरून त्याला गदागदा हलवलं. त्याने रवींद्रची तंद्री भंगली आणि तो भानावर आला. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्याच वेगाने घडत होत्या. शिवरामने त्या विजेरीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर टाकला आणि पुन्हा एकदा तिच्या हिडीस रूपाने तो काही क्षण बिथरला. रवींद्रला मात्र खात्री होती की त्याचा हा प्रयोग तिला तिच्या देहात खेचून आणणारच. फ़क़्त त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नव्हते. परंतु आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरून तो लवकरच यशस्वी होईल असे त्या दोघांनाही वाटत होते. तसा विश्वास ते एकमेकांना देत होते आणि बोलता बोलताच रवींद्रची किंकाळी संपूर्ण परिसरात पसरली. तिचा कायाप्रवेश झाला होता आणि त्याचवेळी तुटलेल्या दातांची कवळी ताणून तिने त्याचे रक्ताने ठिबकणारे बोट तोडून घेतले होते. तशी एक घाणेरडी शिवी हासडत रवींद्रने तिच्या खुर्चीला जोरदार लाथ मारली. त्याच्या प्रहाराने ती जमिनीवर कोसळली. परंतु घट्ट बांधून ठेवल्यामुळे ती खुर्चीतच बसून होती. आता मघाशी होणाऱ्या सगळ्या घटना थांबल्या होत्या. बाहेरची वावटळ, ती भिंतीवरची चित्रं, आतल्या घरातला लहान मुलीचा आवाज, सर्व सर्व कसं शांत झालं होतं. आवाज होता तो फ़क़्त रवींद्रच्या कण्हण्याचा, विव्हळण्याचा.

       त्याही परिस्थितीत रवींद्रने माघार घेतली नाही. उजव्या हाताने खिशातून रुमाल काढत शिवरामला दिला आणि त्या तुटलेल्या बोटाच्या जखमेवर बांधण्यास सांगितला. त्याने लगबगीने घेऊन त्याच्या त्या भळाभळा वाहणाऱ्या जखमेवर करकचून बांधला. त्यामुळे रक्ताचा प्रवाह थोड्याफार प्रमाणात मंदावला होता. परंतु आता वेळ दवडून चालणार नव्हतं. कारण आलेली संधी पुन्हा कधी येईल ह्याची काहीच शाश्वती नव्हती. तेव्हा लगबगीने काहीतरी हालचाल करणे गरजेचे होते आणि त्यांनी तेच केले.

“शिवराम, हिचा देह तळघरात ज्या ठिकाणी ठेवला होता, त्या ठिकाणी थोडा शोध घे. तिथे ती लॉकेट नक्कीच सापडतील. ती घेऊन ये. जा लवकर”.

       बाहेर पावसाने विश्रांती घेतली होती. त्याच संधीचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं. शिवराम तातडीने हातातली विजेरी घेऊन स्वयंपाकघरात गेला आणि तिथल्या त्या खड्ड्यात उडी मारली. इकडे रवींद्रने पडलेली खुर्ची तिच्यासकट कशीबशी सरळ केली आणि रुमालातून ठिबकत असलेलं रक्त तिच्या तोंडाशी धरलं. ती पुन्हा तिचा देह सोडून जाऊ नये ह्यासाठीच त्याची धडपड चालू होती. ते रक्त ती लपलप करत पित होती. एव्हाना शिवरामला विजेरीच्या प्रकाशात ती दोन्ही लॉकेट तिथेच जमिनीवर पडलेली मिळाली. ती गळ्यात अडकवून खाचांमध्ये पाय रुतवत तो लगबगीने वर आला.

“साहेब, ही घ्या”, म्हणत शिवरामने ती लॉकेट रवींद्रसमोर धरली.

ती लॉकेट जवळ आल्याबरोबर तिच्या अंगातली दानवी शक्ती चवताळली. जोरजोरात उसळ्या मारू लागली. परंतु खुर्चीला घट्ट बांधल्यामुळे ती तिथून हलूच शकत नव्हती.

“अरे माझ्याकडे काय देतोस. त्यातलं एक माझं लॉकेट बाजूला ठेव आणि दुसरं तिच्या गळ्यात बांध.”

रवींद्रची आज्ञा पाळून तो खुर्चीच्या मागच्या बाजूने गेला आणि तिच्या धडपडीला न जुमानता त्याने ते तिच्या गळ्यात बांधलंच. त्याबरोबर एक बेरकी सूर काढून ती जोरात किंचाळली आणि पुढच्याच क्षणाला एकदम शांत झाली. तसे दोघेही तिच्यापासून लांब झाले. नक्की काय होतंय ह्याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. एक शेवटचा प्रयत्न म्हणून चर्चमधील एका सराईत फादरप्रमाणे रवींद्रने हातातलं लॉकेट तिच्या समोर धरलं आणि पुन्हा तेच ठेवणीतले मंत्रोच्चार करू लागला. शिवराम हातातली विजेरी तिच्यावर रोखून उभा होता.

       पुढच्या काही वेळातच त्यांना दिसले की हळूहळू तिच्या शरीरातून वाफेसारखे काहीतरी बाहेर पडत आहे. नव्हे ती वाफच होती. आधी हातातून, मग पायातून, मग डोक्यातून आणि मग सर्वांगातूनच तिच्याभोवती वाफेचे वलय निर्माण झाले. त्याच्या हातातील लॉकेटचे केंद्र आणि तिच्या गळ्यातील लॉकेटचे केंद्र ह्यांच्यामध्ये विजेचा एक संयोग निर्माण झाला. त्याने दोघांचेही डोळे दिपले गेले. ते असह्य होऊन दोघेही एक एक पाऊल मागे टाकत मुख्य दरवाजाच्या बाहेर आले. दोन्ही लॉकेटमधील वीज तशीच लखलखत होती आणि हळूहळू तिचे रुप अधिकाधिक रौद्र होत होते. रवींदचे मंत्रपठन सुरूच होते. त्याच्या आवाजातील तीव्रतादेखील आता वाढली होती. ते आता ओसरीपर्यंत येऊन थांबले होते. एव्हाना शिवरामने विजेरी बंद करून खिशात ठेवली होती. इतका वेळ थांबलेली वावटळ घराभोवती पुन्हा फेर धरू लागली आणि काही वेळातच एक कर्णकर्कश आवाज झाला. पुढच्याच क्षणाला रवींद्र आणि शिवराम होते तिथून दहा-पंधरा फूट लांब फेकले गेले. धुराचा एक मोठा लोट आकाशात उसळला गेला. आजूबाजूला निवाऱ्याला बसलेला पक्षांचा थवा फडफड करत उंच उडाला. संपूर्ण परिसरात एक घाण कुबट वास पसरला. बराच वेळ रवींद्र आणि शिवराम बेशुद्धावस्थेतच त्या माळरानात पडून होते.

        काही वेळातच इतका वेळ दडून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. त्याचे टपोरे थेंब त्यांच्या चेहऱ्यावर पडताच डोळे किलकिले करत ते दोघेही उठले. आपण खरंच यशस्वी झालो आहोत ह्याची खातरजमा करून घेणे गरजेचे होते आणि त्यासाठी पुन्हा त्या घरात जाणे आवश्यक होते. अंगाला लागलेला चिखल झटकत दोघेही उठले आणि एक एक पाऊल हळूहळू टाकत त्या घराच्या दिशेने जाऊ लागले. दुरूनच घराच्या लाकडी छपरातून धुराचा अरुंद लोट आकाशात विलीन होताना दिसत होता. वरून पावसाचा मारा असल्याने त्याचे प्रमाण हळूहळू कमी कमी होत होते. धडपडत, पाय ओढत कसेबसे दोघेही पुन्हा त्या फाटकासमोर आले. तो कुबट वास एव्हाना जवळपास क्षीण झाला होता. परंतु त्या दोघांनाही त्याची पुसटशी अनुभूती घराच्या आजूबाजूच्या परिसरात येत होती. काल सकाळी इथे ते आले होते, त्यावेळेसची आणि आताची परिस्थिती किती वेगळी होती, ह्याची जाणीव दोघांनाही होत होती. त्यावेळेस त्यांना खासच होणाऱ्या घटनांचा अंदाज नव्हता. परंतु आता सगळे होऊन गेले होते. कदाचित सगळेच संपले होते. फ़क़्त ते स्वत:च्या डोळ्यांनी पाहणे आवश्यक होते. महत्प्रयासाने तो फाटकाचा चिखलात रुतलेला दरवाजा आत ढकलला आणि आत पाऊल टाकले. काल सकाळी जेव्हा त्यांनी असेच पाऊल टाकलेले तेव्हा एका सुप्त शक्तीचा वावर असल्याची जाणीव रवींद्रच्या मनाला चाटून गेली होती. परंतु आता तसे काहीच जाणवले नाही. मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी ओसरीवर पाऊल टाकले आणि समोर पाहिले तर घराचा मुख्य दरवाजा गायब होता. आत पाण्याचा आवाज येत होता. शिवरामने लगबगीने खिशातून विजेरी काढली आणि पेटवून समोर धरली. एक सुखद धक्का त्या दोघांनाही बसला. तिला ज्या ठिकाणी बांधून ठेवले होते ती खुर्ची तर गायब होतीच परंतु त्याचसोबत त्याच्या खाली जमिनीत आणि तसाच वर छताला गोलाकार खड्डा पडला होता. ज्यातून पावसाचे पाणी आत येत होते. समाधानपूर्वक चेहऱ्याने दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि घरात पाऊल टाकले. घरातील ती शक्ती पूर्णपणे नाहीशी झाली होती, ह्याची त्यांना मनापासून जी जाणीव झाली ती शब्दांकित करणे अशक्य होते. इतक्यात रवींद्रचा वॉकीटॉकी वाजला.

“साहेब, तुम्हाला कधीपासून ट्राय करत होतो. पण तुमच्याशी संपर्कच होत नव्हता.” – गाडीतील एक सहकारी.

“बोल.” रवींद्र.

“तुमचं तिकडचं काम…” त्याचं बोलणं अर्धवट तोडत रवींद्रने उत्तर दिलं, “संपलं. आता पुढच्या काही वेळातच आम्ही तिकडे पोचतोय.”

“ओके सर.”

“ओव्हर एंड आउट” म्हणत रवींद्रने वॉकीटॉकी बंद केला आणि एकवार पुन्हा त्या घराकडे पाहिले.

      जे झाले ते खरंतर त्याच्या हाताबाहेरच होते. तरीही शेवटपर्यंत झुंजत त्याने त्या शक्तीचा समूळ नाश केला होता आणि त्याचा पुरावा त्यांच्यासमोर होता. ज्या ठिकाणी खुर्ची होती त्या ठिकाणी जमिनीत पडलेला खड्डा कितपत खोल होता ह्याचा त्या विजेरीच्या प्रकशात तितकासा अंदाज येत नव्हता. परंतु जिथपर्यंत तिचा प्रकाश पोचत होता त्याच्या कितीतरी आणखी खोल तो खड्डा असल्याचा अंदाज त्यांना येत होता. ते काम खासच त्यांचे नव्हते.

“साहेब, सदा?”

“अरे हो, चल…”

“पण कुठे?”

“तो ज्या भागात गेला होता तिथेच.”

       ते दोघेही घराच्या मागच्या बाजूने पूर्वेकडे निघाले आणि काही वेळातच त्यांना पाण्याने भरलेला एक स्थूल निश्चेष्ट देह गाळाच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसला. तो सदानंदच होता, ह्यात दोघांनाही तिळमात्र शंका नव्हती. शिवरामने त्याचा मृतदेह खांद्यावर टाकला आणि त्यांची पावले परतीच्या वाटेकडे वळाली. घराकडे पाठ फिरवून मूळ रस्त्याकडे जाणाऱ्या, घोटाभर चिखलाने भरलेल्या पायवाटेने ते निघाले. अजूनही पावसाची रिपरिप सुरूच होती. परंतु त्याचा त्यांना आता तितकासा फरक पडत नव्हता.

Advertisements

तृष्णा : पर्व – २ (भाग – २)

      इकडे झाडाखाली बसलेल्या त्याने पुन्हा माघारी घराकडे जाण्याचे निश्चित केले आणि तो पुन्हा आल्या पावली परत निघाला. चालता चालता खिशातला वॉकीटॉकी बाहेर काढला. तो देखील पाण्याने भिजला होता आणि कदाचित आता निकामी झाला होता कारण त्याच्या ऍन्टेना जवळची लाल लाईट बंद झाली होती. त्याने दोन तीन वेळ सहज तळहातावर आपटला परंतु तो काही सिग्नल पकडत नव्हता. अखेरीस तो ट्राऊजरमध्ये ठेऊन तो आपल्या मार्गी सरळ चालू लागला. दुपार केव्हाच टळून गेली होती. संध्याकाळची नक्की कोणती वेळ ते सांगणे तसे कठीण होते. परंतु आभाळ पूर्ण काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेलेलं. पाऊस पुढचे पाच सहा तास काही थांबणार नाही ह्याची जवळ जवळ खात्रीच झाली होती. काही वेळाने ते घर नजरेच्या परिघात आले. पावसामुळे आजूबाजूला तसं सगळं अंधुक अंधुकच दिसत होते. एव्हाना खाली गुडघाभर पाणी साचल्याने भरभर पावलं टाकणं शक्य होत नव्हतं. पण परतीचा मार्ग सापडल्यामुळे त्याच्यात थोडी हुशारी आली होती.

       रवींद्र आता बऱ्यापैकी आत आला होता. एक मंद कुबट वास तिथे दरवळत होता. पायाखालचे पाणी आता जवळजवळ जमिनीत मुरले होते. त्याच्या समोर आणि परतीच्या दोन्ही वाटेवर पूर्ण अंधार होता. मनातली धाकधूक क्षणाक्षणाला वाढत होती. घरात सापडलेले ते रक्ताचे डाग नक्कीच कोणत्यातरी अघोरी घटनेचे समर्थक होते. इतक्यात त्याला तिथून साधारण पन्नास एक पावलांवर प्रकाश जाणवला. तो नक्कीच भास नव्हता. रवींद्र त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. जसजसा तो जवळ जवळ जात होता तसतसा तो कुबट वास अधिकाधिक तीव्र होत होता आणि प्रकाशाची व्याप्ती इंचाइंचाने वाढत होती. त्याच्या पायाखालची पाण्याची पातळी आता जवळ जवळ नाहीशी झाली होती. पुढच्या दोन एक मिनिटांत तो त्या जागी पोचला. इथे मात्र त्याला नाकाला रुमाल बांधण्याखेरीज गत्यंतरच नव्हती. तिथे भिंतीच्या एका आडोशात एक झरोका होता. तिथून बाहेरचा अंधुक प्रकाश आत त्याच्या निमुळत्या पट्ट्यांमधून झिरपत होता. इतका वेळ अंधारातून चालत आल्यानंतर अचानक आलेल्या ह्या प्रकाशात नजर स्थिरावण्यासाठी काही वेळ गेला. रवींद्र त्या झरोक्याच्याखाली गेला आणि वर मान करून काही दिसते का त्याचा अंदाज घेऊ लागला. इतका मुसळधार पाऊस असूनही तिथून पावसाचे पाणी आत ठिबकत नव्हते. म्हणजे नक्कीच तिथे छप्पर असणार. कदाचित त्या घराचंच. त्याच्या मनात फ़क़्त एक शंका येऊन गेली. त्याने आजूबाजूला हाताने चाचपडलं. तिथे पाणी झिरपून ओल्या झालेल्या मातीच्या भिंती होत्या. त्याचे हात चिखलाने माखले. ते त्याने तसेच झटकले आणि कोटाला पुसले. कोणत्याही आधाराशिवाय दहा फूट वर जाणे त्याला शक्यच नव्हते. त्याने इकडे तिकडे पाहिले. जवळपास एखादी उपयोगाची वस्तू सापडते का ह्याचा तो त्या विरळ अंधुक प्रकाशात तपास करू लागला. इथे पायाखालची जमीन थोडी कच्ची खडबडीत होती. ह्यात पाण्याचा अंश तसा फारच कमी होता. तरीही चालताना ठेचकळायला होत होते. त्या विरळ प्रकाशात पायाखालच्या उंचसखल जमीनीचा नीट अंदाज येत नव्हता.

       चालत चालत तो त्या झरोक्यापासून थोडा दूर आला. तिथे मात्र प्रकाशाचा काही अंशच परावर्तीत होत होता. तिथून त्याला समोर एक मोठा काळा खडक दिसला आणि तिथे त्याचा रस्ता बंद झाला. तो त्या खडकाच्या जवळ गेला आणि इतक्यात त्याचा पाय कसल्यातरी बोचक्याला अडखळला आणि त्याचा तोल गेला. पटकन त्याने समोरच्या खडकावर हात टेकवले आणि स्वत:ला सावरलं. खाली बघितलं तर एक काळे बोचके होते. दुर्गंधीचा उगम तिथेच होता. तो खाली बसला आणि डोळे मोठे करत त्या बोचक्यावरून हात फिरवू लागला. त्याच्या हाताला काहीतरी खरबरीत लागले. एखाद्या गोणपाटासारखे. त्याने चारही बाजूने हात फिरवला. ते लांबीला थोडे जास्तच होते. साधारण चार पाच फूट असावे असा अंदाज त्याने मनातल्या मनात बांधला. डोळ्यांना अजून काहीच स्पष्ट दिसत नव्हते. सर्व काही स्पर्शाच्या जोरावर तर्कवितर्क बांधले जात होते. इतक्यात त्याला वर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. तो पुन्हा त्या झरोक्यापाशी गेला आणि “सदा… शिवराम… कोण आहे तिकडे?” असा जोरात आवाज दिला.

       पावलांचा आवाज थांबला. मग पुन्हा बराच वेळ कसलाच आवाज आला नाही. तो पुन्हा त्या बोचक्याजवळ आला. खाली बसून त्याने दोन्ही बाजूने हात त्या बोचक्याखाली घातला आणि ते जागेवरून हलवले. त्याला ते अपेक्षेपेक्षा वजनाने खूपच हलके वाटले. त्याने ते हलवल्या बरोबर त्याच्यावरचे ‘ते’ एक वजन सरकून खाली जमिनीवर पडले. आवाज न आल्यामुळे त्याला ते जाणवलेदेखील नाही. त्याने तसेच ते तिथून ओढत ओढत त्या झरोक्याच्या खाली आणले. दुर्गंधीने अगदी गुदमरायला होत होते. तरीही मनाची उत्कंठा स्वस्थ बसू देत नव्हती. ते जे काही होते ते त्याला अनावरीत करून पहायचे होते. आजपर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीत त्याने कितीतरी गूढ आणि मानवी मनाला दाह पोचवून सहज त्याचा तोल ढासळू शकतील अशी दृश्ये स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली होती. परंतु ती परिस्थिती वेगळी होती. त्यात केलेले खून आणि इतर अत्याचार हे एका जिवंत मानवाने केलेली कृत्ये होती. इथे खासच तसे नव्हते. त्यामुळे ह्या केसचे येणारे अनुभव आणि होणारे परिणाम ह्या सगळ्याच बाबतीत तो अनभिज्ञ होता. त्याच्या मनात एक साशंकता होती आणि तीच आता दाटून आली होती. त्याने नाकाला लावलेला रुमाल अधिकच करकचून बांधला. कोटाच्या खिशातून हातमोजे काढले. ते हातात चढवून तो त्या अंधुकश्या प्रकाशात त्या बोचक्याचं थोडा वेळ निरीक्षण करू लागला आणि मग मनाचा हिय्या करून त्याने बोचक्याच्यावर कापडाने बांधलेल्या गाठीला हात घातला. आणि ती तो उघडणार इतक्यात,

“साहेब, तुम्ही इथे? आणि ते तुमच्यासमोर काय आहे?”

       एका अनपेक्षित वेळी आलेल्या आवाजाने रवींद्र जागीच स्तब्ध झाला. क्षणभर छाती जोरात धडधडायला लागली. शिवराम, त्याचा सहकारी वरच्या झरोक्यातून आवाज देतोय हे त्याच्या लक्षात आले तेव्हा तो भानावर आला. वर पाहिले तर खरोखरीच शिवराम होता. त्या पट्ट्यांमधून वाकून तो त्याच्याकडे पाहत होता.

“थांबा साहेब मी ही जाळी काढता येते का ते पाहतो.”

       असे म्हणत त्याने जाळीच्या पट्ट्यांमध्ये आपली बोटे अडकवून जोर लाऊ लागला. पण वर्षानुवर्षांचा गंज पकडलेली ती जाळी इतक्या सहज निघेल असं अजिबात दिसत नव्हतं. तरी सर्व शक्तीनिशी शिवराम तोंडाचे वेडेवाकडे हावभाव करत ती जाळी काढण्याचा प्रयत्न करतच होता. रवींद्र तोपर्यंत जागेवरच उभा राहून शिवरामचा चाललेला खटाटोप पाहत होता.

“कुठे कडी कोंडा आहे का बघ रे.”

“नाही साहेब, ही जाळी खालच्या तिच्या चौकटीवर घट्ट रुतून बसलीये. थांबा, मी काही सामान मिळतंय का ते बघतो,” असं म्हणत शिवराम तिथून उठला आणि खोलीभर हिंडू लागला.

       बघता बघता त्याला स्वयंपाकगृहातल्या त्या मोडक्या फडताळाच्या बाजूला एक लाकडी पेटी दिसली. तिथे खाली बसून त्याने तिच्यावरून हलकाच हात फिरवला. प्रचंड जळमटांनी ती माखली होती. त्या पेटीला मोठा टाळा होता. आता पुन्हा कोणताही जोर लावण्याची त्याच्या मनाची आणि शरीराची तयारी नव्हती. त्याने सरळ खिशातून बंदूक काढली आणि धाडधाड करत गोळ्यांच्या दोन फैरी त्या टाळ्यावर झाडल्या. तसा तो आपोपाप जागेवर गळून पडला. अचानक आलेल्या गोळ्यांच्या आवाजाने रवींद्र बिथरला आणि त्याने जागेवरूनच,

“ शिवराम..!” अशी जोरात हाक मारली आणि तितक्यात शिवराम त्याला पुन्हा त्या पट्ट्यांमधून दिसला. त्याच्या हातात काहीतरी होते पात्यासारखे मोठे.

“साहेब करवत, त्या लाकडी खोक्यात सापडली. थांबा आता.” म्हणत त्याने भरभर हात चालवला आणि कराकर आवाज करत त्या जाळीची एक एक पट्टी कापून काढली.

       जाळी काढल्यामुळे तिथला प्रकाशाचा विस्तार काही प्रमाणत रुंदावला. त्यात रवींद्रला झरोक्याखालच्या भिंतीवर चढउतार करण्यासाठी काही खाचा दिसल्या.

“साहेब, तुमच्या शेजारी ते काय आहे?”

“तेच पहायचे आहे. तू एक काम कर आजूबाजूला कोणती रश्शी, दोरखंड आहे का बघ.”

“बरंय”, म्हणून शिवराम तिथून उठला आणि काही वेळातच एक जाडजूड दोरखंड घेऊन परत आला. त्या झरोक्याच्या खिडकीतून त्याने तो हळूहळू खाली सोडला. त्याला ते गाठोडे बांधून रवींद्रने त्याला ते वर ओढण्याचा आदेश दिला. तसा जमेल तसा अलगद त्याने ते बोचके वर घेतले आणि मग त्याची गाठ सोडवून,

“हां साहेब. या आता” म्हणत त्याने पुन्हा तो दोरखंड खाली सोडला. तसा रवींद्र एकेका खाचेत पाय देऊन वर चढू लागला. काही वेळातच रवींद्रचे डोके त्या झरोक्याच्या खिडकीतून वर आले. मग त्याने दोन्ही हाताने बाजूच्या फळ्यांवर जोर देऊन आपले पूर्ण शरीर त्या खड्ड्यातून बाहेर काढले आणि शेजारच्या भिंतीला टेकून मोठा श्वास घेत बसून राहिला. ते तेच स्वयंपाकघर होते. त्या बोचक्याच्या दुर्गंधीने केव्हाचा श्वास अडकून पडला होता. आता त्या दुर्गंधीला जरा मोकळीक मिळाली, तशी त्याची तीव्रता हळूहळू विरळ होऊ लागली. लागलीच शिवरामने ते बोचके रवींद्रपासून दूर नेले आणि दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात आणून ठेवले. रवींद्र खोकत खोकत त्या खोलीच्या मुख्य दरवाजातून बाहेर आला. शिवराम देखील नाकावर गच्च रुमाल आवळून तिथून बाहेर पडला. रवींद्रने खिशातून सिगरेटचं पाकीट काढून त्यातल्या दोन सिगरेट काढल्या. एक ओठांच्या चंबूत धरली आणि दुसरी शिवरामला देऊ केली. इतक्या घडामोडींनंतर सिगरेटच्या झुरक्याची त्यांना खासच गरज वाटली.

       काही वेळ असाच शांततेत गेला. आतापर्यंत रात्रीचा पहिला प्रहर सुरु झालेला. पावसाचा जोर कमी झाला होता.

“सदा?” – रवींद्र.

“नाही साहेब, म्हणजे आपण वेगळे झाल्यानंतर त्याची आणि माझी काहीच भेट नाही झाली. तो कुठे गेलाय काहीच कल्पना नाहीये.” – शिवराम.

ते ऐकून रवींद्रने पुन्हा एक जोरदार सिगरेटचा झुरका मारला. त्यांचे गाडीतले सहकारी कुठे आहेत, त्यांनी बोलावलेली नवीन गाडी आली की नाही ह्याचा अजून काहीच पत्ता नव्हता. रवींद्रने खिशातला वॉकीटॉकी बाहेर काढला. पाहिलं तर त्याच्यादेखील ऍन्टेना जवळची लाल लाईट बंद झाली होती. त्यानेदेखील दोन तीन वेळ तळहातावर तो आपटला परंतु सिग्नल काही पडला गेला नाही. अंधाऱ्या धूसर प्रकाशात रस्त्यापर्यंत त्यांची नजर पोहोचताच नव्हती. सिगरेट निम्मी अर्धी संपली तेव्हा इतका वेळ शांततेत कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा रुद्रावतार घेतला. क्षणभर लक्ख प्रकाश सबंध परिसरात पसरला आणि आकाशात विजेचा कडाडकाड आवाज झाला. पुढच्याच क्षणी घराचा मुख्य दरवाजा धडामदिशी त्याच्या चौकटीवर आदळला. रवींद्र आणि शिवरामने लागलीच मागे वळून बघितले. तोंडातली सिगरेट पायाखाली विझवून ते दोघेही त्या दरवाजाजवळ गेले. हाताने दरवाजा आत ढकलण्याचा प्रयत्न केला पण कसे कोण जाणे तो आतून बंद झाला होता. रवींद्रने एक वार शिवरामकडे पाहिले. दोघेही दोन पावलं मागे सरकले आणि पूर्ण जोरानिशी त्या दरवाजाला धक्का दिला तसा धाडधाड आवाज करत तो आत उघडला गेला. ते दोघेही आत शिरले आणि एक अत्यंत विलक्षण गोष्ट त्यांच्या नजरेस पडली. रवींद्रने तळघरातून वर आणलेलं ते बोचकं आता… आता पूर्ण रिकामं झालं होतं. ते दोघेही त्या बोचक्याकडे गेले. जिथे आता फ़क़्त एक जीर्ण झालेलं गोणपाट होतं. रवींद्रने ते हातात घेतलं. उघडून बघितलं पण आता खरोखरंच उशीर झाला होता. त्यातलं ‘ते’ केव्हाच गायब झाला होतं. आता येणारा प्रत्येक क्षण आणखी भयंकर असणार होता. कारण लवकरच त्यांचा सामना एका विकृत शक्तीशी होणार होता. इतक्यात बाहेर पुन्हा विजेचा प्रचंड आवाजात कडकडाट झाला, ज्याने त्या दोघांचही लक्ष त्या गोणपाटातून विचलित होऊन बाहेरच्या आवाजाकडे गेले. त्यांनी जागेवरूनच मान वळवून दरवाजाकडे पाहिले मात्र दोघेही जागच्या जागी गोठले गेले. दरवाजात ‘ती’ होती. विजेच्या लख्ख प्रकाशात तिचा तो सडलेला देह तरीही हाताची कुठेकुठे चामडी लोंबते आहे, सफेद पायघोळाच्या आत पायाची पूर्ण हाडे, त्यांवर नावाला त्वचेचे पातळ आवरण, गुढघ्यापर्यंत तिचे केस आणि हाताची बोटभर लांब वाढलेली नखं. त्या दोन तीन क्षणांच्या विजेच्या प्रकाशात इतकेच तिचे काय ते विद्रूप हिडीस रूप त्यांच्या दृष्टीस पडले. ह्र्हर्ह्र्रर्र्र-हर्ह्र्हर्ह आवाज काढत ती दरवाजात उभी होती. इतक्या वर्षानंतरदेखील तिच्या शरीराचा बऱ्यापैकी भाग अस्तित्वात होता. काही वेळातच डोळ्यांना लागलेली तंद्री तुटली आणि रवींद्र ताडकन उभा राहिला. शिवरामच्या खांद्याला धरून त्याला देखील उभे केले. हलकेच तिने एक पाऊल घसरत उंबऱ्याच्या आत सरकवलं. तसे ते दोघेही मागच्या भिंतीला टेकले. बाहेर विजांचा कडकडाट सुरूच होता. ‘ते’ धूड हळूहळू एक एक पाऊल सरकवत त्यांच्या दिशेने येतंच होतं. त्यांनी आजूबाजूला बघितले. स्वयंपाकघरातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्यांच्या लक्षात आला. दोघेही तडक त्या दिशेने धावले. पण व्यर्थ! ते दार बंद झाले होते. बाहेरच्या पावसाचे पाणी मात्र त्याच्या फटीतून आत येत होते. दोघांनी पुन्हा सर्वशक्तीनिशी त्या दवाजाला धक्का दिला. एकदा-दोनदा… पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट हे करण्यात त्यांचा काही मौल्यवान वेळ मात्र वाया गेला.

       “साहेब, इथून या.” म्हणत शिवरामने रवींद्रला तो खड्डा दाखवला जिथून काही वेळापूर्वीच तो वर आलेला. फटीतून आत येणारे ते पाणी खड्ड्याच्या काठावरून आत ओसरत नव्हते. त्याला वगळून खोलीभर साचत होते. आता पुन्हा त्या खड्ड्यात उडी घेण्याची वेळ आली होती आणि त्याखेरीज त्या दोघांकडे दुसरा पर्यायदेखील नव्हता. भिंतीवरच्या त्या खाचांवरून उतरण्यासाठीचा वेळ त्यांच्याकडे मुळीच नव्हता. ‘ती’ स्वयंपाकघराच्या त्या फाटलेल्या पडद्यापर्यंत आली होती. दोघांनी धडाधड दहा फूट खोल उड्या मारल्या आणि खाली जमिनीवर एकमेकांच्या अंगावर पडले. लागलीच स्वत:ला सावरून दोघेही स्थिर झाले. पाण्यातून येणारा तिच्या पायांचा आवाज स्पष्ट ऐकू होता. त्या अंधुकश्या प्रकाशात पुन्हा वाट शोधणे खरंतर कठीणच! परंतु तरीही हाताने पायाने चाचपडत दोघेही रस्ता शोधत होते. त्याच वेळी रवींद्रच्या पायाला काहीतरी अनुकुचीदार टोचले. नशिबाने पायातल्या गंबुटामुळे तळपायात ते घुसले नाही. त्याने तसाच भिंतीचा आधार घेऊन एका हाताने ते खेचून काढले. ते ‘ते’च होते जे गाठोडे हलवताना त्यावरून गळून पडले होते. ख्रिस्तधर्माचे अभिमंत्रित लॉकेट.

“शिवराम, आपल्यावरचे संकट टळले आहे.” रवींद्रने शाश्वती दर्शवली.

       त्याने त्याच्या गळ्यातले लॉकेट काढले आणि ते दोन्ही एकमेकांना गच्च बांधले. एव्हाना ‘ती’ त्या खड्ड्यापासून अगदी काही पावलेच दूर होती. तिचं शीर खाली उभे असलेल्या दोघांच्या दृष्टीक्षेपात आले होते. रवींद्रने दोन्ही हातांची एकमुठ करून त्यात ती लॉकेटची जोडगळी घट्ट पकडली आणि ठेवणीतले काही मंत्रोच्चार पुन्हा पुन्हा म्हणू लागला. खरंतर तो करीत असलेल्या मंत्रोच्चाराने ‘ती’ पूर्णपणे उर्जाविरहित होणे त्याला अपेक्षित होते. पण तसे काहीच झाले नाही. त्या लॉकेटपासून निर्माण झालेले वलय तिच्यापर्यंत पोचताच ती जागेवरच स्तब्ध झाली आणि तिच्या चेहऱ्यावरील केस क्षणार्धात हवेत उडाले. ह्यावेळी प्रथमच त्यांना तिच्या कुरूप, पोखरलेल्या, हिडीस चेहऱ्याचे दर्शन झाले. तिची लालभडक जीभ तुटलेल्या दंतपंक्तीतून वसवसत बाहेर येत होती. डोळ्यांच्या खोबणीतील ते सफेद गोळे आत खोलवर गेलेले दिसत होते. तिचा तो अवतार पाहून रवींद्रच्या अंगातलं सगळं अवसानच गळून पडलं. त्याच्या हाताची मुठ सैल झाली आणि ती लॉकेटची जोडगळी त्यातून अलगद निसटून जमिनीवर पडली.

“साहेब, चला… चला इथून,” म्हणत शिवराम रवींद्रचे दोन्ही खांदे धरून त्याला उठवलं.

       कसाबसा स्वत:चा तोल सावरत रवींद्र उठला आणि रवींद्र ज्या अंधाऱ्या वाटेने इथपर्यंत पोचला होता त्याच वाटेने दोघेही पळत तिथून पसार झाले. जसजसे ते तिथून दूर जात होते तसतसा तिचा तो विकृत हसण्याचा आवाज हळूहळू क्षीण होत होता. अखेरीस रवींद्र वरून जिथे पडला होता त्या जागेपर्यंत ते येऊन पोचले. कसेबसे धापा टाकत ते मातीच्या उभ्या भिंतींना टेकून उभे होते. वरच्या त्या गोलाकार बोळातून बाहेर सुखरूप पडण्याचा मार्ग त्यांना सापडला होता. साधारण तीन-साडेतीन फूट व्यासाच्या आणि दहा फूट उंचीच्या त्या दंडगोलातून वर जाण्यासाठी त्यांनी आपले दोन्ही पाय बाजूच्या भिंतींत रुतवले आणि त्यावर जोर देत हळूहळू ते वर सरकू लागले. काही वेळातच ते दोघेही त्या खड्डयातून बाहेर आले. आजूबाजूला गडद अंधार होता. पाऊस रिमझिम सुरुच होता. त्यात जिवंत त्या घरातून बाहेर पडता आल्याचे तेवढे समाधान त्यांच्या चर्येवर होते. ही केस सोडवण्याचे बाकी सगळे मार्ग तूर्तास तरी बंद झाले होते. शिवराम उठला. “सदा…!” अशी जोरात हाक मारली. पण हाकेस उत्तर काही मिळाले नाही. तेवढ्यात रवींद्रनेदेखील स्वत:चा तोल सावरत,

“चल, त्याला शोधूया”, म्हणत शिवरामच्या पाठीवर थाप मारून आपले ध्येय्य तात्पुरते तरी निश्चित केले.

 

 

To be continued…

तृष्णा : पर्व – २ ( भाग – १)

        पहाटेची वेळ. भास्करकांतीने संपूर्ण आकाश उजळू लागलं होतं. रात्रभर पडणाऱ्या पावसात दडून बसलेली पाखरे आता किलबिलत मुक्त विहारत होती. रात्रीच्या त्या राक्षसी काळ्या ढगांची जागा शुभ्र विरळ ढगांनी घेतली होती. अंधारातील तो कोलाहल आता थांबला होता. ते गडगडणारं हास्य रात्रीच्या अस्तासोबतच मावळलं होतं. उरलं ते फ़क़्त एक भयाण घर. चहूबाजूंनी रानटी गवताने वेढलेलं. पाऊस थांबल्यामुळे आजूबाजूला साचलेलं पाणी ओसरलं होतं. सगळीकडे चिखल मात्र झाला होता. ‘त्या’ची ती गाडी तशीच रस्त्याच्या कडेला थांबलेली आणि बाजूला होती नुकतीच सायरन वाजवत आलेली पोलिसांची गाडी. गाडीतील त्याच्या मोबाईलमुळे त्याचे ठिकाण शोधणे पोलिसांना जास्त कठीण गेले नाही. मात्र गाडीत तो दिसत नाही हे पाहून त्यांनी तिथेच आजूबाजूला त्याचा तपास करण्यास सुरवात केली.

       दिवसाच्या लख्ख उजेडात ते घर आता तिथून सहज दिसत होते. एव्हाना हळू हळू उन्हे वर येऊ लागली होती. पण वातावरण थंड होते. डिटेक्टीव रवींद्र विखे हा ह्या केसचा इंचार्ज होता. अंगात शेवाळी रंगाचा बुशकोट, पायात जुन्या धाटणीचा पायघोळ आणि त्याखाली गंबूट, डोक्यावर काळ्या रंगाची हॅट आणि गळ्यात ख्रिस्ती धर्माचे लॉकेट असा थोडाफार चमत्कारिक त्याचा पेहराव होता. ‘त्या’ला शोधण्यासाठी इतर सहकाऱ्यांना पाठवून तो स्वत: सिगरेट शिलगावत त्यांच्या सफेद स्कॉरपिओला टेकून उभा होता. चारही सहकारी दोन-दोनच्या गटाने दोन दिशांना गेले. आजूबाजूला सगळी शोधाशोध झाली, परंतु कुठेच कसलाच पुरावा मिळाला नाही.

        शिवरामने वरच्या फटीतून तार घालून ‘त्या’च्या गाडीचा दरवाजा उघडला. तसा आतमध्ये सांडलेल्या दारूचा भपकारा त्याच्या नाकात घुसला. ‘त्या’ची बिनबुचाची दारूची बाटली सीटावर आडवी पडली होती आणि शेजारी ‘त्या’चा मोबाईल. तो रवींद्रने ताब्यात घेतला. आणखी काही सामान मिळते का ते पाहण्यासाठी रवींद्र आणि त्याचे सहकारी गाडीत शोध घेऊ लागले. परंतु काही जुजबी गोष्टींव्यतिरिक्त इतर काहीच सापडले नाही. अखेरीस मिळालेले सामान घेऊन रवींद्रने पुन्हा पोलीस स्टेशनला जाण्याचा निर्णय घेतला. सर्वजण त्यांच्या सफेद स्कॉरपिओमध्ये बसले. रवींद्रने चावी फिरवली. ह्रं… ह्रं… आवाज करत गाडी जागेवरच होती. जणू रात्री घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होत होती.

“जरा बघ रे काय झालंय गाडीला.” रवींद्रने सदानंदला सांगितले.

“हो”, म्हणत तो उठला आणि समोर जाऊन गाडीचे टप उघडून तपास करू लागला. तोपर्यंत ते घर रवींद्रला खुणावत त्याचं लक्ष वेधत होतं. त्याला आपल्या मिठीत बोलवत होतं.

“साहेब..साहेब!” समोरून सदानंद हाक मारत होता.

“हां, काय?” तंद्री तुटल्यागत रवींद्रने त्याला विचारले.

“एकदा स्टार्ट मारा. पाणी कमी झालेलं. ते टाकलं. आता बघा एकदा.”

“बरं.”

ह्रं… ह्रं…   ह्रं… ह्रं… “श्या, झालंय काय अचानक गाडीला!” उद्वेगाने रवींद्र मनाशीच बडबडत होता.

“पोलीस स्टेशनला फोन करून दुसरी गाडी पाठवून द्यायला सांगा”, त्याने सदानंदला आदेश दिला आणि पुन्हा एकटक त्या घराकडे पाहत राहिला.

मध्ये बराच वेळ गेला.

“सद्या, सांगितलं का?” रवींद्र.

“हो, वेळ लागेल पण येईल गाडी,” सदानंदने कबुली दिली.

“बरं”, म्हणत रवींद्र गाडीतून उतरला. त्याचं एक एक पाऊल नकळत त्या घराच्या दिशेने पडत होतं.

       काही अंतर पुढे चालून गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले. मुख्य रस्त्यापासून तो बऱ्यापैकी आत आला होता. पट्ट्याला अडकवलेला वॉकीटॉकी बाहेर काढून त्याने गाडीतील सदानंद आणि शिवराम ह्या दोन सहकाऱ्यांना त्याच्यासोबत येण्याची सूचना केली. तीच ती पायवाट. आता घोटाभर चिखल साचलेला तिथे. ते तिघं तसंच पाय हळूहळू टाकत तिथून चालत होते. त्याचे बाकीचे दोन सहकारी गाडीत बसून होते, येणाऱ्या गाडीची वाट बघत. बाकी आजूबाजूला सर्वत्र शांतता होती. मधूनच एखादे वाहन डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर निघून जात असे. चालता चालता मध्येच रवींद्रला कसलातरी आवाज आला. कोणीतरी धापा टाकत घाईघाईने चालत आहे. त्याने मागे वळून बघितले. पण त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. कदाचित भास झाला असावा अशी स्वत:ची समजूत काढून त्याने आपला मार्ग पुढे चालू ठेवला. काही वेळातच ते फाटक समोर आले. ते उघडेच होते. रात्रभर साचलेल्या चिखलात त्याची कडी रुतून बसली होती. ते तिघं फाटकासमोर उभे होते. समोर होतं ते मायावी घर. ‘ति’च्या पिशाच्चाने झपाटलेले. रक्तासाठी आसुसलेले.

       रवींद्रने आत पाऊल टाकले आणि इतका वेळ शांत असलेल्या आभाळात धडाडधाड आवाज करत वीज चमकली. तसं त्यांनी वर पाहिले. काळे ढग तांडव करण्यासाठी पुन्हा एकत्र जमू लागले होते. इतका वेळ थंडगार वाहणाऱ्या झुळकीची जागा सोसाट्याच्या वाऱ्याने घेतली. रवींद्रच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण त्याने बोलून दाखवले नाही. घराच्या भोवताली कमरेएवढं वाढलेल्या गवतात पाऊल कुठे टाकायचा त्याचा अंदाज घेणं त्यांना कठीण जात होतं. तरीही कशीबशी वाट काढत ते घराच्या ओसरीपर्यंत पोहोचले. ओसरीवरच्या छपराला लावलेल्या त्या कंदीलाची ज्योत आता दिवसाढवळ्यादेखील मिणमिणत होती. ह्या घरात नक्कीच कोणीतरी राहत असणार ह्याबद्दल रवींद्रच्या मनात आता कोणतीच शंका उरली नाही. तरीही आजूबाजूला कसलीच हालचाल जाणवत नव्हती. शिवाय घराचा दरवाजा फ़क़्त ओढून घेतल्यागत दिसत होता. वाऱ्याच्या झोताबरोबर तो त्याच्या चौकटीवर धडकत होता. खिडकीची तावदानं बंद होती. त्याचे दोन्ही सहकारी बाकड्यावर बसून पायाला लागलेला चिखल झटकत होते. एव्हाना पावसाचा जोर वाढला होता. टपोरे थेंब तडतड आवाज करत ओसरीवरच्या छपरावर कोसळत होते. ते ज्या पायवाटेने आले तिथे पुन्हा पाणी साचू लागले होते. गाडीमाधल्या आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्याने खिशातला वॉकीटॉकी बाहेर काढला.

“हेलो.”

“यस सर.”

“आम्ही इथे ह्या घरात आहोत.” हात उंचावून रवींद्रने आपल्या ठिकाणाचा संकेत सहकाऱ्यांपर्यंत पोचवला.

“यस सर.”

“तुम्ही तुमची जागा सोडू नका आणि दुसरी गाडी आली की ताबडतोब मला कळवा.”

“राईट सर.” “ओव्हर एंड आउट” म्हणत रवींद्रने वॉकीटॉकी बंद केला.

       पावसाचा जोर हळूहळू आणखी वाढत होता. काही वेळापूर्वी पडलेला लख्ख प्रकाश ढगांच्या आड कुठेतरी गुडूप झाला होता. सगळीकडे अंधारून आलं होतं. बाकड्यावर काढून ठेवलेली त्याची हॅट वाऱ्याच्या एका झोतासोबत पूर्वेकडे दूर कुठेतरी उडून गेली. त्या वावटळीत तिथे टिकून होता तो फ़क़्त कंदिलातला मिणमिणता दिवा. रवींद्रने कोटाच्या खिशातून सिगरेट काढली आणि ओसरीवरच्या खांबाला टेकून एक एक झुरका मारत केसचा विचार करु लागला. समोर मुसळधार पावसाचे तांडव सुरु होते. म्हणता म्हणता अर्धा दिवस सहज सरून गेला. शेवटचा झुरका संपताच सिगरेट पायाखाली दाबत रवींद्र दरवाजापाशी गेला. दणदिशी त्याने दरवाजा उघडला तो थेट आतल्या भिंतीला जाऊन धडकला आणि पुन्हा आपल्या जागेवर आला. त्याला थोपवून रवींद्र आपल्या सहकाऱ्यांसह आत आला. खोलीत एक प्रकारचा कुबट, घाणेरडा वास सुटला होता. जसे काही कोणी मरून पडले होते. उंदीर, घूस, की ‘तो’? रवींद्रचे विचारचक्र भरभर धावू लागले. घरात अंधार होता. नाकावर रुमाल धरून त्याने विजेरी चालू केली. त्या दोघांनीही त्याचे अनुकरण करीत खिशातली विजेरी काढून तपास सुरु केला.

“हे पहा.” रवींद्र.

“काय झालं साहेब?” शिवराम.

जमिनीवर सांडलेल्या रक्ताचे ताजे डाग दाखवत रवींद्र त्यांना म्हणाला, “केसचा निकाल इथेच लागणार आहे.”

      घरात ठिकठिकाणी कोळीष्टकं, जळमटं लटकलेली. त्यातून मार्ग काढत त्या तिघांचा तिथे तपास सुरु होता. भिंतीवर उजेड मारला तर त्यावर लाल लाल शिंतोडे उडालेले होते. दुसऱ्या भिंतीवर मोठ्या भयप्रद आकृत्या काढल्या होत्या. लंबुळके धड, बिनशीराचे. हातात काहीतरी सुऱ्यासारखे हत्यार. त्याचा भाता लाल द्रवाने माखलेला. एकूण प्रकार अमानवी होता हे त्यांच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही. तसे एकूण घर सगळे लाकडी होते. त्यामुळे चालताना पायाखालच्या फळ्यांचा करकर आवाज येत होता. समोर एक पडदा होता. ठिकठिकाणी भोकं पडून अत्यंत जीर्ण झालेला. तो सरकवून रवींद्र आत शिरला, स्वयंपाकगृहात. तिथे भिंतीला एक फडताळ लावलेलं. दरवाजे बिजागाऱ्यातून निखळून खाली कोसळलेले. सगळीकडे अस्ताव्यस्त सामान पसरलेले होते. नाकाला रुमाल धरून तिथून पुढे जात तो घराच्या मागच्या दरवाजापाशी पोहोचला. करकर आवाज करत जोर लावून त्याने तो आत ओढला. दिवाणखान्यातील भिंतीवरची चित्र पाहण्यात गुंग झालेल्या सहकाऱ्यांना त्या आवाजाने जागं केलं आणि ते रवींद्रच्या मागोमाग त्या दरवाजापर्यंत पोहोचले. ते घराच्या मागच्या अंगणात आले होते. अंगण कसलं! सगळं गवताने माजलेलं रान होतं. पुढे जाण्यासाठी रवींद्रने दरवाजाबाहेर पाऊल ठेवलं. एक जनावर सळसळत त्याच्या गंबूटावरून उडी मारून गेलं. तो बाहेर आला. बाकीचे दोघेदेखील दबकत हळूच पाऊल टाकत बाहेर आले. त्याने एकाला घराच्या पूर्वेकडे आणि एकाला पश्चिमेकडे पाठवले आणि स्वत: मात्र समोर निघाला. गवताच्या टोकांवर बसलेली रंगीबेरंगी फुलपाखरे होणाऱ्या हालचालींमुळे सतत आपली जागा बदलत होती. सावध पाऊल टाकत तो आणि त्याचे सहकारी आपल्या मार्गाने पुढे पुढे चालत होते.

       चालता चालता सदानंदला काही वेळापूर्वी वाऱ्याने उडालेली रवींद्रची ती काळ्या रंगाची हॅट समोर पडलेली दिसली. ती थोड्याफार चिखलाने माखल्यागत दिसत होती. ती घेण्यासाठी तो पुढे सरसावला. ती हॅट ज्या ठिकाणी पडलेली दिसत होती तिथे आजूबाजूला बराच गाळ साचला होता. तिथपर्यंत जाणं तसं कठीण होतं. तेव्हा तो दोन्ही पाय दुमडून चवड्यांवर खाली बसला. मागचा पाय ताणला आणि एक हात त्या हॅटच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. तरी थोडं कठीणच जात होतं. सदा मग हळूहळू त्या गाळाच्या दिशेने पुढे सरकला आणि पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला तोंड फिरवून ती हॅट घेण्यासाठी हात ताणला. ह्यावेळेस मात्र त्याच्या हाताची बोटं तिथपर्यंत पोचली. आणखी जोर लावून त्याने हात थोडा आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. नकळत डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या. बोटांना स्पर्श झाला खरा पण तो त्या हॅटचा खासच नव्हता. ते होते ‘ति’चे चप्प काळे केस. त्याला कळेपर्यंत त्या केसांच्या आत त्याची बोटं अडकली होती. त्याने हबकून मागे वळून बघितले. तर ती तिच्या विद्रूप हास्यवदनाने त्या साचलेल्या गाळातून हळूहळू वर येत होती. तिच्या अंगावरील पायघोळावर चिखलाचा एक ठीपूस देखील नव्हता. ती जसजशी वर येत होती तसतसा त्याचा धीर सुटत होता. केसात अडकलेली बोटं सोडवण्याचा त्याचा सुरु असलेला प्रयत्न अयशस्वी ठरत होता. दडपणामुळे त्याचा आवाजदेखील फुटेनासा झाला. तरीही जीवाच्या आकांताने त्याची धडपड सुरूच होती आणि त्यामुळे अनाहूतपणे त्याचा एक एक अवयव हळूहळू त्या गाळात रुतत होता. समोर केस मोकळे सोडलेलं तिचं अर्धवट शरीर आता त्या गाळाबाहेर आलेलं आणि त्याचं अर्धवट शरीर त्या गाळात रुतलेलं. जसजशी त्याची हालचाल वाढत होती तसतसा तो आणखी गाळात धसत होता. क्षणमात्र ती पुन्हा गाळात शिरू लागली. तो केसात अडकलेला त्याचा हात शेवटपर्यंत तसाच होता. अखेरीस गाळ त्याच्या नाकातोंडापर्यंत आला आणि बघता बघता तो संपूर्ण आत बुडाला. गुड..गुड.. करत बुडबुडे तेवढे काही वेळ गाळाच्या तळावर येत होते. काही वेळाने ते देखील थांबले आणि मग पसरला हरितरंग मिश्रित लाल स्त्राव. इतर दोघांना तर ह्याचा गंधदेखील नव्हता.

       एव्हाना रवींद्र त्या घरापासून शंभर एक पावलांवर पोहोचला होता. घरापासून ते जसजसं दूर जात होते तसतसं गवतदेखील उंच उंच होत होते. अंगणातलं कमरेएवढं गवत आता डोक्याच्या वर गेलं होतं. हाताने ते कसबसं बाजूला सारत तो रस्ता मोकळा करत होता. पायाखाली काय आहे काय नाही हे पाहण्याचा विचारदेखील त्याच्या मनाला शिवत नव्हता. चिखलातून, गाळातून जसं जमेल तसं एक एक पाऊल पुढे टाकत होता. वरून पावसाचा धो धो मारा सुरूच होता. अंग पूर्ण चिंब झालेलं. डोळ्यांच्या कडांवर पाणी साचल्याने समोरचं चित्र धूसर होत होतं. चालता चालता अचानक त्याचा पाय कसल्यातरी बुळबुळीत गोष्टीवर पडला आणि सरकला. तसा धडामदिशी तो खाली कोसळला. बुड चोळत चोळत कसाबसा सावरत तो इकडे तिकडे पाहू लागला. क्षणभर डोळ्यांसमोर अंधारी येऊन गेली. अंगात झिणझिण्या उठल्या. नजर स्थिरावेपर्यंत काही वेळ गेला. दोन तीन वेळा मानेला आचके देऊन आणि डोळ्यांची उघडझाप करून तो भानावर आला. तो पडला त्या ठिकाणी हिरव्या काळ्या रंगाचं गच्च शेवाळ साचलेलं. त्याने कोटाच्या खिशातून त्याचा ठेवणीतला चाकू काढला. भरभर जेवढं जमेल तेवढं शेवाळ कापून बाजूला करू लागला. पुरेशी जागा मोकळी झाल्यावर त्याने चाकू पुन्हा कोटाच्या खिशात ठेवला आणि त्या ठिकाणाचा अंदाज घेऊ लागला. त्याखाली लाकडाची जुनी भलीमोठी फळी होती. पाण्यामुळे ठिकठिकाणी तट्ट फुगून वर आलेली. त्याने फळीवर हलकेच टकटक केले. ती पोकळ असल्यागत आवाज आला. त्याने फळीला कान लाऊन पुन्हा तसेच टकटक केले आणि ती पोकळ असल्याची त्याची खात्री पटली. तो उठला आणि मनात काहीतरी विचार करून घेतली उडी त्याने त्या फळीवर. पावसाच्या पाण्याने भिजलेली आणि त्याच्या वजनाने आधीच वाकलेली फळी कडाडकड आवाज करत तुटली आणि त्या तीन-चार फूट रुंदीच्या बोळात आजूबाजूच्या भिंतींवर आपटत तो गपदिशी दहा फूट खाली पडला. तसं आजूबाजूला साचलेलं पाणी मोठ्या जोमाने त्या खड्ड्यात वाहू लागले. तो खाली चोळामोळा होऊन पडला होता आणि वरून पाण्याचे लोटच्या लोट येत होते. क्षणभर काय झाले हे त्याच्या लक्षात येईपर्यंत त्याचं भान हरपलं आणि तो तिथेच बेशुद्ध झाला.

       इकडे शिवराम त्याच्या गतीने हळूहळू चालत होता. गवताची उंची वाढत होती. समोरून अचानक कोणीतरी येण्याची धास्ती मनात घर करून होती. दिवाणखान्यातल्या भिंतीवरच्या चित्रांची छायाफीत राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होती. त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे पुढे जात होता. अचानक कोणीतरी मागून जड श्वास घेत उभे असल्याची जाणीव त्याच्या मनात झाली. तो जागीच थांबला. नजरेच्या उजव्या कोपऱ्यातून त्याने हळूच मागे वळून बघितले. आता त्याचादेखील श्वास फुलू लागला होता. कोणीतरी तिथे होतं. त्याच्या पाठी, अगदी एक दोन वीतेच्या अंतरावर. मन घट्ट करून त्याने हाताच्या मुठी वळल्या आणि बिथरलेल्या मोठ्या डोळ्यांनी हळूहळू मान वळवत मागे बघू लागला. काळे लांबसडक केसांसारखे काहीतरी मागे असल्याचे त्याला अस्पष्ट दिसले. अर्धवट वळवलेली मान त्याने पुन्हा सरळ केली आणि जीव मुठीत धरून पळत सुटला. गवताच्या पात्यांचा तोंडावर सपासप मारा बसत होता. वरून मुसळधार पाऊस सुरु होता. पायाखाली उंच सखल जमीन येत होती. तरीही तो थांबला नाही. पळत राहिला. पुन्हा मागे वळून बघण्याची त्याची छाती होत नव्हती. अखेरीस दमून तो एका झाडाच्या बुंध्याशी थांबला. एक हात खोडाला टेकवून दुसरा हात छातीवर फिरवत होता. दोन तीन मिनिटांनी त्याचा श्वास स्थिरावला तेव्हा धापा टाकत तो इकडे तिकडे बघू लागला. घरापासून बराच दूर आला होता तो आता. जे काही जाणवलं ते प्रत्यक्षात होतं की निव्वळ भास ह्याचं विचारमंथन करत तो खाली बसला.

      एव्हाना रवींद्र डोळे किलकिले करत जागा झाला. वरून येणारे पाण्याचे लोट आता मंदावले होते. हातपाय चिखलात रुतलेले. ते तसेच बाहेर काढत तो बसला. काही क्षणांतच झालेला प्रसंग त्याला आठवला. त्याने वर पाहिले. ते तुटलेल्या लाकडी फळीचे गोल झाकण त्याला दिसलं. त्याने एक एक गमबूट काढून त्यातलं पाणी खाली केलं आणि पुन्हा पायात चढवून तो उठला. समोर मिट्ट अंधार होता. खिशात हात घालून त्याने विजेरी बाहेर काढली. मघाशी बसलेल्या धक्क्यांमध्ये ती खिशातल्या खिशातच फूटली होती. ती तिथेच फेकून त्याने दुसऱ्या खिशातून लायटर काढले. पाच सहा वेळ त्याची चक्री फिरवून बघितलं पण ते काय पेटायचं नाव घेईना. कदाचित पाण्याच्या लोंढ्यात त्यातदेखील थोडंफार पाणी शिरलेलं. शेवटी रवींद्रने तो नाद सोडला आणि हातापायाने चाचपडत हळू हळू पुढे पुढे जाऊ लागला. वरून थेंब थेंब त्याच्या अंगावर सतत ठिबकत होते. मध्येच फस फस आवाजाने मन बिथरत होतं. दर दोन तीन पावलांनंतर तो अंदाज घेत होता. हा रस्ता नक्कीच पुढे कुठेतरी इप्सित स्थळी पोचवणार ह्याबद्दल रवींद्रच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. तो जसजसा आत जात होता तसतसा बाहेरून येणारा पावसाचा आवाज हळूहळू क्षीण होत होता. पायाखाली चवड्याभर पाण्याचा प्रवाह वाहतच होता. मध्येच कसलीतरी घर्र-घर्र त्याला ऐकू येत होती. आडोशाला दडून बसलेल्या वटवाघळांची असावी असा विचार क्षणभर त्याच्या मनात येऊन गेला आणि तो पुढे चालत राहिला.

 

 

To be continued…

अतर्क्य…(भाग ३)

   बुलेटला किक मारली. मागे पावसकर बसलेले. रात्रीच्या काळोखात हेडलाईटच्या प्रकाशात जसा रस्ता दिसेल तसे ते जात होते. बुलेटचा तो धडधड आवाज वातावरणातील शांततेचा भंग करत होता. पायवाट सोडून बुलेट आता गर्द झाडीत घुसली होती. कसाबसा रस्ता काढत सावंत आणि पावसकर माडाच्या एका उंच झाडाखाली पोहोचले. बुलेटची लाईट चालूच ठेवली. पावसकर हातातली विजेरी चालू करून सावंत सांगतील तिथे सावकाश पाऊल टाकत होते. मध्येच कोण्या टिटवीचा आवाज परिसरात घुमत होता. नारळाच्या झावळ्या आणि इतर पालापाचोळ्याचा जाड थर जमिनीवर तयार झाला होता. त्यातूनच हळूहळू पावलं टाकत दोघं चालत होते. इतक्यात सावंतांसमोर काहीतरी चकाकलं. लागलीच त्यांनी पावसकरांना त्या ठिकाणी विजेरी धरण्यास सांगितली. ते त्या वस्तूच्या जवळ गेले. तिथे एक अर्धवट जमिनीत पुरलेली काचेची बाटली होती. सावंत पुढे जाऊन ती हातात घेणार, इतक्यात पावसकर म्हणाले,

“सायेब थांबा. त्यास्नी हात लावू नगा. ते मला कायतरी येगळंच दिसतया. कुण्यातरी करणी बिरणी केल्यावाणी दिसतंया. ते बगा, मागं टाचण्या टोचल्यालं लिंबबी हायती.”

सावंत सावध झाले आणि दोन पावलं मागे सरकले. आजूबाजूला पाहीलं तर तशा अजून पाच काचेच्या बाटल्या होत्या. वेगवेगळ्या रंगाच्या नि अर्धवट जमिनीत पुरलेल्या.

“सायेब, ही जागा काय बरी दिसत न्हाय. हिकडनं निघाया हावं आपण.”

“थांबा पावसकर! माझं मन म्हणतंय. आपल्या केसचा सुगावा हिथच लागणारे.”

“पण सायेब आपण सकाळी…”

त्यांचं बोलना अर्धवट थांबवत सावंतांनी त्यांच्या हातून विजेरी घेतली आणि तिथे आजूबाजूला काही ठोस पुरावा सापडतोय का त्याचा तपास करू लागले.

   इतक्यात सोसाट्याचा वारा सुरु झाला आजुबाजुची झाडे गदागदा हलू लागली. जमिनीवरचा पालापाचोळा हवेत उडाला आणि फेर धरू लागला आणि बघता बघता त्या माडाच्या झाडाभोवती आगीच्या ज्वाळा पसरल्या. सावंत आत अडकले गेले. पावसकर बाहेरच उभे होते. निश्चल एकटक बघत होते. सावंतांनी बाहेर पडण्याचा महत्प्रयास केला. पावसकरांना जीवाच्या आकांताने हाकादेखील मारल्या पण त्या हाका ज्वाळांच्या बाहेर पोहोचल्याच नाहीत. जणू काही ज्वाळांच्या कळपटामध्ये त्या हवेत विरून जात होत्या. सर्व काही निष्फळ ठरले. थोडा वेळ हा खेळ असाच सुरु राहिला आणि मग एकदम आगीचा डोंब उसळला दोन पुरुष उंचीच्या गडद ज्वाळा भडकल्या. त्यात सावंत आता पूर्णच दिसेनासे झाले. पुढच्या काही क्षणांतच सर्व काही थांबले. तो वारा आणि त्याच्या तालावर नाचणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळादेखील आणि इंस्पेक्टर सावंत, त्या आगीच्या ज्वाळांसोबतच तेदेखील लुप्त झाले. पावसकरांनी बुलेटला किक मारली आणि ते आपल्या घरी परतले. झाल्या प्रकारचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

   सकाळी सावंत गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तसेही गावातले लोक दररोज घडणाऱ्या घटनांमुळे बिथरले होते. ह्या बातमीने तर त्यांना सुन्न केले. कोणीही ह्या बाबतीत अवाक्षरही बोलेना. प्रत्येकाला ही भूतबाधाच असल्याची खात्री पटली होती आणि त्याविषयी चर्चा करून ती बाधा आपल्या घरावर उलटू नये असेच प्रत्येकाला वाटत होते. पावसकरांचे स्टेटमेंट घेण्यात आले. त्यात त्यांनी झाला प्रकार जसाच्या तसा सांगितला. फाईलमध्ये त्याची नोंद झाली. ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणची शक्य तेवढी माहिती गोळा केली गेली आणि फाईल तात्पुरती बंद झाली ती झालीच.

 

३.

   जेवणाचा एक एक घास पोटात ढकलत देशमुख ह्या केसशी निगडीत एक एक गोष्ट बारकाईने तपासत होते त्यावर त्यांचे चिंतन चालू होते. अर्थात ही केस सोडवण्यासाठी इंस्पेक्टर देशमुखांकडे इंस्पेक्टर सावंतांपेक्षा बराच वेळ होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन ते विचार करू शकत होते आणि ते करतदेखील होते. दुनियाभरच्या केसेस त्यांनी हाताळल्या होत्या. त्यांच्याकडचा अनुभव हा अधिक विस्तृत स्वरूपाचा होता. आजतागायत त्यांनी दोनशेहून अधिक न सुटणाऱ्या केसेस सोडवल्या होत्या. त्यातल्या दहा वीस केसेस मानवी क्षमतेच्या बाहेरच्या होत्या. त्यात त्यांचा अनेक दिग्गज मानसशास्रज्ञांशी थेट संबंध आला होता. ही केसही त्यातलीच आहे. ह्याची त्यांना जवळजवळ खात्री पटली होती. वारंवार ते पुन्हा पुन्हा सर्व गोष्टी डोळ्याखालून घालत होते. रणजीतच्या डायरीचा घडलेल्या घटनांमध्ये अप्रत्यक्ष संबंध आहे हे त्यांना आता कळून चुकले होते. कारण रणजीतच्या डायरीत लिहिलेली पहिली कथा एका इंस्पेक्टरवर आधारित होती आणि त्या कथेत नायकाचा मृत्यू इंस्पेक्टर सावंतांचा झालेल्या मृत्यूशी मिळता जुळता होता. त्यानंतर दुसऱ्या कथेत एक खानावळीचा मालक शब्दांकित केला गेला होता, ज्याचा शेवट घडलेल्या घटनेशी अगदीच अनुरूप होता. अशाच प्रकारे पुढील सर्व गोष्टी होणाऱ्या खुनांच्या तारखेच्या अगदी उलट दिशेने शब्दांकित केल्या गेल्या होत्या. सर्वात शेवटची कथा होती ती एका लेखकाची. एका रहस्य कथा लेखकाची.

   संध्याकाळ होत आली होती. एखाद्या चित्रकाराने सहज रंग ओतावा आणि त्या रंगांनी एक अलौकिक सौंदर्य धारण करावे अशाच प्रकारे आकाशात सूर्याची ती केशरी, पिवळसर, तांबूस किरणे पसरली होती. किलबिलणारे पक्षी घरट्याकडे परतत होते. एक मोहक निसर्गरम्य दृश्य तयार झाले होते. तेच पाहत चहाचा एक एक घोट घेत देशमुख खिडकीपाशी उभे राहून विचार करत होते. अनुभवाच्या बळावर देशमुखांनी इथपर्यंत मजल तर मारली होती परंतु पुढे त्या डायरीचा झालेल्या घटनांशी संबंध कसा जोडावा हे मात्र काही त्यांना समजत नव्हते. दिवस संपत आला होता. ड्युटीवरून घरी जाण्याची वेळ आली आणि देशमुखांना कोणाची तरी आठवण झाली. त्यांनी वेळ न दवडता फोनचा डायलर फिरवला आणि पलीकडून एक भारदस्त आवाज त्यांच्या कानावर आदळला,

“हेलो, कोण बोलतंय?”

“मी इंस्पेक्टर देशमुख बोलतोय, मला गुरुनाथांशी बोलायचे आहे.” देशमुखांनी प्रत्युत्तर दिले.

“थांबा. बोलावतो.” असे म्हणून समोरच्या गृहस्थाने फोनचा रिसीवर बाजूला ठेवला आणि गुरुनाथांना एक आवाज दिला. बहुदा ते त्यांचे वडील असावेत असा कयास सावंतांनी बांधला आणि पुढच्या काही वेळातच गुरुनाथ फोनजवळ आले.

“बोल मित्रा, आज कशी आठवण काढली.”

“सहजंच रे! एक केस होती.”

“तरीच म्हटलं, कामाशिवाय कसा फोन आला साहेबांचा. बोला बोला, काय सेवा करू शकतो आपली.”

“केस थोडी विचित्र आहे.”

“म्हणजे?”

“म्हणजे, तुला वेळ कधी आहे ते बोल. मला ह्या संदर्भात तुला प्रत्यक्ष भेटायचे आहे.”

“ठीक आहे. तू पत्ता दे. मी उद्याचीच गाडी पकडून येतो.”

“बरं.” असे म्हणून देशमुखांनी गुरुनाथांना त्या पोलीस स्टेशनचा पत्ता सांगितला.

एव्हाना काळोख दाटू लागला होता. देशमुख ड्युटी संपवून त्यांच्या खोलीकडे परतले ते एका आत्मिक समाधानाने.

   दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला पोहोचल्यावर ते गुरुनाथांच्या आगमनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहू लागले परंतु ते ठिकाणंच इतक्या आडमार्गाला असल्याने शहरातून तिथे पोहोचायला कमीत कमी १०-१२ तासांचा अवधी लागत असे. त्यामुळे देशमुखांनी ती केस सोडून पोलीस स्टेशनवरची इतर कामे मार्गी लावण्याचा सपाटा चालू केला आणि पावसकर व इतर हवालदारांच्या मदतीने बाकीच्या छोट्या मोठ्या केसेस हाताळायला घेतल्या. तसेही त्यांच्यापुढे हे काम दुसऱ्या कोणा पोलीस अधिकाऱ्यावर येणारच होते. तेव्हा त्याचा भार कमी करण्यासाठी त्यांनी जितकं शक्य होईल तितकं काम आटोपते घेतले. त्यात संपूर्ण दिवस निघून गेला. ‘एव्हाना गुरुनाथ यायला हवे होते,’ असे विचार आता त्यांच्या डोक्यात घर करू लागले होते आणि दिवस संपवून फाईल्स खणात ठेवायला ते खुर्चीवरून उठले तोच दारात गुरुनाथ हजर. त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करत देशमुखांनी पावसकरांना चहा आणायला सांगितले आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर देशमुखांनी विचारले,

“हे बघ, तू डायरेक्ट इथे दाखल झालायस. दमला असशील. म्हणत असशील तर आपण केस संदर्भात उद्या सकाळी बोलू. आज तू आराम कर.”

“ठीक आहे रे. इतका काही अजून थकलो नाही मी. नुकताच मुलांनी चाळीसावा वाढदिवस साजरा केला. तुझे शुभेच्छा पत्रही मिळाले. त्याबद्दल धन्यवाद!”

दोघांनी एक समाधानकारक स्मित करत एकमेकांकडे पाहिले आणि चहाचा एक घोट घेतला.

“तर बोल काय आहे केस?” मिशांना लागलेला चहाचा व्रण पुसत गुरुनाथांनी मग थेट विषयाला हात घातला.

“हं. तर एक लेखक आणि त्याच्या कथा. प्रत्येक कथेचा शेवट त्या कथानायकाच्या मृत्यूने…” सांगत त्यांनी केसची इत्थंभूत माहिती गुरुनाथांना दिली. एक एक फाईल काढून केस विषयीचे आणि त्यांच्या कयासाचे दाखले ते गुरुनाथांना समजावून सांगत होते. गुरुनाथ शांत चित्ताने बसून सर्व काही ऐकत होते. मग त्यांनी काही प्रश्न विचारले त्याची जमतील तशी देशमुखांनी उत्तरे दिली. दोघांनाही वेळेचे भान नव्हते. एव्हाना घड्याळाचा काटा ११ वर सरकत होता. बाहेर पावसकर पेंग येऊन खुर्चीवर डुलक्या काढत होते.

“पावसकर..” देशमुखांनी आवाज दिला. तसे पावसकर खडबडून जागे झाले आणि केबिनमध्ये गेले.

“इंस्पेक्टर सावंतांचा मृत्यू कशा प्रकारे झाला हे जरा सांगा. कारण त्या वेळेस फ़क़्त तुम्हीच होता तिथे.”

“व्हय पर सायेब मी फकीस्त तिथं व्हतू. माझा त्यात काय बी संबंध न्हाय.”

“मी जे विचारलंय त्याचं उत्तर द्या पावसकर. नक्की तिथे काय घडलं?”

“हं. सांगतु.” म्हणत पावस्कारांनी घडलेला सगळा प्रसंग जसाच्या तसा वर्णन करून सांगितला. त्यानंतर पावसकरांना बाकीच्या मृत्युंविषयी काही प्रश्न विचारण्यात आले, ज्याची त्यांनी जमतील तशी उत्तरे दिली. त्यांच्या बोलण्यावरून गुरुनाथांना सर्व गोष्टी हळूहळू स्पष्ट होत होत्या. घड्याळात एक वाजल्याचे टोले पडले.

“देशमुख, बस इकडे.” गुरुनाथ म्हणाले.

“काय झालं?”

“ही केस मी माझ्यापरीने सोडवली आहे.”

“इतक्यात? काल संध्याकाळी तर तू आलास. कमाल आहे तुझी.” म्हणत एक अभिमानास्पद स्मित देशमुखांनी केले.

“आता आणखी ह्या केसमध्ये काहीही न उलगडण्यासारखे राहिलेले नाही.” गुरुनाथांनी स्पष्ट केले.

“म्हणजे?”

“हे बघ, मी आता जे सांगेल ते आमच्या मानसशास्रज्ञाच्या दृष्टीकोनातून. तेव्हा बाकीचे सर्व विचार डोक्यातून काढून  टाक आणि माझ्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दे.”

“बरं बोल.” देशमुखांनी संमती दर्शवली.

“हं. तर सर्वसाधारण माणूस त्याच्या मेंदूच्या एकूण क्षमतेच्या फ़क़्त तीन ते चार टक्केच वापर करतो. माणसाने जर त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या शंभर टक्के वापर केला तर तो अगदी काहीही करू शकतो. मग त्याचे शारीरिक बंधन त्याच्या आड येऊच शकत नाही. पण असा माणूस जगात अस्तित्वात आलेला नाही आणि पुढे येण्याचा संभवही जवळ जवळ नाहीच. परंतु सामान्य माणसाच्या तुलेनेने ह्या जगात अशी माणसे आहेत ज्यांनी आपल्या मेंदूच्या क्षमतेचा वापर सात ते आठ टक्क्यांपर्यंत वा त्याहून थोडा जास्त केलेला आहे. रणजीत हा त्यातलाच एक आहे. आता त्याचा मेंदू कितपत प्रगल्भ होता हे तर आता मी सांगू शकणार नाही. तो कोण होता. कुठून आलेला ह्याची माहिती अजूनही अज्ञात आणि त्याची आता आवश्यकतादेखील नाही. कारण तो आता ह्या जगातच नाही. परंतु तो काय होता ह्याची माहिती मी तुम्हाला देतो. तो एक अनन्यसाधारण बुद्धी कौशल्याचा कलावंत होता. त्याच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद होती. तुम्हाला जर एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा आणि जमले तर लिहून काढावे. आज ना उद्या ती गोष्ट तुमच्या आयुष्यात ह्या ना त्या मार्गाने येतेच. रणजीतने तर आपल्या मेंदूच्या क्षमतेचा विकास आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या तुलनेने प्रचंड प्रमाणात केला होता. शिवाय तो एक लेखक होता. त्याला कोणतीही गोष्ट शब्दांकित करण्यापूर्वी त्या गोष्टीचा विचार करावा लागे आणि मग ती गोष्ट तो त्या डायरीमध्ये लिहित असे. रणजीत कोणतीही गोष्ट लिहिण्यापूर्वी ती स्वत: जगत होता आणि त्यामुळेच रणजीतच्या कथेतील पात्र ह्या वास्तव जगात स्वत:चे अस्तित्व शोधू लागली. त्यासाठी त्यांच्या व्यक्तीमत्वाला अनुरूप मनुष्य शरीराचा त्यांनी आधार घेतला. त्यापुढे घडलेले प्रसंग तुमच्या समोर आहेत. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या मेंदूच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करतो. इन फॅक्ट, त्याच्या एवढ्या प्रगाढ बुद्धी क्षमतेमुळेच तो इतके सारे प्रसंग एका रात्रीत रंगवून ती कथा पूर्ण करू शकला. मिळालेले सर्व पुरावे हे त्याच्या बुद्धीचेच दाखले देत आहेत. हे असे प्रसंग पूर्वी देखील घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या लेखकावरील कथेतील नायकाने त्याच्याच शरीराचा आधार घेतला आणि त्याचा शेवट केला. एक मानसोपचारतज्ञ म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात आली.”

“अच्छा! असं आहे तर.”

“हो अगदी असंच.”

“हे सारं माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी किती अतर्क्य होते.”

“हं…बरं मग मी आता निघतो. पहाटेची पहिली एसटी पकडून घराकडे जाईन म्हणतो.”

“असं कसं. तू इतक्या दिवसांनी भेटलायस. तुला असाच निरोप देऊ म्हणतोस. ते काही नाही. तू बस इथे.”

“अरे पण…”

“पावसकर… आमची जरा सोय करा. लगेच.”

“देशमुख ह्याची खरंच गरज…” गुरुनाथांचे बोलणे अर्धवट तोडत देशमुख म्हणले,“अरे एक छोटीसी पार्टी. तसंही एसटीला अजून अवकाश आहे.”

त्यांचं संभाषण चालू असतानाच पावसकर एक मोठी बाटली घेऊन आणि सोबत दोन ग्लास घेऊन आले. हळूहळू दोघेही नशेत धुंद होत होते. पावसकर बाहेर आले आणि तिथल्या बाकड्यावर अंग टाकले. दिवसभराच्या थकव्याने लगेचच त्यांना डोळा लागला. म्हणता म्हणता गप्पा इतक्या रंगल्या की घड्याळात कधी चारचे टोले पडले लक्षात देखील आले नाही. तर्रर्र अवस्थेत देशमुख गुरुनाथांना म्हणाले,

“मी तुला आता माझ्या गाडीने एसटी थांब्यापर्यंत सोडतो. तू मग जा तिथून.” त्यांच्या आवाजात नशेची झिलई चढली होती.

“अरे कशाला देशमुख. मिळेल एखादी गाडी मला रस्त्याने.” गुरुनाथांचीही तीच गत होती

“नाही… तुला एवढं माझा ऐकावाच लागेल”

“बरं ठीक आहे बाबा जसं तू म्हणशील. पण गाडी कोण चालवणार? आपण दोघेही प्यायलेले आहोत सध्या.”

“हा!हा!हा! तर काय झाले? मी तुला पोचवेन. पावसकर झोपलेत, त्यांना झोपूदे.” असे म्हणत देशमुखांनी गुरुनाथांचा हात पकडून त्यांना उठवले आणि हेलकावे खात, झोकांडे जात दोघेही गाडीजवळ पोहोचले. गुरुनाथांना शेजारीच बसवून देशमुखांनी गाडीची चावी फिरवली. गाडीचा हृम्म हृम्म आवाज त्या आजूबाजूच्या शांत परिसरात घुमला आणि गिअरचा दांडा हलवून गाडी मार्गाला लागली. कच्च्या रस्त्यावरून हेंदकाळत त्यांची गाडी अंधारातून मार्ग काढत होती.

    आदल्या दिवसाच्या प्रवासाने गुरुनाथ आता थकले होते. वरून दारूची झिंग डोक्यात भिनली होती. त्यामुळे थोड्या वेळातच ते बसल्या बसल्याच घोरू लागले. इंस्पेक्टर देशमुख जमेल तशी गाडी पळवत होते. पोलीस स्टेशन सोडून गाडी आता बरेच अंतर पुढे आली होती. इतक्यात त्यांना समोरून एक पिवळा दिवा लुकलुकताना दिसला. नशेत चूर झालेल्या डोळ्यांना त्याचा नेमका अंदाज लावता येईना. तो दिवा जवळ जवळ येत होता. डोळ्यांची उघड झाप करून त्यांनी त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला पण छे! हळूहळू तो दिवा जवळ आला. आणखी जवळ आला. अगदी जवळ आला. एक जोराचा हॉर्न वाजला. पुढे ऐकू आला अपघाताचा एक जोरदार आवाज आणि त्यासोबतच दोन करुण किंकाळ्या. देशमुख आणि गुरुनाथ बसल्या जागीच निष्प्राण झाले होते. समोर होता एक विशाल ट्रक ज्याचा एकंच दिवा चालू होता आणि ह्या अपघातानंतर आता त्याही दिव्याचा चकणाचूर झाला होता. पावसकर जेव्हा घटना स्थळी पोहोचले तेव्हा तपास करताना त्यांना देशमुखांच्या खिशात एक कागद सापडला. तोच जो आदल्या दिवशी त्यांच्या फाईलमधून गहाळ झालेला. पावसकरांनी तो उघडला आणि आतला मजकूर वाचला. डोळ्यांत पाणी आणून पुन्हा तसाच तो कागद त्यांच्या खिशात ठेवला. त्यात एक कथानक होते – दोन मित्रांचे; लेखक – रणजीत.

अतर्क्य…(भाग २)

   सकाळी रंगाने कडी खटखटवली. परंतु नेहमीसारखा दरवाजा उघडला गेला नाही. दोन-तीनदा प्रयत्न करून अखेरीस त्याने मास्टर-किने दरवाजा उघडला आणि पाहिले तर आत रणजीतचा देह फासावर लटकला होता. लागलीच रंगाने आरडाओरड करून गाव जमा केला. पोलिसांना खबर लागली. इंस्पेक्टर सावंत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रंगाची, हॉटेलमालकाची कसून चौकशी करण्यात आली. परंतु काही विशेष धागेदोरे हाती लागले नाहीत. त्याच्या खोलीची झडती घेतल्यावर त्याची ती डायरी तेवढी त्यांच्या हाती लागली. ती ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशनला परतले.

    टेबलावरची काही इतर अपरिहार्य कामे आटोपल्यानंतर सावंतांनी ती डायरी वाचायला घेतली. एक-एक कथा वाचताना रणजीतचे व्यक्तिमत्व हळूहळू त्यांच्या लक्षात येत होते. त्याच्या कथेत काहीतरी रहस्य दडले होते. कथा ही नायकाच्या मृत्यूने प्रमाण होत असे. सुरवातीच्या दोन-तीन कथा वाचून त्यांना त्यात काही तथ्य सापडेल ह्याची शक्यता तशी कमीच वाटली. त्यांनी तूर्तास तो नाद सोडला आणि सामान्य पद्धतीने ह्या केसचा तपास करण्यास सुरवात केली. दिवसभराच्या धावपळीने त्यांना थकवा जाणवत होता. कुठेच कसलाच सुगावा लागत नव्हता. कोणावर आरोप करता येईल असा ठोस पुरावा एकाही व्यक्तीविरुद्ध मिळत नव्हता. बरं त्याने आत्महत्या केली म्हणावं तर ती का केली ह्या संदर्भात एखादी चिठ्ठीदेखील त्याच्या खोलीत सापडली नव्हती. हॉटेलचे मालक आणि रंगा त्यावेळेस तिथे नव्हते ह्याचे पुरावे त्यांच्या समोर होते. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नव्हता. ही नेहमीच्या केसेस सारखी केस नाही ह्याची त्यांना कल्पना आली होती. दिवस ढळला तरी कुठलाच सुगावा लागत नव्हता. शेवटी तपास नक्की कोणत्या दिशेने करावा ह्याचा विचार करत करतच त्यांनी आपल्या बुलेटची किक मारली आणि ड्युटी संपवून घरी परतले.

    दुसऱ्या दिवशी पहाटे सावंतांच्या घरातला फोन वाजला. रणजीतच्या शेजारी राहणाऱ्या जोडप्यातील स्त्रीचा खून झाला होता. लागलीच सावंतांनी हवालदारांना घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले आणि ते स्वत:देखील काही वेळातच तिथे दाखल झाले. तिचा नवरा तिच्या शेजारी स्तब्ध बसून होता. अंगातल्या सफेद सदऱ्यावर रक्ताचे लाल शिंतोडे उडालेले आणि हातात सुकलेल्या रक्ताचा डाग राहिलेला सुरा. तिच्या नवऱ्याला ताबडतोब ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशनला आले. कदाचित त्यानेच रणजीतचादेखील खून केला असावा अशीही शंका त्यांच्या मनात येऊन गेली. पोलीस स्टेशनला आल्यावर त्यांनी त्याला एका कोठडीत डांबले आणि त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तो फ़क़्त दिग्मुढावस्थेत बसून होता. काहीही न बोलता. जणू झाल्या प्रकाराने त्याची वाचाच गेली होती. त्याला त्या रात्री तसंच नजरकैदेत ठेवण्यात आलं.

    दिवस तिसरा. ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग.. “हॅलो इंस्पेक्टर सावंत बोलतोय, काय..??” बुलेटवर किक मारून सावंत हॉटेलमालकाच्या घरी पोहोचले. जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. लागलीच त्यांनी रंगाला ताब्यात घेतले आणि त्याच कोठडीत डांबले. त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. परिणाम तोच. अनिश्चितता. काहीच उलगडले नाही. हे कोडे दिवसेंदिवस अधिकच क्लिष्ट होत होते. आज मात्र सावंत घरी गेलेच नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये बसूनच केसचा विचार करत होते आणि तसेच टेबलावर डोकं ठेऊन त्यांना मध्यरात्री कधीतरी झोप लागली.

    सकाळचा कोंबडा आरवला तो आणखी एका मृत्युच्या बातमीने आणि हा मृत्यू बाहेर नव्हे तर पोलीस स्टेशनलाच झाला होता. त्या मृत स्त्रीच्या नवऱ्याचा. कोठडीत असतानाच. शेजारी रंगा भारल्यासारखा त्याच्या मृतदेहाकडे फ़क़्त बघत होता. कसा झाला ह्याचं विधान करण्यासाठी डॉक्टरांना जास्त वेळ लागला नाही. रंगाने आदल्या रात्रीत त्याचा गळा दाबून शेवट केला होता. आता मात्र सावंतांनी रंगाला फैलावर घेतले. त्याच्यावर सपासप पट्ट्याने वार केले. अंगावर थंडगार पाणी ओतले. तरीही रंगाचं एकंच उत्तर होतं, ”म्या काल राती फकिस्त झोपलो व्हतु आणि सकाळ उटलो तर ह्यो मरून पडल्येला.” महत्प्रयासानंतरही त्याचे उत्तर बदलत नाही हे बघून त्यांनी त्याचे जेवणखाण थांबवले आणि तसेच अंधारात बंद केले.

    हळूहळू पाणी डोक्यावरून वाहत होतं. ही केस हाताबाहेर जात असल्याची कल्पना सावंतांना येत होती. परंतु त्यांनी अजूनही धीर सोडला नव्हता. गाठीशी असलेल्या सर्वानुभावाचा ते यथोचित वापर करत होते. खुनाचे प्रत्येक ठिकाण पुन्हा पुन्हा स्वत: जातीने लक्ष घालून ते तपासात होते. ह्यात वरिष्ठांकडून मदत घेण्याचा संभव जवळजवळ नव्हताच. त्याचं कारण हे गाव एकतर हमरस्त्यापासून बरेच आत वसलेले. दळणवळणाच्या, संदेश वाहनाच्या सोयीसुविधा जवळ जवळ नव्हत्याच आणि जरी कोणाकडून मदत घेण्याचे ठरवले तरी चार मुडदे पडेपर्यंत तरी वाट का पाहिली म्हणून नाकर्तेपणाचे खापर त्यांच्या माथी फुटले असते. शिवाय चारही घटना इतक्या सलग घडल्या की इतरत्र काही हालचाल करण्यास त्यांना संधीच मिळाली नाही.

    दिवस पाचवा. पोलिसांचा ताफा त्यांच्या ठाण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या खानावळीत पोहोचला. चहा-नाष्ट्यासाठी नव्हे तर खानावळीच्या मालकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा चौकशी. पुन्हा एक नवीन तपास. त्याअंती समजले की रात्री खानावळ बंद करतेवेळी गॅसशेगडीची मुठ फिरवून बंद केली गेली नव्हती. दारे खिडक्या बंद असल्याने रात्रभर तो गॅस तसाच सबंध खानावळीत पसरला आणि सकाळी जेव्हा मालकाने सिगरेट शिलगावत खानावळीचा दरवाजा उघडला तेव्हा मोठा आवाज झाला आणि आगीच्या लोटात त्याचा शिल्लक राहिला फ़क़्त जळालेला देह. ह्या घटनेचा सूत्रधार कोण. ओलीस धरणार तरी कोणाला. हा अनाहूतपणे झालेला मृत्य होता की कोणी जाणूनबुजून केलेला खून. आणखी एक दिवस संभ्रमाचा. नियतीने चालवलेल्या अकल्पित रहस्याचा. अपयशाच्या जाणीवेने कधीही न बुजणारी मनाला लागलेली टोचणी घेऊन अजगराच्या विळख्यातील असहाय्य जनावराप्रमाणे इंस्पेक्टर सावंत आपल्याच खुर्चीवर बसून तडफडत होते. होणाऱ्या घटना थांबत नव्हत्या. रात्रीचा काळोख आता गिळायला उठत असे. पुढे फ़क़्त अंधार दिसत होता. सावंतांची मती हळूहळू भ्रष्ट होत चालली होती. हतबल अवस्थेत ते डोकं धरून बसून होते. त्या रात्री तर त्यांनी जेवणाला हातदेखील नाही लावला. उद्याचा दिवस कोणाच्या मृत्यूने उजाडतोय त्याचीच वाट बघत कधीतरी मध्यरात्री त्यांना डोळा लागला. सुदैवाने त्या सकाळी कसलीही अघटीत वार्ता आली नाही. सावंतांनी तो पूर्ण दिवस झालेल्या घटनांचा पुन्हा एकदा छडा लावण्याचा प्रयत्न केला. कुठेना कुठेतरी पाणी मुरतंय ह्याची त्यांना खात्री होती. परंतु होणाऱ्या घटना त्यांच्या आकलन क्षमतेच्या बाहेर होत्या. दिवस ढळेपर्यंत त्यांनी पावसकरांना सोबतीला घेऊन हॉटेल विसावा आणि खानावळीजवळ वास्तव्य करणाऱ्या लोकांची परत एकदा चौकशी केली. त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते का त्याचा अंदाज घेतला. परंतु ह्या बाबतीतही त्यांची तशी उपेक्षाच झाली. सूर्यास्त होऊन आता बराच अवकाश झाला होता. सावंत केबिनमध्ये एकटेच बसले होते. टेबलावर बऱ्याच फाईल अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

“पावसकर…” सावंतांनी आवाज दिला.

“हां सायेब…” पावसकर लगबगीने केबिनमध्ये आले.

“चला.”

“कुठं?”

“एका ठिकाणी तपास करायचाय.”

काहीतरी उमगले होते. कुठेतरी काहीतरी सापडण्याची शक्यता वाटत होती. सावंत केबिनमधून निघाले तेव्हा त्यांच्या टेबलवर रणजीतच्या डायरीतली काही पाने वाऱ्याने फडफडत होती.

 

To be continued…

अतर्क्य…(भाग १)

१.

     अखेरीस इंस्पेक्टर देशमुखांनी ती फाईल उघडली. नव्हे त्यांना ती उघडावीच लागली. वरिष्ठांनी त्यासाठीच तर त्यांची बदली इथे देवली गावात केली होती. समुद्र किनारपट्टीपासून दूर वसलेल्या ह्या गावावर निसर्गाची कायमच कृपा होती. ती केस सोडवत असताना त्यावेळच्या इंस्पेक्टर सावंतांचा गूढ मृत्यू झाला. तेव्हापासून ही केस हातात घेण्यासाठी कोणीही तयार नव्हते. त्यामुळेच ती गेली दहा वर्षे प्रलंबित राहिली. आजपर्यंत कितीतरी अशा न सुटलेल्या केसेस इंस्पेक्टर देशमुखांनी आपल्या कारकिर्दीत सोडवल्या होत्या. त्याचे बक्षीस म्हणून परवा दुपारी एक टपाल त्यांच्या टेबलावर आले, ज्यात त्यांची तातडीने देवलीच्या पोलीस ठाण्यात बदली केली होती आणि कालच्या एसटीने देशमुख ह्या पोलीसठाण्यात हजर झाले. गावात तसे फार लोक राहत नसत. दीडशे-दोनशे माणसे असावीत आणि जे होते त्यांची घरेदेखील एकमेकांपासून दूर दूर होती. येण्या-जाण्यासाठी फ़क़्त एक-दोन पायवाटा आणि गाडीवाहनासाठी एक कच्चा रस्ता होता.

   फाईल अगदी बुरशी लागण्याच्या पावित्र्यात होती. वरवरची धूळ झटकून देशमुख पाने चाळू लागले. जवळपास प्रत्येक पानावर झुरळाची ती लहान लहान अंडी होती. काही पानांवर उंदीर जमातीने यथेच्छ ताव मारला होता. अधली मधली पाने गहाळ झाल्याचेदेखील त्यांना जाणवत होते. त्यांनी जागेवरूनच आवाज दिला,

“ओ पावसकर, हा दरवाजा लावून घ्या आणि मी सांगेपर्यंत कोणालाही माझ्या केबिनमध्ये पाठवू नका.”

   पावसकर हवालदार म्हणजे ह्या पोलीस ठाण्यातलं जुनं खोड. अगदी पोलीस ठाणे बांधल्यापासून ते इथेच. त्यांच्या सोबतच्या कितीतरी हवालदारांची सतत बदली होत असे. पण पावसकर मात्र इथेच पाय घट्ट रोवून होते. चायवाल्या पोऱ्याने सकाळीच टेबलावर आणून ठेवलेला चहा केव्हाचा थंड झालेला. परंतु आल्यापासून फाईलमध्ये खुपसलेलं डोकं वर काढायला देशमुखांना फुरसतच नव्हती. अचानक फाईलमधून एक घडी केलेला कागद गहाळ होऊन खाली पडला. त्यांनी तो उचलला आणि उघडून बघितला. वरवर वाचून पुन्हा त्याची घडी करून त्यांनी तो त्यांच्या खिशात ठेवला. आता मध्यान्हाची वेळ होत आली होती. ते अजूनही केबिनमध्येच होते. बाहेर पावसकर पिंपळाच्या कट्ट्यावर बसून तंबाखू मळत नवीन भरती झालेल्या तरण्या हवालदारांना समजुतीच्या चार गोष्टी शिकवत होते आणि तेदेखील त्यांच्या हो ला हो म्हणत तंबाखूचे बकाणे भरत होते.

“म्या काल राती फकिस्त झोपलो व्हतु आणि सकाळ उटलो तर ह्यो मरून पडल्येला.” एक अनपेक्षित आवाज कट्ट्याच्या दुसऱ्या बाजूने आला. तशी पावसकरांनी हातातली काठी त्याच्या अंगावर उगारली आणि तो वेडा घाबरून पळून गेला.

   एवढ्यात सायकलची घंटी वाजवत एक पोरगा तिथे हजर झाला. त्याच्या सायकलीला जेवणाचा डबा लावला होता. “खाणावळीतून आलोया. देशमुख सायबांसाटी डबा घेऊन. सायेब हायेत काय?” तो पोरगा म्हणाला.

   खानावळीचे मालक गेल्यापासून तिकडे जाणाऱ्या लोकांचा ओढा फारच मंदावला होता. तरी अधूनमधून विरळ लोक तिथे आता दिसायचे. देशमुखांकडे त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळेच त्यांनी आपल्या जेवण-खाण्याची सोय इथेच करून घेतली होती.

   पावसकर उठले आणि त्याच्या हातातला डबा घेऊन त्याला जायला सांगितले. तो डबा घेऊन ते केबिनच्या दरवाजापाशी गेले आणि हलकेच दारावर ठकठक केली.

“आत या”, आतून आवाज आला.

साहेबांची परवानगी मिळताच दरवाजा उघडून ते आत गेले आणि डबा टेबलावर ठेऊन पुन्हा बाहेर जायला निघाले.

“थांबा पावसकर.”

“काय सायेब.”

“तुम्ही किती वर्षांपासून इथे आहात?”

“व्हतील आता पंचवीस एक वर्ष.”

“म्हणजे ह्या केसबद्दल तुम्हाला खडान् खडा माहिती असणार, नाही का?”

“व्हय म्हंजी जेवढं ठाव हाय तेवढं समदं सांगीन म्या तुम्हासनी. पर माजं ऐकशाल तर तुमी माघारी आपल्या गावाकडं जावा. ह्यात लई लोकास्नी आपला जीव गमविला हाये. ही केस काय सादी न्हवं.”

“हे सांगण्यासाठी थांबवलं नाही मी तुम्हाला आणि ह्यापुढे मी विचारेन तेवढंच उत्तर द्यायचं. स्वत:चा शहाणपणा दाखवायचा नाही. समजलं?”

“चुकलं सायेब. मी आपलं…”

“ठीक आहे. या आता तुम्ही.”

 

२. (पूर्वार्ध)

   संध्याकाळची वेळ होती. विसावा हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कवरची घंटी वाजली. लगबगीने मालक बाहेर आला. चार फुट उंचीचा, सदरा-पायजमा परिधान केलेला, खांद्यावर कसलीशी झोळी अडकवलेली नि पायात जुनाट वाहणा अडकवलेला एक गृहस्थ तिथे उभा होता.

“रूम मिळेल का?”

“मिळंल की. किती दिस ऱ्हाणार?”

“माहित नाही.”

“दर दिसाचं भाडं पन्नास रूपे. नाव बोला.”

“रणजीत.”

“हिथं अंगठा द्या,” म्हणत मालकाने त्याच्यासमोर शाईची दौत पुढे केली. उर्वरित जुजबी माहिती भरून नोंदणीचे कार्य पूर्ण झाल्यावर मालकाने एका खोलीची चावी रणजीतच्या हातात सोपवली आणि रंगाला हाक मारून त्याला त्याच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.

   खोली अगदीच जेमतेम होती. कुठे भिंतीचे पोपडे उडालेले तर कुठे चिरा गेलेल्या. नावाला एक लाकडी कपाट. खिडकीशेजारी एक लोखंडी खाट. त्यावर जीर्ण झालेली गादी. डोक्यावर कराव कराव पंख्याचा आवाज नि सबंध खोलीत पिवळ्या दिव्याचा पसरलेला रोगट प्रकाश. खोली दाखवून रंगा निघून गेला. तशी ह्या गावात लोकं विरळंच होती. त्यात महिन्याकाठी एखादं गिऱ्हाईक हॉटेलची पायरी चढत असे. गावात एवढं एकंच हॉटेल असल्यामुळे गिऱ्हाईकाला पर्याय नसे. रणजीत आला त्यावेळेसही ते हॉटेल रिकामेच होते. त्याने खांद्यावरची झोळी जमिनीवर ठेवली आणि खाटेवर बसून खिडकीबाहेरचे दृश्य न्याहाळू लागला. चहुबाजूला माडाची उंच झाडी. शिवाय आंबा, फणस, पिंपळ मध्येच कुठेतरी आपले अस्तित्व राखून होते. सूर्याचे मावळतीचे किरण आकाशात विविध रंगछटा भरत होते. त्याच्या गूढ कथालेखनासाठी ही खोली अत्यंत साजेशी होती.

   न्हाणीघरातली बादली घेऊन तो हापशीवर गेला आणि पाणी भरून वर आला. स्वच्छ तोंड, हातपाय धुवून तो पुन्हा खाटेवर बसला आणि आपल्या झोळीतून मतकरींची कादंबरी काढली. त्या पिवळ्या प्रकाशात रणजीत कादंबरीतील गूढ कथेचा आस्वाद घेत होता. जवळपास अर्ध्या-एका घटकेने दारावरची कडी वाजली. त्याने दरवाजा उघडला तर समोर रंगा जेवणाचे ताट घेऊन उभा होता. त्याने रंगाचे आभार मानत ते ताट स्वीकारले आणि दरवाजा लावून पुन्हा खाटेवर आला. गरमागरम जेवणावर यथेच्छ ताव मारत रणजीत नवीन नवीन कल्पना डोक्यात शिजवत होता. त्या वातावरणात त्याच्या विचारांचे बेभान घोडे चहु दिशांना उधळत होते. जेवण आटोपताच त्याने झोळीतून त्याची डायरी काढली आणि मग त्याच्या कल्पनांची सरिता थेंबाथेंबाने अक्षररुपात पानावर वाहू लागली. त्या वातावरणातील नशेची झिंग त्याच्यातील लेखकाला कथेतील नायकाशी एकरूप करत होती. कथेमध्ये वेगवेगळी पात्रे मिसळली गेली आणि थरारकतेच्या अत्युच्च शिरोबिंदुला स्पर्शून ती कथा एका अनिश्चित घटनेवर प्रमाण झाली. त्याच वेळी बाहेर सोसाट्याचा वारा सुटला. खिडकीची तावदाने धडाडधाड गजांवर आपटली. लगबगीने त्याने तावदानांना कडी घातली आणि डायरी बंद करून तो पिवळा दिवा विझवला नि झोपी गेला.

   सकाळी रंगाने दरवाजा खटखटवला तेव्हा डोळे चोळत चोळत तो उठला. त्याच्या हातून चहाचा कप घेऊन रणजीत पुन्हा आपल्या जागेवर आला. खिडकीतून सकाळचे ते मनोरम्य दृश्य पाहत घोटाघोटाने तो चहा रिचवत होता. सकाळची आन्हिके उरकून तो हॉटेलबाहेर पडला आणि परतला तो थेट उन्हे कलू लागल्यावर. दिवसभर तो कुठे होता ह्याची कल्पना त्याच्याशिवाय इतर कोणालाच नव्हती. मग पुन्हा मतकरींची कादंबरी आणि जेवण आटोपल्यावर पुन्हा एक थरारक कथा. असा त्याचा दिनक्रम झाला.

    दोन एक दिवसांतच त्याच्या शेजारच्या खोलीत एक नवविवाहित जोडपे राहण्यासाठी आले. सहज ओळख होताच त्याला कळाले की ते ह्या हॉटेल मालकाच्याच नात्यातले आहेत. दिवसामागून दिवस सरत होते. म्हणता म्हणता आठवडा झाला. रात्रीचे जेवण आटोपले आणि कथेला सुरवात झाली. रणजीतची लेखणी पानांवर भराभर धावू लागली. एकामागून एक कल्पना सुचत गेल्या आणि त्या जशाच्या तश्या कागदावर उमटत गेल्या. योगायोगाने त्या डायरीच्या शेवटच्या पानावर कथेचा शेवट झाला आणि पुढच्या क्षणी अचानक खोलीतला दिवा लुकलुकत बंद झाला. सर्वत्र दाट काळोख पसरला. पंख्याचा कराव कराव आवाज शांत झाला. बाहेर वाऱ्याचा आवाज येत होता. त्याने खिडकीतूनच रंगाला हाक मारली पण हाकेला साद मिळाली नाही. पुन्हा एकदा हाक मारली, तरी तीच गत. शेवटी खिडकीतून येणाऱ्या अंधुकश्या उजेडात त्याने झोपण्याची तयारी केली आणि काही क्षणांतच तो निद्राधीन झाला.

 

 

To be continued…

तृष्णा …(भाग – ३)

  गाडीमधून एक पुरुष आणि एक स्त्री उतरली. त्या पुरुषाने गाडीचा मागचा दरवाजा खोलला आणि कोणाला तरी बाहेर येण्याची आर्जवं करू लागला. ‘कोण होतं तिथे आणि ते बाहेर का येत नव्हते?’ दरवाजात उभा राहून त्याच्या विचारांचे चक्र वेगात फिरत होते. शेवटी त्या पुरुषाने त्या आतल्या व्यक्तीला खेचून बाहेर काढले आणि दरवाजात उभा असलेल्या ‘त्या’चे हात पाय गळपटायला लागले. अंगात शिरशिरी भरली. ती व्यक्ती तीच मुलगी होती जिला त्याने ग्लानी येण्यापूर्वी पाहिले होते. पांढराशुभ्र पायघोळ, मोकळे काळेभोर केस आणि पाय अनवाणी. बघताचक्षणी त्याला कळाले की ह्या मुलीचे मानसिक संतुलन पूर्णता: बिघडले आहे.

     तो गडी आणि तो पुरुष तिचा एक एक हात पकडून तिला घराच्या दिशेने ओढत ओढत आणत होते. ती स्त्री त्यांच्यामागून हळू हळू येत होती. एव्हाना अंधार पडू लागला होता. तो दरवाजात तसाच उभा होता. ते दोघं त्या मुलीला घेऊन दरवाजापर्यंत पोहोचले. त्या दोघांनी तिचा हात घट्ट पकडूनच वाहणा बाजूला काढून ठेवल्या आणि आत आले. तिला खुर्चीवर बसवले आणि त्या पुरुषाने तिचे दोन्ही हात मागे धरून ठेवले. ती तोंडाने विचित्र आवाज काढत रेकत होती आणि काहीतरी अ..क्त अ..क्त असे बोलत होती. ती नक्की काय बोलत होती हे ‘त्या’ला काही स्पष्ट समजले नाही. तिच्या एकूण अवताराकडे पाहून त्याची भीती शिगेला पोहोचली होती. ती स्त्री बाहेर बाकड्यावर बसली होती. आत काय चाललाय ह्याविषयी तिला जरादेखील चिंता नव्हती.

      मग त्या गड्याने कुठूनतरी एक जाडा दोरखंड आणला आणि त्या दोघांनी तिला खुर्चीवर तसच बांधून ठेऊन तिच्या तोंडावर पट्टी मारली. सुटकेच्या निश्वास टाकत त्या पुरुषाने कपाळावरचा घाम रुमालाने टिपून घेतला आणि त्या गड्याला काही सूचना करू लागला. त्या मुलीच्या खाण्यापिण्याची पथ्ये सांगू लागला. तो म्हणाला, ‘डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला निसर्गरम्य वातावरणात ठेवले तर तिच्यात सुधार होण्यास मदत होऊ शकते. ही जन्मत:च हिची आई गेली. हिला सांभाळण्यासाठी मी दुसरे लग्न केले. डॉक्टरांनी हिच्या जन्माच्या वेळेसच सांगितले होते की हिच्या मेंदूची वाढ अजिबात झालेली नाही आणि ती कधीच सामान्य मुलींसारखे आयुष्य जगू शकणार नाही. तेव्हा ती चार-पाच वर्षांची झाल्यावर तिला वेड्यांच्या इस्पितळात आम्ही दाखल केले होते. परंतु गेल्या वर्षीपासून तिच्यात राक्षसी, अमानवी शक्तींनी प्रवेश केल्यासारखा दिसत होता, असे डॉक्टरांनी सांगितले. मांत्रिकी उपचारदेखील करून झाले. पण त्याचा काहीही फरक पडला नाही. तिला गेल्या सहा महिन्यांपासून सतत रक्ताची तहान लागलेली असते. ते सुद्धा एका अघटीत प्रकाराने. डॉक्टरांच्या नकळत तिने ब्लेडने तिचेच बोट कापले आणि बोटातून भळाभळा रक्त येऊ लागले. नर्सला समजताच ती धावत तिच्याकडे गेली आणि ते बोट तिला चोखायला सांगितले. कापल्यामुळे होणाऱ्या वेदनांचा जरादेखील लवलेश तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती तिचे बोट पिळून आणखी रक्त काढत पित होती. ते पाहून नर्सने खाडकन तिच्या कानाखाली मारली. तर ती तिच्यावरच गुरगुरायला लागली. लगेचच नर्सने वार्ड बॉयला बोलावून कसेबसे तिला नियंत्रणात आणले. पण तेव्हापासून हळूहळू ती हाताबाहेर गेली. तिथे तिने दोघांचा जीव घेतला होता आणि ते सुद्धा अगदी निर्दयीपणे. असो. आतापासून तुम्हाला हिच्याकडे लक्ष पुरवायचे आहे आणि ह्या जोखमीच्या कामासाठी मी तुमचा पगार तीन पटीने वाढवतो आहे. आम्ही आता निघतो. पुन्हा महिन्याभरात येतो. तोपर्यंत काळजी घ्या,’ असे म्हणून तो पुरुष बाहेर गेला.

      ‘तो’ घराच्या एका कोपऱ्यात बसून सगळं ऐकत होता. बाहेर गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. तो गडी पुन्हा लगबगीने ओसरीपर्यंत गेला. त्यांना निरोप देऊन तो गडी पुन्हा घरी आला. त्याने पाहिले तर ती डोळे मिटून धीरगंभीर श्वास सोडत होता. तिला तसेच ठेऊन तो गडी किचनमध्ये गेला. दिवाणखान्यातला पिवळा दिवा वातावरणातील उदासीनतेत भर घालत होता. ‘तो’ कोपऱ्यात बसलेला जागेवर उभा राहिला आणि हळू हळू तिच्यापासून चा हात लांब राहूनच तिच्यासमोर येऊ लागला. तिचे मोकळे लांब केस चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी पसरले होते. तो समोर उभं राहून आवाज न करता तिचा निरीक्षण करत होता आणि इतक्यात तिने डोळे उघडले. केसांच्या मधून तिचे ते लाल डोळे पाहून तो पाठीमागेच कोसळला. ती खुर्ची हलवायला लागली आणि जोरजोरात कण्हू लागली. तिच्या आवाजाने तो गडी बाहेर आला. तिला दोन चार शिव्या हासडून गप्प बसून राहायला सांगितले आणि पुन्हा किचन मध्ये गेला. गडी गेला तरी ती गुरगुरतच होती.

      असाच काही वेळ निघून गेला. तो गडी पुन्हा किचनमधून बाहेर आला. हातात कसलीशी जेवणाची थाळी होती. ती घेऊन तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिच्या तोंडावरची पट्टी काढली. ती आता थोडी शांत झालेली वाटत होती. त्याने एक घास बनवून तिच्या तोंडासमोर नेला. तिने नाही म्हणण्यासाठी जोरात मान हलवली. तरी त्याने जबरदस्ती करत तो घास तिला भरवलाच. तिने तसाच तो थुंकला. त्याचे काही शिंतोडे त्याच्या चेहऱ्यावर उडाले. आता तो गडीदेखील रागाने लालबुंद होत होता. त्याने जवळपास खेकसूनच तिला विचारले, ’ह्ये नगं त काय हावं तुला? काय हावं हां?’ असे म्हणत तिचा जोरात कान पिळला. ती काही प्रमाणात वेदनेने कळवळली. त्याने पुन्हा विचारले, ‘बोल की भवाने, काय हावं?’ ती कण्हत म्हणाली, ‘अ..अ…क्त.’ त्याने तिच्या जोरदार कानसुळात मारली आणि म्हणाला, ‘रघात काय, माजं रघात प्येशील का, माजं? म्हने रघात पायजे. मर उपाशीच. न्हायतरी तुह्या बापालासुदिक तू नकोशीच झालीयस. जल्माला आली तवा मायला खाल्लंस. आता मलाबी खा,’ असं म्हणत तो गडी उठला आणि तिथून निघून गेला. ती मात्र तिथेच डोकं खाली घालून कण्हत होती.

      ‘तो’ उठला आणि दबकत दबकत दरवाज्यापाशी जाऊन हळूच तिथून बाहेर पडला. रिकाम्या बाकड्यावर जाऊन त्याने अंग आडवे केले. बराच वेळ सर्वकाही शांत होते. रात्री कसल्याश्या आवाजाने त्याला जाग आली. हो तो अजूनही त्याच काळात आहे. आकाशात ढग गर्दी करू लागले होते. रातकिड्यांचा आवाज शांततेचा भंग करत होता. घराच्या दारे खिडक्या बंद होत्या. बाहेर हातकंदीलाचा दिवा जळत होता. घरात काळोख होता. तरी कंदिलाचा प्रकाश खिडकीच्या फटीतून आत झिरपत होता. कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. तो उठला आणि खिडकीपाशी गेला. फटीतून आत पाहू लागला. फरशीवर तो गडी घोरत पहुडला होता आणि ती खुर्ची रिकामी होती. क्षणभर त्याच्या छातीत धस्स झालं. तो पुन्हा आत पाहू लागला आणि किचनच्या दरवाज्यात त्याला कसलीशी चाहूल लागली. त्याने पाहिले तर ती मुलगी त्या पांढऱ्या पायघोळमध्ये, केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत हातात तो धारदार सुरा घेऊन उभी होती. त्याचे हातपाय लटपटायला लागतात. तो तसाच खाली बसला आणि डोळे मिटून डोकं गुडघ्यात खुपसून हमसाहमशी रडू लागला. पुढच्या काही क्षणांतच एक आर्त किंकाळी सबंध परिसरात पसरली. त्याची तर वाचाच बसली.

      तशातच ढगांचा जोरदार आवाज झाला आणि पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. विजांचा कडकडाट झाला आणि त्यातच तिचं विक्षिप्त हास्य त्याच्या कानावर पडलं. संपूर्ण वातावरणात एक अनामिक कळा पसरली. त्याची गाडी बंद पडण्यापासून ते त्याला ग्लानी येईपर्यंतच्या सर्व गोष्टींचा त्याला उलगडा झाला. त्याला मघाशी दरवाजात दिसलेली ती अमानवी घटना सुमारे वीस पूर्वी तिथे घडली होती.

      त्याने डोळे उघडले. गुडघ्यात खुपसलेले डोके वर काढले. कधीपासून पाण्यासारखे हलणारे दृश्य आता स्थिर झाले होते. हो तो आता पुन्हा वर्तमानात आला होता. पाऊस अजूनही कोसळतच होता. विजांचा लखलखाट सुरूच होता. बघता बघता त्याची नजर दरवाजाकडे गेली. तिथे आडवा पडलेला तो ‘तो’च होता. एक पाय सुजलेला नि दरवाजात निश्चेष्ट कोसळलेला. कसाबसा धीर एकवटून तो उठला आणि दरवाजात त्याच्या कलेवरापाशी गेला. तिथे गेला न गेला तोच त्याला ती दिसली. खोलीत तशीच उपडी मांडी घालून बसली होती. त्याच्या कलेवराच्या अगदी जवळ. एका हातात तोच रक्तरंजित सुरा आणि दुसऱ्या हातात त्याचं शीर. बाजूला पडलेल्या विजेरीच्या प्रकाशात लाल भडक दात विचकावून त्याच्याकडे बघणारा तिचा तो विद्रूप चेहरा त्याला स्पष्ट दिसला आणि बघता बघता पुढच्या काही क्षणांतच त्याचे ते धूड आत खेचले जाऊन धडामदिशी दार बंद झाले.

       अखेरीस तो उठला आणि पुन्हा रस्त्याच्या दिशेने निघाला. सर्व इंद्रिये सुन्न झाली होती. नकळत तो रस्त्याच्या मध्यावर जात होता आणि अचानक एक जोरदार हॉर्न वाजवत भरधाव वेगाने येणारी गाडी त्याच्या आरपार निघून गेली.

तृष्णा …(भाग – २)

  आता पुढे काय करायचे ह्याच्या योजना तो मनातल्या मनात आखत होता. त्याने बसल्या जागेवरून सहज आजूबाजूला पाहिले तर घराभोवती त्याला तारांचे कुंपण दिसले. त्याच्या आत आणि बाहेर बरेच रानटी गवत वाढले होते. इतके की त्यात ते कुंपण जवळपास झाकून गेले होते. बराच काळ इथे कोणी राहत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. हताश होऊन त्याने सिगरेटचा मोठा झुरका मारला आणि त्यामुळे त्याला खोकल्याची एक जोरदार उबळ आली. तो खोकत असताना अचानक त्याच्या मागून कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने निघून गेलेले जाणवले. तो सावध होऊन उभा राहिला आणि आजूबाजूला पाहिले पण काही वेगळे दिसले नाही. तो पुन्हा जागेवर बसला. पहिली सिगारेट पायाखाली दाबली आणि दुसरी शिलगावत पाऊस कमी होण्याची वाट पाहू लागला.

   मग बराच वेळ कुठेच काहीही हालचाल झाली नाही. त्याने विचार केला की आता पहाटेपर्यंत इथेच थांबावे कारण पाय मुरगळलेल्या अवस्थेत त्या चिखलातून पुन्हा गाडीपर्यंत जाण्याचे धैर्य त्याच्यात नव्हते. त्याने अंगातला कोट काढून बाकड्यावर बाजूला ठेवला आणि डावा हात दुमडून हाताची उशी करत तिथेच बाकड्यावर अंग आडवे केले. आणि बघता बघता तो कधी निद्राधीन झाला हे त्याचे त्यालादेखील कळले नाही. असाच काही वेळ निघून गेला. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. एव्हाना तो ज्या पायवाटेने आला तिथे बरेच पाणी साठले होते.

   छताला टांगलेल्या कंदिलाची ज्योत आता फडफडायला लागली जी आतापर्यंत इतक्या वाऱ्यापावसात तग धरून होती. आणि आता पुढे जे अपेक्षित होते तेच घडले. ती ज्योत विझली. आजबाजूच्या सर्व जागेवर काळोखाने कब्जा घेतला. अजूनपर्यंत त्याच्या झोपेत कसलीच बाधा आली नाही. परंतु अचानक एका अतिशय थंड वाऱ्याच्या झुळकीने त्याचे अंग गारठले. त्याने डोळे बंद अवस्थेतच कोट पांघरण्यासाठी डोक्याच्यावर हात नेऊन चाचपडले आणि त्याच्या बोटांना ‘तिच्या’ पायाच्या तळव्याचा स्पर्श झाला. ती बाकड्यावर हवेत तरंगत निश्चल उभी होती. अगदी त्याच्या डोक्याच्या बाजूलाच. त्याने खाडकन डोळे उघडले आणि उठून बघितले. पण तिथे कोणीही नव्हते. त्याने विजेरी चालू केली आणि त्या जागेवर पाहिले. परंतु आता तिथे केवळ त्याचा कोट होता. त्याने पाहिले की कंदिलाची ज्योत विझली आहे. लगबगीने त्याने खिशातले लायटर काढले आणि ज्योत पेटवली. पण काही वेळातच ती पुन्हा विझली. त्याने पुन्हा पेटवली. ती पुन्हा विझली. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने पुन्हा ती पेटवली मात्र, त्या कंदिलाच्या पलीकडे त्याला दिसला तिचा तो लालभडक दातांचा भयावह हसरा चेहरा. भीतीने तो दोन पावलं मागे सरकला अर्थात पुढच्याच क्षणात कंदिलाची ज्योत विझली.

   तो खाली मान घालून डोकं खाजवत तसाच बाकड्यावर बसला. असा विचित्र भास झाल्याने त्याची झोपच उडाली होती. आता रात्रभर असं जागंच राहायचं त्याने ठरवले. विजेरी तशीच चालू ठेवली. घड्याळात पाहिले तर अडीच वाजले होते. करण्यासारखे दुसरे काहीच नव्हते आणि दिवस उजाडण्यासाठी अजून २-३ तासांचा तरी अवकाश होता. सहज चाळा म्हणून त्याने शेजारी ठेवलेली विजेरी हातात घेऊन तिचे बटन बंद-चालू करू लागला आणि मध्येच एका आवर्तनात त्याला दिसला तिचा तो रक्ताने माखलेला सफेद पायघोळ नि चेहऱ्यावर आलेले तिचे मोकळे केस. तो जागेवरच उडाला. त्याने पटकन विजेरी बंद केली. मग पुन्हा चालू केली. आता तिथे कोणीही नव्हते. भीतीने त्याचे हात पाय थरथर कापू लागले. तरीही हे सगळे मनाचे खेळ आहेत असेच तो स्वत:ला समजावू लागला.

   विजेरी बाजूला ठेऊन तो तसाच बसून राहिला. झाल्या प्रकाराने त्याला इथे आल्याचा पश्चाताप होत होता. पण आता इलाज नव्हता. कारण घराच्या आजूबाजूने पाणी साठले होते आणि तो ज्या वाटेने आला ती आता चिखलपाण्यात लुप्त झाली होती. तेव्हा सकाळपर्यंत त्याला इथेच थांबणे भाग होते. त्याने खाली वाकून पुन्हा पायाकडे बघितले. सूज थोडी ओसरल्यागत जाणवत होती. किंचित हायसं वाटून तो तसाच बसून राहिला. अचानक कोणाच्या तरी खळखळून हसण्याचा आवाज त्याला ऐकू आला. “कोण आहे? कोण आहे तिकडे?” असे म्हणत त्याने झटकन आजूबाजूला वळून बघितले. ह्या खेपेला देखील तिथे कोणीही नव्हते. तो उठला आणि त्या घराच्या आवारात इकडे तिकडे हळूहळू फिरू लागला. त्याची जवळपास खात्री झाली होती की इथे तो एकटाच नाही.

   फिरता फिरता तो घराच्या खिडकीपाशी आला. खिडकी बंद असली तरी तिला थोडी फट होती. त्यातून तो कोणी दिसतंय का त्याचा अंदाज घेऊ लागला. पण आत पूर्ण काळोख असल्याने त्याला काहीच दिसले नाही. तो तसाच हळूहळू पाय खेचत दरवाजापाशी पोहोचला आणि पचकन आवाज आला. आपला पाय पाण्यात पडल्यागत त्याला जाणवले. ‘पण इथे पाणी कुठून आले’ म्हणत घाईघाईने त्याने बाकड्यावरची विजेरी घेतली आणि खाली बसून बघितले. ते घट्ट लाल-काळे रक़्त होते. चक्कर येता येता त्याने स्वत:ला सावरले. हाताने दरवाजाच्या चौकटीला धरले आणि तिथेच त्या रक्ताच्या बाजूला पाय पसरवून बसून राहिला. ते रक्त हळूहळू ओसरीवर आणखी पसरत होते. आणि तो त्या रक्तापासून लांब लांब सरकण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी तो तिथून उठला आणि पाय घासत पुन्हा बाकड्यावर गेला.

   आता काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण घडणाऱ्या घटना थांबतच नव्हत्या आणि ‘जर असेच चालू राहिले तर भीतीने एकतर आपला जीव तरी जाईल वा आपण वेडे तरी होऊ. तेव्हा लवकरात लवकर काहीतरी हालचाल केलीच पाहिजे,’ असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. हातात विजेरी घेऊन तो उठला. रक्तातून पचक पचक आवाज करत तो दरवाजापर्यंत पोहोचला. अंदाज घेण्यासाठी त्याने त्या दरवाजाला कान लावला. आतमध्ये गटक गटक गिळण्याचा आवाज येत होता. समोर काय चित्र दिसेल हे बघण्याची त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. सारखा सारखा तो कडीजवळ हात नेऊन पुन्हा मागे आणायचा. शेवटी देवाचं नाव घेत त्याने कडीला हात लावला आणि वर खाली करत हळू हळू ती बाजूला केली. तेवढ्यात आकाशात धडाडधाड विजेचा आवाज झाला आणि क्षणभर त्या परिसरात लख्ख प्रकाश पडला. दरवाजाचा कर्रर्रर्रर्र… आवाज झाला आणि एका हातात विजेरी धरून दरवाजा त्याने पूर्ण आत ढकलला. विजेरीचा प्रकाश त्याने खोलीत मारला मात्र पुढच्या दोन तीन क्षणांतच तो ग्लानी येऊन खाली पडला. तिथे दरवाजाच्या उंबऱ्यातच. ह्यावेळेस मात्र तो स्वत:ला बिलकुल सावरू शकला नाही. कारण त्याने जे समोर बघितले ते अघोरी होते, विक्षिप्त होते, अविश्वसनीय होते. ‘ती’ उपडी मांडी घालून फरशीवर बसली होती. तिच्या एका हातात लालभडक रक्ताने माखलेला सुरा होता. दुसऱ्या हातातून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. तेच ती पित होती आणि तिचे ते लालभडक दात विचकावत हसत होती. तिचा पायघोळ रक्ताने माखला होता. आजूबाजूला माणसाच्या शरीराचे भाग विखुरले होते. त्याच्यादेखील रक्ताचा सडा सबंध खोलीभर पसरला होता.

   त्याला जेव्हा जाग आली, तेव्हा समोरचे दृश पाण्यासारखे संथ हलत होते. डोळे किलकिले करत तो आजूबाजूला पाहू लागला. जणूकाही तो एका वेगळ्याच दुनियेत अवतरला होता. ती संध्याकाळची वेळ होती. सभोवतालचे वातावरण अगदी वेगळे होते. काळाची कितीतरी वर्षे अचानक मागे गेली होती. पण तो तोच होता, आताचा. त्याने बघितले तर आत संपूर्ण घर रिकामेच होते. बाहेर किरमिजी प्रकाश पसरलेला. आतले घर व्यवस्थित लावलेले होते. एक मेज होता. मेजासमोर दोन खुर्च्या होत्या. तो संपूर्ण घर फिरत होता. हो आणि त्याच्या पायाचे दुखणेदेखील थांबले होते किंवा आता त्याच्या ते लक्षातदेखील नव्हते. तो दरवाजाबाहेर गेला. सभोवताली सुंदर शेत होते. कुंपणाच्याभोवती रंगीबेरंगी फुलझाडांची विविध तर्हेची रोपटी होती. पक्षांचा किलबिलाट वातावरणात नवरस भरत होता. सर्व कसे मंगलमय दिसत होते. तो पुन्हा घरात आला. फिरता फिरता त्याची नजर भिंतीवरच्या कॅलेंडरवर पडली. तारीख होती २३ जुलै १९९७. तो एकदम चक्रावून गेला. काळाने वीस वर्षे आधी त्याची रवानगी केली होती. तो विचारात गढून जातोय न जातोय तोच बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. तो पुन्हा दरवाजात गेला. घराच्या मागच्या बाजूस काम करत असलेला गडी खांद्यावरच्या टॉवेलला हात-तोंड पुसत घाईघाईत रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. सभोवताली शेत असल्याने गाडी घरापर्यंत आणणे शक्य नव्हते. तेव्हा मालक लोकांना गाडीतून उतरवून घेण्यासाठी हा गडी त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचला. ‘तो’ दरवाजातूनच हे सर्व पाहत होता.

 

 

To be continued…

Create a website or blog at WordPress.com

Up ↑